घुसखोरांवरील छोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना त्यांच्या देशात पाठवणार !

महाराष्ट्र शासन करणार धोरणात्मक कारवाईचा स्तुत्य निर्णय !

प्रतिकात्मक इमेज

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – शैक्षणिक आणि वैद्यकीय पारपत्राच्या आधारे यायचे आणि त्यांचा कालावधी संपल्यानंतरही अवैध रहाणे, तसेच छोट्या गुन्ह्यांमध्ये जाणीवपूर्वक स्वत:ला अडकवून न्यायालयीन निकाल लागेपर्यंत भारतात रहाणे, ही विदेशी नागरिकांच्या घुखसोरीची पद्धत लक्षात आली आहे. त्यामुळे छोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना त्यांच्या देशात पाठवून देण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील घुसखोरांना त्यांच्या देशात पाठवण्याची कारवाई चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. भाजपच्या आमदार सौ. स्नेहा दुबे यांनी नालासोपारा परिसरात अवैधरित्या रहाणारे नायजेरियन आणि त्यांचा अमली पदार्थांच्या तस्करीतील सहभाग यांविषयीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईची माहिती दिली.

‘अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालायचा असेल, तर त्यांच्यावर आणि त्यांना रहाण्यासाठी जागा देणारे यांच्यावर कारवाई होणार का ? तसेच अवैध पबवर कारवाई होणार का ?’, असे प्रश्न आमदार सौ. स्नेहा दुबे यांनी या वेळी उपस्थित केले.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मागील मासात ६८ विदेशींना त्यांच्या देशात पाठवण्यात आले, तर सद्य:स्थितीत १२२ जण तात्पुरत्या निवास केंद्रात ठेवण्यात आले आहेत. यापुढे अवैध रहाणार्‍यांवर गुन्हा केल्यावर कारवाईपर्यंत न थांबता त्यांचे प्रवासपत्र आणि पारपत्र यांची पडताळणी पोलीस करणार आहेत. पारपत्र संपले असेल, तर त्यांना थेट तात्पुरत्या निवास केंद्रात ठेवून त्यांना त्यांच्या देशात पाठवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. अवैधरित्या रहाणार्‍यांना जे घरात रहाण्यास जागा देतात, त्यांच्यावरही कारवाई करावी लागणार आहे.’’

पारपत्र कधी संपणार ? याची माहिती पोलीस घेणार !

‘मुंबईत येणार्‍या विदेशी नागरिकांचे पारपत्र कधी संपणार ? याची माहिती पोलीस घेणार आहेत. पारपत्राचा कालावधी संपल्यावर ते पुन्हा गेले का, याची पडताळणी पोलीस करणार आहेत’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास पबचा परवाना कायमस्वरूपी रहित !

‘ठराविक वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास पबचा परवाना कायमस्वरूपी रहित केला जाईल. याविषयी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येईल’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप !

बोईसर येथील आमदार विलास तरे यांनी पेल्हार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानंतरही अमली पदार्थांच्या तस्करीविषयी कारवाई केली गेली नाही. याविषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. मागील २-३ दिवसांपासूनही या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात अमली पदार्थांची उघडपणे विक्री होत आहे. याविषयीचे चित्रीकरण मंत्र्यांना देणार असल्याचे आमदार विलास तरे यांनी सांगितले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘याविषयीची माहिती घेऊन कारवाई केली जाईल’, असे सांगितले. या वेळी काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि हेमंत ओगले यांनीही प्रश्न उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.