सनातनच्या साधकांनी घेतली प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची भेट

गोवा पुस्तक मेळावा

सचिन पिळगावकर (उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना डॉ. मनोज सोलंकी

पणजी, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील गोवा पुस्तक मेळाव्यात आयोजित करण्यात आलेल्या साहित्यिक सत्रात सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक श्री. सचिन पिळगावकर सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर सनातन संस्थेचे साधक श्री. नारायण नाडकर्णी आणि हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोलंकी यांनी श्री. पिळगावकर यांची सदिच्छा भेट घेतली. दोघांनी श्री. पिळगावकर यांच्या व्यासपिठावरील अभ्यासपूर्ण चर्चेचे कौतुक केले. या प्रसंगी त्यांना सनातन संस्था आणि संस्थेचे भारतभर चालू असलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य, तसेच हिंदु जनजागृती समिती करत असलेले राष्ट्र-धर्म विषयक कार्य यांविषयी माहिती देण्यात आली. त्यांनतर त्यांना रामनाथी येथील सनातन आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. संस्थेच्या कार्याला श्री. सचिन पिळगावकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी आश्रमात येण्याच्या निमंत्रणाचा  स्वीकार करत, ‘पुढच्या गोवा भेटीत मी निश्‍चितपणे सनातन आश्रमाला भेट देईन’, असे सांगितले. या वेळी सचिन पिळगावकर यांना सनातनचा ‘इतिहास-संस्कृती रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

८ फेब्रुवारी या दिवशी गोवा विधानसभेचे सभापती गणेश गावकर यांनी गोवा पुस्तक मेळाव्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. नारायण नाडकर्णी, साधिका सौ. शुभा सावंत, तसेच हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोलंकी उपस्थित होते.

गोवा विधानसभेचे सभापती गणेश गावकर सनातनचे ग्रंथ पहातांना

महोत्वातील इतर सत्रांतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. ७ फेब्रुवारी या दिवशी साहित्यिक सत्रातील ‘ऑथर्स कॉर्नर’मध्ये झालेल्या ‘स्टोरीज ऑफ द सोल : लाइफ, डेथ अँड व्हॉट एंड्युअर्स’ या सत्रात लेखिका मेधा खासगीवाले यांनी संजय चक्राणे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी ‘मृत्यूची भीती का वाटते ?’ आणि ‘शरिराशीच स्वतःची ओळख जोडल्यामुळे ही भीती कशी निर्माण होते ?’, यांवर प्रकाश टाकला. त्यांनी पेशीय स्तरावर शरिराचा मृत्यू आणि जन्म-मृत्यूचे चक्र यांबद्दल भाष्य केले. भौतिक शरीर, सूक्ष्म शरीर (मन, बुद्धी आणि अहंकार) आणि चैतन्याचा समावेश असलेल्या आत्म्याच्या अस्तित्वाची संकल्पना मांडली. तात्त्विक आणि आध्यात्मिक परंपरांवर आधारित चर्चेत त्यांनी अहंकारावर आधारित ओळख आणि शुद्ध चैतन्य यांच्यातील भेद सांगितला. मृत्यू हा मानवाच्या अस्तित्वाचा शेवट नाही, तर शरिरातून ऊर्जा काढून घेतली जाते आणि चैतन्य रहाते, असे त्यांनी सांगितले.

२. ‘अ‍ॅस्ट्रॉलॉजी इन द मुघल एम्पायर’ या परिसंवादात पत्रकार एम्.जे. अकबर यांनी मोगलाच्या काळातील ज्योतिषशास्त्राची भूमिका स्पष्ट केली. ‘युद्ध, राज्याभिषेक, आजारपण अशा प्रसंगी ज्योतिषाचा सल्ला घेतला जात असे’, असे त्यांनी सांगितले.

३. ७ फेब्रुवारी या दिवशी ‘शिवप्रताप’ या भव्य संगीत-नाट्य सादरीकरणाने दिवसभरातील कार्यक्रमांचा शेवट झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, संघर्ष आणि स्वराज्याची स्थापना या संगीत-नाट्य सादरीकरणातून प्रभावीपणे मांडली गेली.