ग्रामीण पातळीपर्यंत दर्जेदार इंटरनेटसाठी ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ स्थापन !

 

मुंबई – ग्रामीण पातळीपर्यंत ‘ऑप्टीकल फायबर’द्वारे (ऑप्टीकल फायबरद्वारे म्हणजे अतिशय सूक्ष्म काच किंवा प्लास्टिकच्या तंतूमधून प्रकाशाच्या वेगाने इंटरनेट पुरवणे. यामध्ये इंटरनेटचा वेग अधिक असतो.) सक्षम आणि दर्जेदार ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पोचण्यासाठी राज्यात ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. १६ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

भारतनेट फेज १ प्रकल्प ‘भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड’ आणि भारत संचार निगम लिमिटेड यांच्या माध्यमातून राबवण्यात आला. सुधारित ‘भारतनेट फेज २’ च्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायती आणि ग्रामीण भागांतील घरांपर्यंत उच्च गतीने ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी विशेष हेतूने काम करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात येत आहे. या अंतर्गत ‘भारतनेट फेज १ आणि २’ मधील सर्व प्रकरणे या विशेष हेतू संस्थेकडे हस्तांतरित केली जाणार आहेत. भारतनेट फेज २ अंतर्गत महाराष्ट्रातील ८५३ ग्रामपंचायतींमध्ये ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी’ स्थापन करण्यात आली आहे.