शिवोऽहम् !

‘शिवो भूत्वा शिवं यजेत् ।’ असे शास्त्र सांगते; म्हणजे जीवात्मा हे परमात्म्याचे प्रतिबिंब आहे. शिव म्हणजे केवळ दैवत नव्हे; तर शिव म्हणजे ‘पवित्र’. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने या पावित्र्याची स्थापना स्वतःत करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपले कर्म जाणीवपूर्वक स्वच्छ ठेवणे. दशविध पापकर्माचा त्याग करण्यासाठी प्रयत्नशील असणे. भक्तीमार्गाची भूमिका इथे महत्त्वाची आहे. नवविधा भक्तीने चतुर्विध मुक्तीकडे वाटचाल होते.

आद्य शंकराचार्य

सनातन धर्मातील ४ प्रकारच्या मुक्तींचा अर्थ !

• समीपता : आपल्या आराध्यदैवताच्या जवळ बसून त्याची सेवा करण्याची प्रेरणा

• सलोकता : आपल्या आराध्यदैवताच्या लोकात पोचून त्याची सेवा करण्याची संधी

• सरूपता: आपल्या आराध्यदैवताने त्याचे भाव आपल्याद्वारे प्रकट करणे

• सायुज्यता : आपणच आपल्या आराध्यदैवतस्वरूप होणे

या चतुर्विध मुक्ती आहेत. या मुक्ती हे केवळ प्रकार नसून पायर्‍या आहेत. समीपतेपासून सायुज्यतेपर्यंत पोचण्याचे प्रत्येकाचे प्रयत्न असले पाहिजेत; मात्र ते करतांनाही ती कामना (इच्छा) मनात धरून ते प्रयत्न केल्यास त्याला सात्त्विक प्रयत्न समजले जात नाहीत. तिथेही निष्काम कर्मयोग हवा. फळाची अपेक्षाच नको. शिवस्वरूप होण्यासाठी स्वतःचे कर्म स्वच्छ ठेवणे, हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे.

आद्य शंकराचार्य म्हणतात,

‘न च प्राणसञ्ज्ञो न वै पञ्चवायु: न वा सप्तधातु: न वा पञ्चकोश:।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ।।’

अर्थ : मी ५ प्रकारचे वात, सात धातू, पाच कोश किंवा कर्मेंद्रिये यांतील काहीच नसून मी केवल शिवस्वरूप आहे; शिवस्वरूप आहे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति

मानवदेहाची निगा राखण्यासाठी व्यसनांपासून दूर रहा !

वैद्य परीक्षित शेवडे

८४ लक्ष योनीच्या फेर्‍यातून मिळालेला मानवदेह हा परमात्म्याशी जोडले जाण्याचे साधन आहे, असे सगळेच संत सांगतात. ‘शरीर हेच धर्मसाधनेचे पहिले साधन’ असल्याने त्याची निगा अत्यावश्यक. यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्यसनांपासून दूर रहाणे. आपल्या आराध्यदेवतेला आपण जे जे अर्पण करणार नाही, ते ते आपल्या शरीरातही जाऊ नये यासाठी सजग असायला हवे.

दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचे पालन करा !

दुसरी गोष्ट म्हणजे आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचे पालन होय. मृत्यू कुणालाच चुकलेला नाही. झीज हा शरीराचा स्वभावच आहे. तरीही जास्तीत जास्त निरोगी रहाण्यासाठी वरील गोष्टी आणि आयुर्वेदातील रसायनसेवन महत्त्वाचे.

पार्‍यापासून बनवलेल्या औषधांचे सेवन वैद्यांच्या सल्ल्याने करा !

रसायन म्हणून अनेक कल्प आले आहेत. आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने आपण त्यांचे सेवन करू शकता. आमच्याकडे आम्ही रसायनांकडेही थोड्या वेगळ्या दृष्टीने पहातो. रसशास्त्रीय ग्रंथ म्हणतात; बद्ध पारदाचे म्हणजेच पार्‍यापासून बनवलेल्या औषधांचे सेवन करणे हे पारमार्थिक प्रवासातही उपयुक्त आहे. पार्‍याला ‘सूत’ असे पर्यायी नाव आहे. सूत म्हणजे सारथी. विविध औषधी योगांना योग्य मार्ग दाखवत शरीराचा रथ योग्य मार्गावर ठेवणारा सारथी म्हणजे बद्ध पारद ! रसशास्त्राचे प्रयोगशालेय कसोट्यांवर दिसणारे परिणाम आपल्यासमोर नेहमीच ठेवत असतो. आज मुद्दाम हा वेगळा पैलूही थोडक्यात समोर आणला. नियत मृत्युकालपर्यंत शरीराची साधन म्हणून देखभाल करण्याचे पूर्ण प्रयत्न करावे; मात्र तसे करतांनाही ‘आपण म्हणजे देह नाही’ याचीही जाणीव ठेवावी !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति