Maharashtra Board Exams Cheating : इयत्ता १२ वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यात कॉपीच्या ४२ घटना

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता १२ वीच्या प्रमाणपत्र लेखी परीक्षेला १० फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी घोषित केलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरात एकूण कॉपीच्या ४२ अपप्रकारांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या अल्प आहे.

विभागनिहाय आकडेवारी पहाता पुणे विभागात सर्वाधिक २० प्रकरणे नोंदवण्यात आली. अमरावती विभाग २, नाशिक ४, नागपूर १, छत्रपती संभाजीनगर येथे ३ आणि लातूर विभागात २ प्रकरणे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागात एकही प्रकरण नोंदवलेले नाही. मंडळाकडून परीक्षेच्या वेळी कठोर उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. केंद्र संचालक, पर्यवेक्षक, भरारी पथके, तसेच व्हिडिओ निरीक्षण यंत्रणेमुळे परीक्षेतील अपप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात काही ठिकाणी यश आले; पण काही ठिकाणी नाही.

बीड परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार

बीड तालुक्यातील चौसाळा येथील आर्ट्स अँड सायन्स परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणात कॉपी करण्याचे प्रकार घडले. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी महाविद्यालयाच्या बाहेर पुष्कळ गर्दी दिसत होती. एका दृश्यात परीक्षा केंद्राच्या बाहेरू मोठ्या प्रमाणात काही तरुण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत होते.

संपादकीय भूमिका

  • पहिल्याच दिवशी असे होणे हे शिक्षणक्षेत्रासाठी लाजिरवाणेच होय !
  • बरेचदा कॉपी (नक्कल) होत असल्याचे दिसूनही शिक्षक आणि पर्यवेक्षक त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई केली पाहिजे !