साधनेची तळमळ असणारी, धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती अभिमान असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची मुंबई येथील कु. वीरा अमोल गोळवसकर (वय ९ वर्षे) !

‘कु. वीरा अमोल गोळवसकर हिची तिची आई आणि मावशी यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. वीरा गोळवसकर

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. श्रुती अमोल गोळवसकर (कु. वीराची आई), मुंबई

सौ. श्रुती गोळवसकर

१ अ.‘वीरा नेहमी आनंदी असते’, असे तिचे वर्गशिक्षक सांगतात. 

१ आ. प्रेमभाव : तिच्याकडे जी भेटवस्तू उपलब्ध असेल, ती वस्तू शेजारी रहाणार्‍या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी ती आवर्जून भेट देते. ती स्वतः मुलांच्या वाढदिवसानिमित्त भेटकार्ड बनवते. ती आजोळी मामाकडे जातांना आजी-आजोबा, मावशी आणि मामी यांना देण्यासाठी घरातील वस्तू भेट म्हणून घेऊन जाते.

१ इ. इतरांना साहाय्य करणे : ती स्वतःच्या पुस्तकांचे कपाट व्यवस्थित लावते. पलंगावरील पलंगपोस (चादर) विस्कटलेला असेल, तर ती व्यवस्थित करते. तिच्या हातून फरशीवर पाणी सांडले असेल, तर कापड घेऊन ते पुसून काढते. घरकामातही ती मला साहाय्य करते.

१ ई. बालसंस्कार वर्गात सांगितल्यानुसार आचरण करणे : ती बालसंस्कार वर्गात प्रश्न विचारून मनातील शंकांचे निरसन करून घेते. ती वर्गात तिला आलेल्या अनुभूती सांगते. बालसंस्कारवर्गात ‘प्रत्येक सणांचे महत्त्व सांगून नामजप का करावा ?’, याविषयी सांगतात. त्यानुसार ती त्या सणांच्या दिवशी त्या त्या देवतेचा नामजपही करते. बालसंस्कार वर्गात साधनेच्या ज्या कृती सांगितल्या जातात, त्यानुसार ती कृती करते.

१ उ. नामजप भावपूर्ण करणे : वीरा खेळत असतांना किंवा अभ्यास करत असतांना वैखरीतून नामजप करते. ती ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हे नामजप एकाग्रतेने करते. ‘कठीण प्रसंगांत नामजप आणि प्रार्थना केली पाहिजे’, हे तिला सहजतेने सुचते. त्या वेळी ती आम्हालाही तसे प्रयत्न करायला सांगते. शाळेत वर्गात मुली मस्ती करत असतांना ती नामजप करते. ती शाळेतही अधिकाधिक नामजप करण्याचा प्रयत्न करते. ती शाळेत जातांना जयघोष करते. मी सांगितल्यावर ती गुरूंचे स्मरण आणि भावजागृतीचे विविध करते. तेव्हा तिचा प्रतिसाद चांगला असतो.

१ ऊ. चित्रकलेची आवड : तिला देवतांची चित्रे काढायला पुष्कळ आवडतात. छत्रपती शिवरायांचे किल्ले, मंदिर ही चित्रे काढतांना ती भावपूर्ण काढण्याचा प्रयत्न करते. तिने केलेली चित्रातील रंगसंगतीही सात्त्विक असते.

१ ए. ती मैत्रिणींसह आध्यात्मिक स्तरावरील खेळ खेळते. 

१ ऐ. ती कथ्थक नृत्य करते आणि तिच्या मैत्रिणींनाही शिकवते. ती आणि तिच्या मैत्रिणी चित्रपटातील गाणी न म्हणता स्तोत्र किंवा श्लोक पठण करतात. हे करत असतांना तिच्याकडून काही चूक झाली, तर ती लगेच क्षमायाचनाही करते. तिच्या या कृती पाहून तिची मैत्रीणही क्षमायाचनेची कृती करते.

१ ओ. समंजस : काही हट्टी मुले तिला त्रास देतात, तेव्हा ती त्यांना पुष्कळ सुस्पष्टपणे जाणीव करून देते आणि स्वतः शांतही रहाते.

१ औ. चुकांविषयी संवेदनशीलता : तिला कुणी चूक सांगितली, तर ती मान्य करते. माझ्याकडून काही चुकल्यास ती लगेच लक्षात आणून देते.

१ अं. धर्माचरणाची आवड : तिच्या काकूला बाळ झाले, तेव्हा तिची आजी म्हणाली,  ‘मम्मी पप्पा म्हण’, असे बाळाला शिकवायचे.’ तेव्हा तिने सांगितले, ‘आई-बाबा असे बोलायला शिकवायचे. मम्मी-पप्पा नाही.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २०२३ मध्ये ‘कु. वीरा अमोल गोळवसकर उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२६ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील  भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (८.३.२०२६)

१ क. राष्ट्रध्वजाचा मान राखण्यास शिकवणे : वर्ष २०२५ मध्ये २६ जानेवारीला आमच्या इमारतीत ध्वजारोहण होते. तेव्हा सर्व मुलांना रांगेत उभे केले होते. त्या वेळी एका मुलाने ध्वज चुरगळला. तेव्हा तिने त्या मुलाला सांगितले, ‘‘ध्वज असा चुरगळू नको. तो आपला राष्ट्रध्वज आहे.’’ काही मुले ध्वज उलटाही धरतात. तेव्हा ती ध्वज त्यांना सरळ धरण्यास सांगते.

१ ख. संतांचे आज्ञापालन करणे : एकदा पू. (सौ.) संगीता जाधवकाकू (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५६ वर्षे) आणि सद्गुरु अनुराधा वाडेकरताई यांच्याशी आमची भेट झाली, तेव्हा त्यांनी तिला सांगितले, ‘‘भोजन करतांना दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहायचा नाही,’ त्याप्रमाणे तिने त्यांचे आज्ञापालन केले.

१ ग. ईश्वर आणि गुरुदेव यांच्याप्रती भाव : तिचा गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद बरपह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) भाव आहे. ‘तिचे देवाशी अनुसंधान चालू आहे’, असे जाणवते. स्पर्धा परीक्षांमध्ये तिला पारितोषिक मिळाल्यावर ‘ईश्वराच्या कृपेमुळे पारितोषिक मिळाले’, असा तिचा भाव असतो.

१ घ. अनुभूती

१ घ १. वीराला रात्री झोपतांना सूक्ष्मातून श्रीकृष्ण किंवा गुरुदेव दिसतात. 

१ घ २. सद्गुरु जाधवकाकांनी भक्तीगीत म्हटल्यावर डोळ्यांतून भावाश्रू येणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे : एकदा शिबिरात सद्गुरु नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती होती. त्या वेळी त्यांनी एक भक्तीगीत म्हटले. त्या वेळी तिच्या डोळ्यांतून भावाश्रू आले. तेव्हा तिला सूक्ष्मातून गुरुदेवांचे दर्शन झाले.

१ च. स्वभावदोष : आळशीपणा, हट्टीपणा, ऐकण्याची वृत्ती नसणे’

‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे एवढे लिखाण करता आले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

२. कु. नीना कोळसुलकर (वीराची मावशी), खारेपाटण, सिंधुदुर्ग. 

२ अ. शांत स्वभाव : ‘वीरा मनात कुणाबद्दलही राग ठेवत नाही. ती सर्वांशी प्रेमाने वागते. तिची चूक सांगितली, तर ती शांतपणे ऐकून घेते.

२ आ. अनेक नवीन कृती देवाने सुचवल्यानुसार करणे : ‘वीरा एकदा दुधी भोपळ्याची भाजी चिरत असतांना तिने दुधी भोपळ्याच्या अतिशय सुंदर चौकोनी फोडी केल्या होत्या. अशा अनेक कृती तिला आम्ही न दाखवता देव सुचवत असतो. तिला आम्ही अशी भाजी चिरण्याविषयी कधीच सांगितले नाही. त्यामुळे आम्हालाही तिच्याकडून अनेक नवीन कृती शिकता येतात.

२ इ. वीराच्या सहवासात मला सतत नामजप करावासा वाटतो.  

२ ई. अध्यात्माची आवड : ती वहीत नामजप लिहीते. ती नामजपादी उपाय करणे मनापासून करते.

२ उ. वीरा तिच्या मामीचे पाहून स्वतःहून उंबरठ्याचे पूजन करू लागली. ती गावाला आल्यावर सुंदर रांगोळी काढते.’ 

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १४.१२.२०२५)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक