१६ वर्षांखालील मुलांना सामाजिक माध्यम वापरण्यावर बंदी घालण्याचा गोवा सरकारचा विचार स्तुत्य ! – ‘स्कॅन’ (बाल संरक्षण संस्था)

पणजी, ८ मार्च (वार्ता.) – १६ वर्षांखालील मुलांना सामाजिक माध्यम वापरण्यावर बंदी घालण्याचा सरकार विचार करत आहे. आज सामाजिक माध्यम हे अल्पवयीन मुला-मुलींचे शोषण करणे आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याचे एक माध्यम बनले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचा हा एक स्तुत्य निर्णय आहे, अशी माहिती ‘स्टॉप चाईल्ड ॲब्यूज नाऊ’ (स्कॅन) या संघटनेने म्हटले आहे. संघटनेने अशा आशयाचे एक पत्र माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांना पाठवले आहे.

‘स्कॅन’ ही संघटना पत्रात पुढे म्हणते, ‘‘गोवा शासनाने सामाजिक माध्यमाचा १६ वर्षांखालील मुलांवर होणार्‍या दुष्परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. हा निर्णय योग्य वेळी आणि दायित्व ओळखून घेतलेला आहे. यामुळे ‘डिजिटल’ युगामध्ये मुलांचे संरक्षण होणार आहे. अनेक वेळा अल्पवयीन मुले पूर्वकल्पना नसतांना त्यांची छायाचित्रे, व्हिडिओ अनोळखी लोकांना सामाजिक माध्यमाद्वारे पाठवत असतात आणि याच्या आधारे त्यांचे पुढे शोषण केले जाते. अधिकाधिक ‘डिजिटल’ उपकरणे उपलब्ध होणे, हे अल्पवयीय मुला-मुलींसाठी धोकादायक बनले आहे. ‘स्कॅन’ संघटनेने मागील १२ वर्षांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचार केल्याची एकूण ४ सहस्र प्रकरणे हाताळली आहेत. यामधील बहुतांश प्रकरणे ही सामाजिक माध्यमाशी निगडित आहेत. या प्रकरणी पालकांनी सतर्क राहून त्यांचे मूल ऑनलाईन काय पहात आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. पालकांना डिजिटल वापरासाठीच्या काही मूलभूत ‘फिचर्स’ची (वैशिष्ट्यांची) माहिती असली पाहिजे.’’ (अनेक पालक डिजिटल वापरासाठीच्या काही मूलभूत ‘फिचर्स’विषयी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सर्वच पालक त्यांच्या पाल्यावर लक्ष ठेवू शकतील असे नाही. पाल्यांनी आणि शिक्षकांनी मुलांवर चांगले संस्कार करणे; सामाजिक माध्यमांतील अश्लील संकेतस्थळे, चित्रपट, मालिका आदींवर बंदी घालणे आदी उपाययोजना करणेच योग्य ठरेल ! – संपादक)