विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासह नीतीमान आणि आदर्श व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा ! – पू. शिवाजी वटकर, सनातन संस्था

सन्मानप्रसंगी डावीकडून पर्यवेक्षक श्री. बळवंत, मुख्याध्यापक श्री. जे.के. बेंदरे, पू. शिवाजी वटकर आणि श्री. कांचन इंगळे

तेर (जिल्हा धाराशिव), १७ मार्च (वार्ता.) – विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतांना ‘आपल्याला आयुष्यात काय व्हायचे आहे ?’, याचे ध्येय ठरवून प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण घेऊन इंजिनिअर (अभियंता), डॉक्टर (आधुनिक वैद्य), शिक्षक होण्यासह नीतीमान आणि मानवतावादी अशी आदर्श व्यक्ती होण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन सनातनचे पू. शिवाजी वटकर यांनी येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थ्यांना केले. पू. शिवाजी वटकर हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचा सन्मान शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे.के. बेंदरे यांनी केला. (वर्ष १९६४ मध्ये पू. शिवाजी वटकर हे महाराष्ट्र संत विद्यालयातून इयत्ता १० वीच्या परीक्षेत शाळेत आणि धाराशिव जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते, तसेच एच्.एस्.सी. बोर्डाच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्राच्या) गुणवत्ता सूचीत त्यांचा ७ वा क्रमांक आला होता.) सन्मानानंतर पू. वटकर यांनी ७०० विद्यार्थी आणि शिक्षक यांना मार्गदर्शन केले. त्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी गोष्टी सांगून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. सर्वांनाच त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी.डी. कांबळे यांनी केले.

यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे ? याविषयीचे मार्गदर्शन !

पू. शिवाजी वटकर

१. आपला जन्म पुण्यभूमी आणि वैभवशाली सनातन संस्कृती असलेल्या भारतात, संत-महात्मे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात झाला आहे. एवढेच नव्हे, तर आपला जन्म वैराग्याचे शिरोमणी संत गोरा कुंभार यांच्या तेर गावात झाला असून येथील महाराष्ट्र संत विद्यालयात आपण शिक्षण घेत आहोत. ‘आपण पुष्कळ भाग्यवान आहोत’, याची जाणीव ठेवून आचरण केले पाहिजे.

२. आपण इतिहासातून प्रेरणा घेऊन राष्ट्र आणि धर्म यांची सेवा केली पाहिजे. त्यासाठी संत आणि धर्म यांनी सांगितलेली साधना करणे आवश्यक आहे.

३. केवळ पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी शिक्षण नसून सकारात्मक, स्थिर, यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी शिक्षण आहे.

४. शिक्षण घेतांना आपण प्रत्येक चांगल्या गोष्टीतून शिकले पाहिजे, उदा. आपली आई ही उत्कृष्ट ‘मॅनेजर’ (व्यवस्थापक) असते. आईकडे व्यवस्थापनाची कोणतीही पदवी नसते, तरीही ती घरकाम, मुलांचा सांभाळ, वेळेचे नियोजन इत्यादी सर्वकाही आनंदाने करत असते.

५. विद्यार्थ्यांनी आज्ञापालन करणे, दुसर्‍यांचे ऐकणे, ऐकलेले स्वीकारणे आणि त्यानुसार कृती करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यावर चांगले संस्कार होऊन आपण आपल्या जीवनाचे ध्येय सहजपणे गाठू शकतो. सकाळी स्वतःहून उठणे, आई-वडील आणि देव यांना नमस्कार करणे, स्वतःच शाळेत जाण्याची सिद्धता करणे, स्वयंप्रेरणेने अभ्यास करणे इत्यादी कृती विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे.

६. मुलांनी रागीटपणा, हट्टीपणा, तसेच भ्रमणभाष अन् दूरचित्रवाणीसंच पहाणे, अव्यवस्थितपणा, आळस इत्यादी स्वभावदोष दूर केले पाहिजेत. नम्रता, समंजसपणा, शिकण्याची वृत्ती, ऐकण्याची वृत्ती, धर्माचरणाची आवड, देवाची आवड, राष्ट्राभिमान, धर्माभिमान इत्यादी गुण जोपासणे आवश्यक आहे. मुलांनी चांगल्या मित्रांची संगत ठेवावी.