छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर भारताचा इतिहास आणि भूगोल यांचे चित्र वेगळे असते ! – मुख्यमंत्री फडणवीस

शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला !

शिवरायांच्या बालरूपाचा पाळणा झुलवतांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवर

जुन्नर (जिल्हा पुणे) – छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर भारताचा इतिहास आणि भूगोल यांचे चित्र वेगळे असते. ज्या काळात अनेक राजे मोगलांच्या अधिपत्याखाली काम करत होते, त्या काळात आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवले. त्यांनी छत्रपती शिवरायांना हिंदुस्थानाला मोगलांच्या जोखडातून मुक्त करण्याची आणि रयतेचे राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून उभी केलेली फौज ही स्वराज्याची शक्ती ठरली. छत्रपती शिवरायांनी ‘हे राज्य माझे नसून रयतेचे आहे’, असे सांगत देव, देश आणि धर्म यांसाठी लढण्याची शिकवण दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी येथे भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करत छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव केला. या वेळी छत्रपती शिवरायांच्या बालरूपाचा पाळणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झुलवण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार शिवरायांच्या बालरूपाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवतांना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले आणि सामान्य शेतकर्‍याला सैनिक बनवले. शिवनेरी गडावर पाय ठेवताच एक वेगळीच ऊर्जा मिळते.


पुणे जिल्ह्यातील सर्व गड आता अतिक्रमणमुक्त !

मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ गड ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून नामनिर्देशित करण्यात आले असून जगातील २७ देशांनी त्यास एकमताने मान्यता दिली, याचा अभिमान आहे. अजितदादांना शिवनेरी गडाविषयी पुष्कळ प्रेम होते. काही काळापूर्वी छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील सर्व गड अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या निर्णयाची कार्यवाही चालू असून पुणे जिल्ह्यातील सर्व गड आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत.