भारताला बांगलादेशातील हिंदूंसाठी काही करायची इच्छा नाही ! – Gayeshwar Roy Bangladesh MP

  • बांगलादेशातील सत्ताधारी बांगलादेश नॅशनल पार्टीचे हिंदु खासदार गायेश्वर चंद्र रॉय यांचा आरोप

  • शेख हसीना याच्या काळातही हिंदूंवर अत्याचार झाले; मात्र भारताने काहीच केले नाही, असाही केला आरोप

बांगलादेश नॅशनल पार्टीचे हिंदु खासदार गायेश्वर चंद्र रॉय

ढाका (बांगलादेश) – शेख हसीना सरकारच्या काळात अनेक हिंदूंना त्यांच्या घरातून हाकलून छळण्यात आले. आमच्याकडे याचे पुरावे आहेत; पण भारताने कधीच कोणतीही कारवाई केली नाही. मला वाटत नाही की, भारत कथित बांगलादेशी अल्पसंख्य हिंदूंसाठी काही करू इच्छितो, असा आरोप बांगलादेशात सत्तेत येणार्‍या बांगलादेश नॅशनल पार्टीचे (बी.एन्.पी.चे) राजधानी ढाका येथून निवडून आलेले खासदार गायेश्वर चंद्र रॉय यांनी भारतातील एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला. गायेश्वर चंद्र रॉय पूर्वी बी.एन्.पी.च्या सरकारच्या काळात मंत्रीही राहिले होते.

गायेश्वर चंद्र रॉय यांनी मुलाखतीत मांडलेली सूत्रे

१. हसीना यांनी केवळ अल्पसंख्यांकांनाच नाही, तर सर्वांना त्रास दिला. मी हिंदु समुदायातील आहे, तुम्ही मला अल्पसंख्यांकांचा नेता म्हणता. तरीही मला अल्पसंख्यांकांचा नेता म्हटले जाणे आवडत नाही. हसीना सरकारने मला त्रास दिला, डझनभर खटले दाखल केले, कारागृहात पाठवले. तेव्हा कुणीही म्हटले नाही की, अल्पसंख्यांकांना त्रास दिला जात आहे. तेव्हा भारतानेही काहीच म्हटले नाही.

२. जर अवामी लीगच्या हिंदु नेत्यावरही राजकीय कारणांमुळे आक्रमण झाले, तर तुम्ही अल्पसंख्यांकांची गोष्ट करू लागता. २३ मार्च १९७३ या दिवशी शेख मुजीबर रहमान यांनी रमणा कालीच्या ऐतिहासिक मंदिरावर आक्रमण केले होते. तेव्हाही भारताने कोणताही प्रश्न उपस्थित केला नव्हता. वर्ष २००१ मध्ये पंतप्रधान असलेल्या खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली मी त्या मंदिराचे पुनर्निर्माण केले. तुम्ही जाऊन ते मंदिर पाहू शकता.

३. शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या नेत्यांनी अनेक मंदिरांवर आक्रमणे केली, हिंदूंच्या भूमी बळकावल्या; पण त्याची कधीच चर्चा झाली नाही.

४. गेल्या काही दिवसांत अल्पसंख्यांकांच्या ज्या काही हत्या झाल्या आहेत, त्या राजकीय हत्या आहेत. (बांगलादेशात सत्तेत असलेल्या एका हिंदु नेत्याची अशी मानसिकता असेल, तर त्यांच्याकडूनही तेथील हिंदूंचे काही भले होईल, अशी अपेक्षा करणे फोल ठरेल ! – संपादक) कुणालाही धर्मामुळे मारले गेलेले नाही. निवडणुकीच्या वेळी दक्षिण आशियातील प्रत्येक देशात काही ना काही घडत असते. तुम्हालाही ही गोष्ट समजून घ्यायला हवी, जेणेकरून अल्पसंख्यांकांबद्दलचा हा प्रचार थांबेल.

५. भारताने वर्ष १९७१ मध्ये आम्हाला साहाय्य केले; पण त्याने हे समजून घेतले पाहिजे की, केवळ एका पक्षाशी मैत्री करून काही होणार नाही. मैत्री देशांमध्ये, लोकांमध्ये आणि सरकारांमध्ये असली पाहिजे. आमची भाषा, संस्कृती, विचारसरणी सर्व काही सारखेच आहे. भारताला वाटत होते की, बांगलादेशात केवळ हसीनाच सरकार आहे. बांगलादेशाचे लोक कधीही भारतविरोधी नव्हते, लोक अवामी लीगच्या विरोधात होते. भारताने नेहमी अवामी लीगला प्रोत्साहन दिले.

६. भारत आणि बांगलादेशाचे संबंध सुधारण्यासाठी भारताला प्रथम हे मान्य करावे लागेल की, त्याने जे केले ते चुकीचे होते. भारताच्या उच्चायुक्तांनी मला कधीही बोलावले नाही; पण ५ ऑगस्ट २०२५ नंतर संबंध सुधारण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. गेल्या १७ वर्षांत त्यांनी मला कधीही बोलावले नाही, त्यांना माझे नावही ठाऊक नव्हते. आता त्यांना वाटत आहे की, माझ्याकडे सत्ता येत आहे; म्हणून ते मला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना समजायला हवे की, त्यांनी जे केले ते चुकीचे आहे. त्यांनी त्यांच्या परराष्ट्र धोरणात पालट करायला हवा. मला वाटते की, शेजार्‍यांशी चांगले संबंध असणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. मैत्रीत मोठ्या किंवा लहान देशाचा प्रश्न नसतो, समान पातळीवर संबंध प्रस्थापित केले जातात.

७. शेख हसीना यांनी परत येऊन न्यायालयाचा सामना करायला हवा. भारताने दीर्घकाळासाठी हसीना यांना आश्रय देऊ नये. हे भारतासाठी लाजिरवाणे आहे. भारताने सर्व गुन्हेगारांना कोलकाता येथे आश्रय दिला आहे. त्या सर्वांनी परत येऊन न्यायालयाचा सामना करायला हवा.

८. आमचे म्हणणे आहे की, कोणत्याही राजकीय पक्षावर बंदी घालणे हा उपाय नाही. अवामी लीगवरही बंदी घालू नये. आमच्या पक्षाने यावर निवेदनही प्रसारित केले होते. जर अवामी लीगने निवडणूक लढवली असती, तर आमच्या पक्षाचा विजय आणखी मोठा झाला असता.

९. मला भारतात नक्कीच जायचे आहे; पण भारत मला व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारे अधिकृत कागदपत्र किंवा शिक्का.) देत नाही. माझे कोलकाता, देहली, मुंबई अशा प्रत्येक ठिकाणी ओळखीचे पुष्कळ लोक आहेत, मला त्यांना भेटायचे आहे.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशातील हिंदूंच्या आतापर्यंतच्या अत्याचारांवर भारताने घेतलेली निष्क्रीय भूमिका पहाता गायेश्वर चंद्र रॉय यांचा आरोप खोटा आहे, असे म्हणता येणार नाही !
  • शेख हसीना यांच्या काळात हिंदूंवर अत्याचार झालेच; मात्र आता हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी बी.एन्.पी. सत्तेत आल्यावर  हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत, यासाठी गायेश्वर चंद्र रॉय काय प्रयत्न करणार आहेत ?