कर्करोगावरील उपचार-संशोधनासाठी नागपूर येथे प्रकल्प स्थापन होणार !

मुंबई – कर्करोगावरील उपचार आणि संशोधन यांसाठी नागपूर येथे ‘हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन’ प्रकल्प स्थापन करण्याला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १६ जून या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. ‘महाकेअर आस्थापना’द्वारे हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे कर्करोग निदान, उपचार यांसह संशोधनाला चालना मिळेल. मध्य भारतातील हा एकमेव महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कर्करोगांशी संबंधित रोगांचे निदान या प्रकल्पात होईल.

हिंगणा तालुक्यातील भानसोली (किंही) येथील ३० हेक्टर भूमी या प्रकल्पासाठी देण्यास मान्यता देण्यात आली. अंतिम प्रकल्प अहवालानंतर भूमी, बांधकाम, यंत्रसामग्री, मानव संसाधन इत्यादींसाठी निधी निश्चित केला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि उ‌द्योग विभाग या प्रकल्पासाठी प्रत्येकी ५० टक्के व्यय करणार आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील रुग्णांनाही या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पामध्ये विविध प्रशासकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे.