राजापूर येथील ‘काशीकुंडा’त १७ व्या शतकातील शिलालेख सापडला

राजापूर येथे सापडलेला शिलालेख

राजापूर – येथील प्रसिद्ध ‘काशीकुंडा’त संशोधकांना १६ व्या किंवा १७ व्या शतकातील एक प्राचीन शिलालेख सापडला आहे. राजापूर येथे सध्या गंगामाईचे आगमन झाले असून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गंगाक्षेत्रावरील ‘काशीकुंडा’त, जिथे भाविक स्नान करतात, तिथे एका दगडावर काही अक्षरे कोरलेली आढळली. हा दगड अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रवाहाखाली दबलेला असावा, असा अंदाज आहे.

१. इतिहास संशोधक आणि शिलालेख वाचक अनिल दुधाणे यांनी या शिलालेखाचे वाचन केले आहे. त्यावर ‘चरण रज भास्कर काशी जोशी सोमेश्वरकर’ असे लिखाण आहे. त्याचा अर्थ ‘काशीनिवासी जोशी वंशातील भास्कर, जे ‘सोमेश्वरकर’ म्हणून ओळखले जातात’ असा होतो. ‘चरण रज’ म्हणजे स्वतःला देवाच्या चरणांची धूळ मानणारा भक्त.

२. ‘अक्षरांच्या वळणावरून हा शिलालेख साधारणपणे १६ व्या किंवा १७ व्या शतकातील असावा’, असे श्री. दुधाणे यांनी सांगितले आहे.

३. ऐतिहासिक बखरींनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दोनदा गंगास्नान केल्याचे उल्लेख आहेत. वर्ष १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून गागाभट्ट यांनी येथे विद्वानांची मोठी सभा भरवली होती. या कुंडाचे बांधकाम सातवाहन राजांनी केल्याचे मानले जाते.

४. या शिलालेखाचा शोध आणि वाचनासाठी अनिल दुधाणे यांना राजापूरचे पत्रकार आणि इतिहास अभ्यासक विनोद पवार यांनी सहकार्य केले.

५. या नवीन शोधामुळे राजापूरच्या गंगाक्षेत्राच्या प्राचीन आणि ऐतिहासिक वैभवात मोलाची भर पडली आहे. हा शिलालेख पर्यटनाच्या आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.