कोल्हापूरला राज्याच्या प्रथम १० क्रमांकामध्ये स्थान मिळवून देऊ ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

पत्रकार परिषदेत बोलतांना राजेश क्षीरसागर, तसेच अन्य

कोल्हापूर, ९ मार्च (वार्ता.) – देशातील सर्वाधिक ‘दरडोई उत्पन्न’ असणार्‍या शहरांच्या सूचीत कोल्हापूरचा समावेश होतो. नागरी सुविधा आणि विकास यांच्या आधारावर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. कला, संस्कृती, क्रीडा या क्षेत्रांतही कोल्हापूरचा नावलौकिक आहे. संमत झालेले ‘आयटीपार्क’ (आयटी पार्क – माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आस्थापनांचे एक नियोजित केंद्र) आणि ‘छत्रपती शाहू मिल्स’च्या जागेत संमत स्मारक अन् ‘टेक्स्टाईल टुरिझम हब’ (कापड पर्यटन केंद्र) यांमुळे कोल्हापूर शहराच्या विकासाला नवे परिमाण मिळणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या निर्मितीतून कोल्हापूरला राज्याच्या प्रथम १० क्रमांकांमध्ये स्थान मिळवून देऊ, अशी ग्वाही ‘राज्य नियोजन मंडळा’चे कार्यकारी अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. ते शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

१. कोल्हापुरात ‘आयटी पार्क’ निर्माण करण्यासाठी भूमी देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित होता. या संदर्भात विधानसभा काळात लक्षवेधी प्रश्नाद्वारे मी याला वाचा फोडली. नुकत्याच राज्य मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत शेंडापार्क येथील ३४.३६ हेक्टर भूमी ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’ला देण्यास मान्यता दिली आहे. हा निर्णय कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरणार आहे.

२. शाहू मिलच्या जागेत राजर्षि शाहू महाराज यांचे कार्य आणि विचार यांना साजेसे स्मारक अन् महाराज यांच्या नावे ‘कापड पर्यटन केंद्र’ निर्माण करण्यास वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी तत्त्वत: संमती दिली आहे. याच समवेत करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे स्मारक आणि संग्रहालय, कापड उद्योगाचा इतिहास, जुनी यंत्रसामग्री आणि कापड विणण्याच्या पद्धती दर्शवणारे शाहू संग्रहालय यांसह अन्य गोष्टींची उभारणी करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेस शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्रीताई जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, रत्नेश शिरोळकर, सत्यजित जाधव, स्वरूप कदम, नगरसेवक वैभव माने, नगरसेविका मंगल साळोखे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, दुर्गेश लिंग्रस यांसह अन्य उपस्थित होते.