कुटुंबियांना सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती क्षमा शशिकांत राणे (वय ७५ वर्षे) !

श्रीमती क्षमा राणे

 १. नीटनेटकेपणा 

‘माझी धाकटी बहीण क्षमा हिला लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी नीटनेटक्या, चांगल्या आणि व्यवस्थित ठेवायची सवय आहे. ती तिच्या वह्या आणि पुस्तकेही नीट ओळीने लावून ठेवायची.

२. वेळेचे पालन करणे 

तिला प्रत्येक गोष्ट वेळेवर केलेली आवडते. २ वर्षांपूर्वी मी जेव्हा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते, तेव्हाही ती सकाळी लवकर उठून पूजा, जप इत्यादी करून सेवेला सकाळी ८ वाजता जात होती.

३. इतरांचा विचार करणे 

श्रीमती सुहासिनी दोंदे

लग्नाच्या आधी आम्ही दोघी बहिणी मोठ्या भावाकडे रहायला होतो. तेव्हा क्षमा अधिकोषात नोकरी करत होती. अधिकोषाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ आणि नंतर दुपारी ४ ते रात्री ८, अशी होती. तेव्हा ती सकाळी लवकर उठून पोळ्या करून ठेवत असे आणि अधिकोषात जात असे.

४. सतर्कता आणि तत्परता 

आम्ही राजेंद्रनगर (मध्यप्रदेश) येथे रहात असतांना एकदा पाण्याची पुष्कळ टंचाई होती. आमच्या घरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर एक विहीर होती; परंतु तिचे पाणी पुष्कळ खोल गेले होते. त्या वेळी आमचे वडील पहाटे ४ वाजायच्या आत सायकलवर हंडा आणि बालद्या लावून पाणी आणायला विहिरीवर जात असत. तेव्हा वडील उठले की, लगेच क्षमाही उठून त्यांच्या समवेत पाणी आणण्यासाठी जात असे. त्या वेळी ती १२ – १३ वर्षांची होती. मला मात्र कधीच जाग यायची नाही.

५. कुटुंबियांना साहाय्य करणे 

तिने कधी कुठल्याही कामाचा कंटाळा केला नाही. जेव्हा आम्हा सर्वांना आर्थिक आणि शारीरिक साहाय्य हवे होते, तेव्हा तिने ते मनापासून केले. जेव्हा कधी आमचे चुकत असेल, तेव्हा तिने आम्हाला अगदी प्रेमाने त्याची जाणीव करून दिली.

आम्हा सर्व भावंडांना कधी कुठल्या गोष्टीची आवश्यकता वाटली, तर ‘तिला विचारून केले की, सर्व सुरळीत पार पडते’, असे अनुभवास येते. ‘ती माझ्यापेक्षा लहान असूनही कोणतीही गोष्ट ‘तिला विचारूनच करावी’, असे मला वाटते.’

६. ‘क्षमाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली’, हे ऐकल्यावर मला पुष्कळच आनंद झाला.

‘तिन्ही मोक्षगुरु – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता !’

– श्रीमती सुहासिनी रमाकांत दोंदे (श्रीमती क्षमा राणे यांची मोठी बहीण, वय ७९ वर्षे), ठाणे (११.२.२०२६)