आयुर्वेद : ‘अर्थसंकल्प २०२६’मधील ‘बळ’ आणि जागतिक शिखराकडे जाणारा आव्हानात्मक प्रवास !

१ फेब्रुवारी या दिवशी सादर झालेल्या ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७’ने ‘आयुष’ क्षेत्राला एक नवी दिशा दिली आहे. अर्थमंत्र्यांनी या क्षेत्रासाठीच्या निधीत वाढ करून तो ४ सहस्र ४०९ कोटी रुपयांपर्यंत नेला आहे. हा भारताच्या प्राचीन वारशाला आधुनिक विज्ञानाची जोड देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी सर्वप्रथम केंद्रशासनाला धन्यवाद आणि अभिनंदन !

१. ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद’मुळे जागतिक स्तरावर आयुर्वेदाची विश्वासार्हता वाढण्यास साहाय्य

या अर्थसंकल्पामधील सर्वांत महत्त्वाची घोषणा, म्हणजे ३ नवीन ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (एआयआयए)’ची स्थापना. जर आपण तुलना केली, तर ज्याप्रमाणे ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ (एम्स) हे आधुनिक वैद्यकशास्त्रात संशोधन आणि उपचार यांचे सर्वोच्च शिखर मानले जाते, तसेच स्थान आता ‘एआयआयए’ला प्राप्त करून देण्याचे सरकारचे ध्येय आहे. ‘एम्स’च्या धर्तीवर  ‘एआयआयए’मध्ये आता केवळ उपचार होणार नाहीत, तर ‘क्लिनिकल ट्रायल’ (वैद्यकीय चाचणी) आणि ‘डेटा’ (माहिती) आधारित संशोधनावर भर दिला जाईल. यामुळे जागतिक स्तरावर आयुर्वेदाची विश्वासार्हता ‘एम्स’इतकीच प्रबळ होईल. मी स्वतः ‘एआयआयए’च्या गोवा शाखेला भेट दिली आहे आणि भविष्यात आयुर्वेदाच्या प्रवासाला पूर्णपणे कलाटणी देण्याचे बळ या संरचनेत आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. देशात आज २० हून अधिक ‘एम्स’च्या शाखा आहेत. ‘एआयआयए’चाही हा आकडा दिसायला फार अधिक वर्षे जाऊन चालणार नाही आणि या तिन्ही संस्था ‘एम्स’प्रमाणे स्वायत्त असतील. वर्तमानातील देहलीस्थित संस्थेच्या शाखा स्वरूपात नसावीत, ही माफक अपेक्षा आहे.

२. ‘अर्थसंकल्प २०२६’मधील आशादायी प्रावधाने (तरतुदी)

वैद्य परीक्षित शेवडे

अ. ‘बायोफार्मा शक्ती योजना’ : १० सहस्र कोटी रुपयांच्या या योजनेमुळे आयुर्वेदाच्या औषधांची निर्मिती करणार्‍या लघुउद्योगांना जागतिक दर्जाची प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञान उपलब्ध होईल.

आ. ‘नॅशनल आयुष मिशन’ : यात झालेली ६६ टक्के वाढ ही ग्रामीण भागातील आयुर्वेदाच्या चिकित्सालयांचे रूप पालटण्यासाठी संजीवनी ठरेल.

इ. ‘डिजिटल हेल्थ इकोसिस्टम’ : आयुर्वेदाच्या उपचारांची नोंद आता डिजिटल पद्धतीने होणार असल्याने संशोधनासाठी मोठी माहिती (डेटा) उपलब्ध होईल.

३. आयुर्वेद क्षेत्राच्या प्रगतीतील काही अडथळ्यांची कारणे

कोणत्याही मोठ्या प्रवासात प्रारंभीला काही अडथळे असतातच. आयुर्वेदाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत :

अ. प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम युद्धपातळीवर चालू असले, तरी बिहार, झारखंड आणि डोंगराळ राज्यांमध्ये हे कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक गतीची आवश्यकता आहे.

आ. सध्या केवळ मोजक्याच केंद्रांकडे ‘एन्.ए.बी.एच्.’ (‘नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’ – रुग्णालयांची गुणवत्ता आणि रुग्ण सुरक्षेसाठी मानके निश्चित करणारी संस्था) मानांकन आहे; मात्र अर्थसंकल्पात ‘क्वालिटी सर्टिफिकेशन’साठी (गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी) दिलेला निधी पहाता आगामी २-३ वर्षांत हे चित्र पालटायला हवे.

इथे हे नमूद करणे अत्यावश्यक आहे की, भारतीय राज्यघटनेनुसार आरोग्य हा राज्यशासनाच्या अखत्यारीतील प्राथमिक विषय आहे. त्यामुळे केंद्राने कितीही प्रावधाने केली, तरी त्या प्रत्यक्षात उतरण्यास राज्यशासनाने सकारात्मकता दाखवणे आवश्यक आहे. अन्यथा निधी न वापरले जाण्याचा आयुर्वेद क्षेत्राचा अभिशाप मागील पानावरून पुढे अव्याहत चालूच राहील !

४. आणखी काय घडणे अपेक्षित आहे ?

अ. गंभीर आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून होणारे उपचार आणि त्यांचे वैज्ञानिक पुरावे यासाठी चीनकडून धडा घेत शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

आ. आजही अनेक खासगी विमा आस्थापने आयुर्वेदाच्या उपचारांसाठी पूर्ण व्यय देत नाहीत. जोपर्यंत सामान्य माणसाला विम्याचे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आयुर्वेदद्वारा अंत्योदय (समाजातील सर्वांत गरीब आणि दुर्बल घटकाचा विकास) शक्य होणार नाही.

इ. आज आयुर्वेदाच्या औषधांना लागणार्‍या ‘वस्तू व सेवा करा’विषयी सावळा कारभार आहे. याविषयी स्पष्टता येणे आवश्यक आहे.

५. वैद्यांनी शास्त्रसेवा म्हणून अथक प्रयत्न करणे अपेक्षित !

आजचा आयुर्वेद हा केवळ ‘घरगुती उपाय’ राहिला नसून ते एक ‘विज्ञानाधिष्ठित शास्त्र’ म्हणून उदयाला येत आहे. जरी अजून बराच पल्ला गाठणे बाकी असले, तरी आपण योग्य मार्गावर आहोत. आयुर्वेदाला केवळ ‘प्रतिबंधात्मक’ म्हणून दाखवण्याचे पाप विविध स्तरांवर चालू आहे; मात्र तो ‘प्रतिबंधात्मक’ आणि ‘उपचारात्मक’ अशा दुहेरी पद्धतीने कसा परिणामकारक आहे, हे प्रत्यक्ष कामातून दाखवण्यासाठी वैद्यांनी अथक प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकाश्रय आणि राजाश्रय हे दोन्ही मिळत असतांना निखळ व्यापारी धोरण किंवा आत्यंतिक वैयक्तिक अभिलाषा यांमुळे निर्माण होत असलेल्या ‘रिल्स’च्या (छोट्या ध्वनीचित्रफितीच्या) महापुरात आयुर्वेदाला हरवून टाकणे, हे कुठे तरी थांबायला हवे. शास्त्राचा प्रसार हा सेवक म्हणून हवा; पुण्यजीवी म्हणून नव्हे. ‘प्रधानं भिषगत्र तु ।’, म्हणून मिरवतांना ‘राजा कालस्य कारणम् ।’, ही दायित्वाची जाणीवही हवी. जनसंपर्काने वैयक्तिक महिमामंडन होईल, शास्त्रसेवा नाही !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१.२.२०२६)