देहली येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त सेवा करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाऊंडेशन’च्या प्रस्तुतीत आणि ‘सनातन संस्थे’च्या आयोजनात नवी देहलीतील ‘भारत मंडपम्’ (इंद्रप्रस्थ) येथे  ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा भव्य सोहळा १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या २ दिवशी पार पडला. त्या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला जाण्यापूर्वी ८ दिवस मी थंडी-ताप याने रुग्णाईत होतो. मी गुरुदेवांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) श्रद्धा ठेवून देहली येथे गेलो. गुरुदेवांच्या कृपेने मला तेथे फारसा त्रास झाला नाही.

श्री. संकेत पिसाळ

२. देहली येथे सेवा करणार्‍या सर्व साधकांचा निवास वेगवेगळ्या ठिकाणी होता, तरीही साधकांना अल्पाहार आणि जेवण वेळेत मिळत होते. त्यामुळे पुढील सेवा वेळेत होत होत्या. ‘हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने आणि साधकांनी केलेल्या परिपूर्ण नियोजनामुळे होत होते’, हे मला अनुभवायला आले.

३. उत्तरदायी साधक सेवा सांगत असल्याने सेवेचा समन्वय व्यवस्थित होत होता.

४. देहली येथे प्रसाराला गेल्यावर ‘गुणात्मक संपर्क कसे करायचे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींना कार्यात कसे जोडायचे ?’, यांविषयी मला शिकता आले.

५. येथे सेवा करतांना मला कधीही थकवा आला नाही. एरव्ही मी सेवा करत असतांना ‘सेवा कशी होणार ?’, असे मला वाटते आणि सेवा केल्यावर थकवा येतो; मात्र महोत्सवाच्या वेळी मला सकारात्मक रहाता आले.

६. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मी पहाटे ६ वाजेपर्यंत सेवा करत होतो. त्यानंतर आम्हाला सर्व आवरून सकाळी ९ वाजता कार्यक्रमस्थळी जायचे होते. तेव्हा मी केवळ १ घंटा झोपलो, तरीही दिवसभर सेवा करतांना मला उत्साह जाणवत होता. तेव्हा ‘गुरुदेवांच्या कृपेने हे सर्व करत आहेत आणि तेच मला शक्ती देत आहेत’, याची मला जाणीव होऊन कृतज्ञता वाटली.

७. माझ्याकडून महोत्सवातील सेवा सहजतेने, नामजप करत आणि भावपूर्ण होत होती. तेव्हा ‘अनेक संत, सद्गुरु आणि ऋषिमुनी हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी नामजप अन् आध्यात्मिक उपाय करत आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या कृपेने मला सेवा करतांना अडथळे आले नाहीत.

‘गुरुदेवांच्या कृपेने मला देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सेवा करण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. संकेत पिसाळ, सोलापूर (१७.१२.२०२५)

इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक