मागण्या मान्य न केल्यास २३ मार्चला मुंबई-गोवा महामार्ग रोखणार ! – राजू शेट्टी, शेतकरी नेते

सिंधुदुर्गनगरी – हानीग्रस्त आंबा आणि काजू बागायतदार शेतकर्यांना राज्य सरकारकडून सरसकट हानीभरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी व्हावी आणि आंबा अन् काजू या पिकांसाठी अधिकाधिक हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी ‘आंबा आणि काजू बागायतदार शेतकरी अन् व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग’च्या वतीने १२ मार्च या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. शेतकरी, व्यापारी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी असे सहस्रो लोक या मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी ‘शेतकर्यांच्या एकजुटीचा विजय असो !’ ‘जय जवान जय किसान !’ या घोषणांसह सरकारच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला.

मोर्चाला संबोधित करतांना माजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘१६ लाख कोटी रुपयांची उद्योगपतींची कर्जे सरकारकडून माफ केली जातात आणि २ अडीच सहस्र कोटी रुपये आपल्या आंबा-काजू उत्पादक शेतकर्यांना सरकार देऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. या आंबा उत्पादकांनी जगाच्या बाजारपेठेत राज्याची आणि देशाची मान ताठ केली आहे. सिंधुदुर्गच्या आंब्याची जगात ख्याती आहे. त्यामुळे हानीग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी ५ लाख रुपये आणि काजूला हेक्टरी ३ लाख रुपये हानीभरपाई मिळाली पाहिजे, तसेच विम्याचा कालावधी वाढावावा आणि कर्जमाफी करावी, अशा आमच्या मागण्या आहेत.
पुढील १० दिवसांत सरकारने या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा २३ मार्चच्या सकाळी १० वाजता नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखून आंदोलन करू. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.
जामसंडे बाजारपेठ, वेंगुर्ला बाजारपेठ आदी ठिकाणी कडकडीत बंद ठेवून आक्रोश मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यात आला.
आंबा-काजू बागायतदारांना हानीभरपाई देणार ! – पालकमंत्री
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोचल्यावर पालकमंत्री नितेश राणे हे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह मोर्चाला सामोरे गेले. या वेळी माजी खासदार शेट्टी यांनी मंत्री राणे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर राणे म्हणाले, ‘‘आंबा-काजू पिकांच्या हानीविषयी सरकार गंभीर असून शेतकर्यांना हानीभरपाई दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, मंत्री आमदार आणि अधिकारी यांची लवकरच बैठक घेतली जाईल. माझ्या जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर असतांना मी अधिवेशनात राहू शकत नाही. त्यामुळेच मी अधिवेशनातून येथे पोचलो आहे.’’ सरकार म्हणून मोर्चाला सामोरे गेल्याने माजी खासदार शेट्टी यांनी मंत्री नितेश राणे यांचे कौतुक केले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !