बेशिस्त वाहनचालकांनी वेळेत थकीत दंड न भरल्यास वाहन परवाना रहित होणार !

संग्रहीत छायाचित्र

पुणे – बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी शहरात छायाचित्रके (सीसीटीव्ही) बसवण्यात आले आहेत. मार्च २०१९ पासून ‘ई-चलन’ सुविधेद्वारे बेशिस्त वाहनचालकांना भ्रमणभाषवर दंडात्मक कारवाईचे संदेश पाठवण्यास प्रारंभ झाला. दंडात्मक कारवाई केल्यानंतर वेळोवेळी पोलिसांनी आवाहन करूनही अनेक जण दंड भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे दंड न भरलेल्या वाहनचालकांचा वाहन परवाना रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. याविषयी न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात येणार आहे. यासंबंधातील सूचना वाहनमालकाच्या नोंदणीकृत भ्रमणभाष क्रमांकावर ‘MHPECH-G’ या अधिकृत ‘शॉर्ट कोड’ भ्रमणभाष संदेशाद्वारे पाठवण्यात येणार आहे. ही सूचना  २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत पाठवण्यात येणार आहे. या दिवसांच्या व्यतिरिक्त ‘एपीके फाईल्स’ने इतर दिवशी भ्रमणभाषवर आलेला संदेश संशयास्पद समजून पोलिसांना माहिती द्यावी. वाहतूक पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ http://mahatrafficechallan.gov.in, तसेच पुणे वाहतूक पोलीस ॲप (पीटीपी ॲप) वर दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनचालक जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात ई-चलन यंत्राचा वापर करून ‘क्यूआर् कोड’, ‘डेबिट कार्ड’, क्रेडिट कार्ड’ यांचा वापर करून दंडाची रक्कम भरू शकतात. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ही मोहीम राबवत असल्याचे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.