
१. वडीलधार्यांचा सन्मान करणे, हा हिंदु संस्कारांचा भाग !
‘जे लोक गुरूंच्या पाया पडतात किंवा त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवतात, ते विवेकहीन आणि मूर्ख आहेत’, अशी टीका बुद्धीप्रामाण्यवादी करत असतात. त्यांच्या मते ही गुलामगिरीची लक्षणे आहेत आणि आधुनिक विज्ञानाच्या युगात अशा गोष्टींना स्थान नसावे. बुद्धीवाद्यांना हे ठाऊक नाही का की, जेव्हा एक विद्यार्थी त्याचे शिक्षक किंवा शिक्षिका यांच्या पाया पडतो, तेव्हा तो त्याला गुरुजनांकडून मिळालेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता व्यक्त करत असतो. त्याच प्रकारे मुलगा किंवा मुलगी वडीलधार्यांच्या पाया पडते, तेव्हा तो संस्काराचा भाग असतो. शिष्यही त्याच्या गुरुचरणी नतमस्तक होतो, तेव्हा तो गुरूंच्याप्रती त्याचा उत्कट भाव व्यक्त करत असतो. यात प्रत्येक व्यक्तीच्या भावना असतात. हा एक अत्यंत वैयक्तिक असा विषय आहे. त्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना यात हस्तक्षेप करण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांनी कारण नसतांना वरील टीका केली आणि मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन् यांचा रोष पत्करला.

२. गुरु-शिष्य नात्यावर टीका करणार्यांचा न्यायमूर्तींकडून खरपूस समाचार
तमिळनाडूतील होसुर येथे एका खासगी शाळेत गुरुवंदना उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगाला श्री श्री विश्वप्रसन्ना तीर्थ स्वामी, पेजावर मठ आणि न्यायमूर्ती स्वामीनाथन् उपस्थित होते. या वेळी न्यायमूर्ती स्वामीनाथन् म्हणाले, ‘शिष्यांनी त्यांच्या गुरुप्रती दाखवलेल्या आदराला बुद्धीवादी मूर्खपणा, रानटीपणा, जंगलीपणा, नीतीमत्ताहीन व्यक्ती अशा प्रकारे संबोधतात. वास्तविक तसे नसून बुद्धीप्रामाण्यवादी हेच नीतीमत्तेची चाड नसलेले मूर्ख किंवा रानटी आहेत.’
आपल्या गुरुभक्तीचे उदाहरण देतांना न्यायमूर्ती स्वामीनाथन् म्हणाले, ‘मी माझ्या कुटुबियांसह चंडीगड येथे पदवीदान समारंभासाठी गेलो होतो. कार्यक्रम संध्याकाळी संपला आणि त्याच रात्री आम्हाला चंडीगडहून देहलीला जाणे आवश्यक होते. ती रात्र प्रचंड थंडी अणि धुक्याची होती. प्रवासात अचानकपणे आमच्या चारचाकीच्या उजव्या बाजूचा टायर पंक्चर झाला. धुक्यामुळे समोरील ४-५ फुटाचेही दिसत नव्हते. प्रयत्न करून चालकानेही हात टेकले आणि आता त्याच्याकडून काही शक्य नसल्याचे त्याने सांगितले.
अशा परिस्थितीत माझ्याजवळ देवाचा आणि गुरूंचा धावा करण्यापलीकडे काही नव्हते. मी सातत्याने ‘गुरुनाथा’, ‘गुरुनाथा’, असा माझ्या गुरूंचा धावा करत होतो. त्या कठीण प्रसंगात गुरूंची कृपा झाली आणि आम्हाला साहाय्य मिळाले. त्यानंतर पुढचा प्रवास सहजपणे करू शकलो. त्या प्रसंगापासून मला गुरूंविषयी कायम कृतज्ञता वाटते.’ न्यायमूर्ती स्वामीनाथन् पुढे म्हणाले, ‘मला न्यायमूर्ती म्हणून आणखी साडेचार वर्षे काम करता येईल. माझ्या निवृत्तीला अजून वेळ आहे. गुरूंनी दिलेले बळ आणि देवाविषयीची श्रद्धा या शिदोरीवर मी जनसामान्यांचे भरपूर काम करीन.’

३. परमेश्वराची अनुभूती घेण्यासाठी साधना करणे आवश्यक !
परमेश्वराचे अस्तित्व आपल्याला दिसत नाही. ते अमूर्त असते; पण त्याचेच रूप असलेल्या गुरूंना आपण प्रत्यक्ष बघू शकतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद मिळवू शकतो. त्यांच्या माध्यमातून भगवंत त्याच्या कृपेचा वर्षाव करत असतो. हा अनुभव प्रत्येकाला येत नाही, तर केवळ साधकांनाच येत असतो. ‘न मे भक्तः प्रणश्यति’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१) (अर्थ : माझ्या भक्ताचा नाश होत नाही), असे भगवान श्रीकृष्णाचे वचन आहे. त्यामुळे प्रत्येकाने श्रीकृष्णाचे भक्त होणे आवश्यक आहे.
४. बुद्धीप्रामाण्यवाद्यांची ठराविक टीका
पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी हे कुणावरही सरसकट टीका करत नाहीत, तर यांची टीका ‘सिलेक्टिव्ह’ (ठराविक) असते. त्यांना ‘बकरी ईद’च्या वेळी प्राणीप्रेम कधीच आठवत नाही. त्या वेळी त्यांना पर्यावरणाचाही विसर पडतो; मात्र त्यांना गणेशोत्सव, नवरात्रोसव, होळी आणि दिवाळी या सणांच्या वेळी पर्यावरणाची आवर्जून आठवण होते. ३१ डिसेंबरला फटाके वाजवले, तर प्रदूषण होत नाही; पण दिवाळीला फटाक्यांमुळे प्रदूषण होते आणि त्यांवर बंदी घालण्यासाठी याचिका केल्या जातात. सामाजिक माध्यमांमुळे आता हे लोकांना समजायला लागले आहे आणि ते या पुरोगाम्यांचे पितळ उघड करत असतात.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (२४.२.२०२६)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम