मंदिर विश्वस्तांनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये

विटा (जिल्हा सांगली), २७ जानेवारी (वार्ता.) – पूर्वी मंदिरात हिंदूंना धर्मशिक्षण मिळत होते. हिंदु धर्म संपवायचा असेल, तर धर्मशिक्षण देणारी हिंदूंची मंदिरे नष्ट करायला हवीत, असे प्रयत्न अनेक वर्षे करण्यात आले. आज धर्मशिक्षण मिळत नसल्यामुळे बहुसंख्य हिंदूंना देवळात दर्शन कसे घ्यावे ? देवाला प्रदक्षिणा का आणि किती घालाव्यात ? शिवाला अर्धप्रदक्षिणा का घालतात ? अशा छोट्या गोष्टीही ठाऊक नसतात. मंदिरात येतांना सात्त्विक पोशाख घालावा, हे हिंदूंना सांगावे लागते. हिंदूंना याविषयी अवगत करण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी संघटित होऊन प्रयत्न करायला हवेत, असे मार्गदर्शन सद्गुरु सुश्री स्वाती खाडये यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेणावी येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने २५ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता भक्त निवास येथे ही बैठक पार पडली. मंदिर महासंघाचे सांगली जिल्हा समन्वयक श्री. संजय घाटगे यांनी प्रास्ताविक केले. हिंदु जनजागृती समितीचे सांगली जिल्हा समन्वयक श्री. संतोष देसाई यांनी मंदिर महासंघाच्या कार्याची विस्तृत माहिती दिली. तालुक्यातील वेजेगाव, वाळूज, लेंगरे, नागनाथनगर, रेणावी, विटा येथील मंदिर विश्वस्त आणि सेवेकरी या बैठकीला उपस्थित होते.

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाने प्रभावित झालेले राधा-गिरीधारी मंदिराचे श्री. सुदर्शन बागल म्हणाले, ‘‘आम्ही केवळ भक्ती करत आहोत; पण आज ज्या गोष्टी समजल्या, त्या आम्हाला आजपर्यंत कुणी सांगितल्या नाहीत.’’

उपस्थित मान्यवर

वेजेगाव येथील श्री. बालाजी गुरव, रेणावी येथील श्री. मदन गुरव, श्री. रामचंद्र गुरव, श्री. नवनाथ गुरव, श्री. बाळकृष्ण गुरव, श्री. स्वप्नील गुरव, वाळूज येथील श्री. शुभम गुरव, विटा येथील श्री. जालिंदर चोथे, श्री. सुनील खलिपे, श्री. श्रेयस महाजन, श्री. प्रणव भंडारे, श्री. सोहम भंडारे, नागनाथनगर येथील श्री. नानासो निकम, लेंगरे येथील श्री. सुदर्शन बागल, तसेच मंदिर महासंघाचे खानापूर तालुका समन्वयक श्री. राहुल कदम उपस्थित होते.

बैठकीच्या वेळी उपस्थित असलेल्या (मध्यभागी) सद्गुरु स्वाती खाडये, तसेच विविध गावांतील मंदिरांचे विश्वस्त, सेवेकरी आणि साधक

या वेळी उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मंदिर महासंघाचे जिल्हास्तरीय अधिवेशन रेणावी येथे आयोजित करण्याचा आणि त्यात सक्रीय सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थान, रेणावी येथील मंदिर विश्वस्तांच्या वतीने अध्यक्ष श्री. बालाजी गुरुव यांनी देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मार्च महिन्यात जिल्हास्तरीय एक दिवसीय अधिवेशन आयोजित करण्याचे आणि त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या की,

१. मंदिर महासंघाच्या माध्यमातून आज २ सहस्र ३०१ मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरात सात्त्विक पोशाख परिधान करण्याविषयी जागृती निर्माण झाली आहे.

२. सनदशीर मार्गाने लढा देऊन देवस्थानाच्या हडप केलेल्या भूमी देवस्थानांना परत मिळवून देण्यात मंदिर महासंघाला यश लाभले आहे.

३. अनेक मंदिरांमध्ये धर्मशिक्षणाचे फलक लावण्यात आले आहेत. २६४ मंदिरामध्ये सामूहिक आरती चालू झाली असून मंदिरामध्ये संस्कारवर्ग, धर्मशिक्षणवर्ग चालू झाले आहेत. मंदिर विश्वस्तांनी संघटित होऊन असे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

४. महाराष्ट्र मंदिर महासंघ त्यासाठी प्रयत्नशील असून सर्व मंदिर विश्वस्तांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

क्षणचित्रे :

१. रेवणसिद्ध मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. बालाजी गुरव यांनी धर्मशिक्षण फलक आणि ‘हलाल’ विषयक ग्रंथ विकत घेतले.

२. गोडाचीवाडी येथील श्री दत्त मंदिराचे श्री. नानासो निकम यांनी ‘धर्मशिक्षण फलक’ आणि ‘हिंदु राष्ट्र का हवे’ हा ग्रंथ विकत घेतला.

३. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाने प्रभावित होऊन सनातनच्या धर्मविषयक ग्रंथांना मंदिर विश्वस्तांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.