‘व्हॅलेंटाईन डे’, म्हणजे देशाच्या युवा पिढीला पथभ्रष्ट करण्याचा बाजार !

उद्या, १४ फेब्रुवारी या दिवशी कथित ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने…

१. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने किशोर आणि युवा पिढीला लक्ष्य करणे 

‘समाजाला अयोग्य चारित्र्याची शिकार बनवणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ (कथित प्रेमदिवस) हा बाजारीकरण करून सर्वत्र आग लावण्याचे काम करत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’चे निमित्त साधून देश-विदेशांतील मोठमोठी आस्थापने आणि व्यापारी आकर्षक विज्ञापनांद्वारे विविध उत्पादने बाजारात आणतात. किशोर आणि युवा पिढीला लक्ष्य करण्यासाठी ‘कंडोम’ (गर्भनिरोधक साधने), कामोत्तेजक औषधे, अमली पदार्थ, चॉकलेट, फुले इत्यादींवर आकर्षक सूट देतात.

२. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने काही आस्थापनांनी वर्ष २०२४ मध्ये केलेली विक्री

२ अ. ब्लिंकिट (Blinkit) : या आस्थापनाची ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त कंडोमची विक्री सामान्य दिवसांच्या तुलनेत ४ पट झाली आणि लिपस्टिकची विक्री साडेतीन टक्के अधिक झाली.

 २ आ. स्विगी (Swiggy) : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी ‘स्विगी’ या आस्थापनाकडे ‘कंडोम’, गुलाब, शुभेच्छा पत्रे (गिफ्ट कार्डस्), ‘परफ्युम्स’ (सुगंधी द्रव्ये) आणि चॉकलेट्स यांची मागणी सर्वाधिक होती. वर्ष २०२३ मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रत्येक मिनिटाला २७१ केकची मागणी करण्यात आली होती, तर वर्ष २०२४ मध्ये हा आकडा ४०० च्या वर गेला.

३. युवा पिढीने पैसे, बळ, बुद्धी, तेज आणि चारित्र्य गमावणे

‘इन्नोसेंटी रिपोर्ट कार्ड’नुसार अमेरिका, ब्रिटन, जर्मनी यांसह १२ विकसित देशांपैकी १० देशांमध्ये ६७ टक्के मुले किशोरावस्थेतच लैंगिक संबंध ठेवतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ची विकृती ही भोगलालसेला वाढवून भावी पिढीला तीव्र गतीने स्वच्छंदीपणा आणि लैंगिक उच्छृंखलता यांकडे प्रवृत्त करत आहे. एकीकडे विकारी आकर्षणाच्या अधीन होऊन युवा पिढी स्वतःचे खिसे रिकामे करत आहे, तर दुसरीकडे कामुक चेष्टा करून बळ-बुद्धी, ओज-तेज आणि चारित्र्यबळरूपी खरे धनसुद्धा गमावत आहे.

४. ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा करा !

भावी पिढीची ही दुर्दशा पाहून संतांचे हृदय द्रवित होते. संतांचे वचन आहे, ‘वर्तमान युगात किशोर आणि युवा वर्गाचे जितके पतन झाले आहे, तितके पूर्वी कधीच झाले नव्हते. मुले आणि तरुण यांच्या तोंडातून खरेखुरे दूध-तूप हिरावले गेले. पतनाच्या साधनांनी त्यांचे शरीर कृश झाले. सिनेमा, अश्लील चित्रफिती आणि संकेतस्थळे यांमुळे मन दुर्बल झाले. युवा धर्मविरोधी दूरचित्रवाहिन्यांद्वारे भारतीय संस्कृतीच्या संस्कारांपासून दूर गेले. जे शेष राहिले, ते आता ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या कृतीद्वारे संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘मातृ-पितृ पूजन दिवस’, हा खरा ‘प्रेम दिवस’ आहे. आई-वडिलांच्या हृदयात वसलेल्या भगवंताने मुलांवर प्रसन्नतेचा वर्षाव करावा. त्यामुळे आई-वडिलांचेही कल्याण होईल आणि मुलामुलींचे परम कल्याण होईल. सर्वांचीच मुले उन्नत व्हावीत अन् त्यांचे आई-वडील संतुष्ट रहावेत.’

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, फेब्रुवारी २०२५)