Jalna Scam : जालना येथील २२ तलाठी, ५ महसूल अधिकार्‍यांसह ३१ जणांना अटक !

  • २५ कोटी रुपयांच्या अतीवृष्टी अनुदान घोटाळ्याचे प्रकरण

  • देशातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई !

५ महसूल अधिकार्‍यांसह ३१ जणांना अटक करून नेतांना पोलीस

जालना – अतीवृष्टी अनुदानाच्या नावाखाली अनुमाने २४ कोटी ९० लाख ७७ सहस्र ८११ रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी २२ तलाठी, ५ महसूल अधिकारी, संगणक तज्ञ, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांच्यासह ३१ जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. एका मोठ्या घोटाळ्याने जालना जिल्हा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

२५ कोटी रुपयांचा अपहार कसा उघड झाला ?

जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत अतीवृष्टीमुळे पिकांची हानी झाली होती. सरकारने घोषित केलेले अनुदान गरजू शेतकर्‍यांपर्यंत पोचवण्याऐवजी येथील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांनी संगनमताने एक मोठा कट रचला. बनावट नावे आणि नोंदी करून ज्यांच्या नावावर एक गुंठाही भूमी नाही, अशा व्यक्तींची नावे लाभार्थी सूचीत समाविष्ट करण्यात आली. धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचे ‘लॉग इन’ आणि ‘पासवर्ड’ चोरून प्रणालीमध्ये फेरफार करण्यात आले. घोटाळा उघड होऊ नये; म्हणून कागदोपत्री आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला. जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेल्या चौकशी समितीने हा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आणल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी भ्रमणभाष बंद करून आणि सामाजिक माध्यमांपासून दूर रहात भूमीगत होण्याचा प्रयत्न केला; मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे साहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत ३१ आरोपींना बेड्या ठोकल्या.

न्यायालयाने आरोपींचा जामीन फेटाळला !

आरोपींनी अटक टाळण्यासाठी आधी जिल्हा सत्र न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती; मात्र अन्वेषण अधिकार्‍यांनी मांडलेले ठोस पुरावे आणि घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व आरोपींचे जामीन आवेदन फेटाळून लावले.

मालमत्ता जप्त होणार !

या घोटाळ्यात आतापर्यंत ३५ जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाला आहे. त्यांपैकी ३१ जण कोठडीत आहेत, तर उर्वरित ४ पसार आरोपींचा शोध चालू आहे. विशेष म्हणजे घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींची बँक खाती गोठवली आहेत. डिजिटल पुराव्यांसाठी भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक जप्त केले आहेत. अंबड आणि घनसावंगी तहसील कार्यालयात ‘लॉग इन पासवर्ड’चा गैरवापर करून हा कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही, अशी चेतावणी जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

जालना येथील प्रकरणांमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराची कीड किती खोलपर्यंत गेली आहे ?, हे लक्षात येते. भ्रष्टाचार करणार्‍यांना जन्माची अद्दल घडण्यासाठी या सर्व आरोपींची संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा झाल्याविना भ्रष्टाचार्‍यांवर जरब बसणार नाही !