Amrutsar ISI-Sponsored Terror : अमृतसर (पंजाब) येथे आय.एस्.आय.कडून शस्त्र तस्करी

२ आतंकवादी आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे कह्यात

(आय.एस्.आय. – इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स ही पाकची गुप्तचर संस्था आहे.)

अमृतसर (पंजाब) – येथील ग्रामीण पोलिसांनी १४ मार्च या दिवशी आय.एस्.आय. पुरस्कृत शस्त्र तस्करी उघड केली. सीमेपलीकडून शस्त्रांची तस्करी करणार्‍या २ आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १ एके-४७ रायफल, तिच्या २ मॅगझिन, ३६ जिवंत काडतुसे आणि ३ अत्याधुनिक पिस्तुले यांचा समावेश आहे. अटारी येथील गुरसेवक सिंह उपाख्य सूरज आणि छेहर्टा येथील अमरजीत सिंह उपाख्य रोहित अशी अटक केलेल्या दोघा आतंकवाद्यांची नावे आहेत. न्यायालयाने दोन्ही आतंकवाद्यांना पुढील चौकशीसाठी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, अटक केलेले आतंकवादी सामाजिक माध्यमांद्वारे विदेशातील हँडलर्सच्या (समन्वयकाच्या) संपर्कात होते. तरुणांमध्ये कट्टरता पसरवण्यासमवेतच भारत आणि पोलीस यांच्याविरोधात कथानकही ते पसरवत होते, असे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे.

एका पोलिसाच्या हत्येचा होता कट !

अमृतसर ग्रामीणचे वरीष्ठ अधिक्षक सोहेल मीर यांच्या माहितीनुसार एका पोलीस कर्मचार्‍याच्या हत्येच्या कटाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महवा गावात घातलेल्या धाडीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी ड्रोनद्वारे भारतीय सीमेच्या आत मुहावा गावाजवळ निळ्या रंगाच्या सुटकेसमधून शस्त्रे टाकण्यात आली होती. ही शस्त्रे गुरदासपूर येथे नेऊन एका पोलीस कर्मचार्‍याची हत्या करण्याचा आतंकवाद्यांचा हेतू होता.
यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये पाकिस्तानच्या सीमेपासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावरील अधिआन गावात २ पोलीस कर्मचार्‍यांची हत्या आय.एस्.आय.ने नियुक्त केलेल्या ३ तरुणांनी केल्याचे उघड झाले होते.

संपादकीय भूमिका

पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांना जे काही आर्थिक आणि शस्त्र साहाय्य केले जात आहे, ते आय.एस्.आय.द्वारे केले जाते, हे आता अनेक उदाहरणांतून उघड झाले आहे. पंजाबमधील खलिस्तानवाद निपटण्यासाठी प्रथम पाकच्या मुसक्या आवळणे आवश्यक !