भारतीय परराष्ट्र धोरणात अलीकडच्या काळात रामायण आणि महाभारत या महान ग्रंथांतील नीतीमूल्ये आणि धोरणे यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. केवळ धार्मिक ग्रंथ म्हणून नव्हे, तर ‘मुत्सद्देगिरी’ आणि ‘धोरणशास्त्र’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी ‘परराष्ट्र धोरणे अस्तित्वात आहेत कि ती केवळ काही संकटे आल्यावर कार्यान्वित होणारी व्यवस्था आहे’, असाच प्रश्न पडत असे; पण तसे आता नाही.
रामायणात प्रभु श्रीरामाने ज्याप्रमाणे मर्यादा आणि न्याय यांचे रक्षण केले, तसेच भारत जागतिक स्तरावरील नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे समर्थन करत आहे. महाभारतातील ‘धर्मयुद्ध’ संकल्पना भारताच्या संरक्षणात्मक धोरणाशी साधर्म्य राखते, म्हणजेच ‘स्वतःहून आक्रमण न करणे; पण अन्याय झाल्यास चोख प्रत्युत्तर देणे’ यांतून या संकल्पनेचा प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे आक्रमणाच्या संदर्भात भारत आततायी कृती न करता नेमकेपणाने आणि अचूक आक्रमण, शत्रू देशातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास न देता शत्रूला धडा शिकवणे यांद्वारे लढाईतसुद्धा नीतीमत्ता दाखवतो.
श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल

महाभारतात श्रीकृष्ण ज्याप्रमाणे कोणत्याही एका पक्षाला पूर्णतः न स्वीकारता ‘धर्माच्या’ (न्याय्य हिताच्या) बाजूने उभा राहिला, तसेच भारताने रशिया-युक्रेन युद्धात भूमिका घेतली. ‘धोरणात्मक स्वायत्तता’ या युद्धाच्या वेळी भारताने घेतलेली भूमिका ही जागतिक राजकारणातील ‘केस स्टडी’ (प्रकरणाचा अभ्यास) मानली जाते. जेव्हा अमेरिका आणि युरोप यांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले, तेव्हा भारतावरही रशियाकडून तेल न खरेदी करण्यासाठी मोठा दबाव होता; मात्र भारताने स्पष्ट केले की, आपल्या जनतेला स्वस्त दरात इंधन मिळणे, हे भारताचे ‘राष्ट्रीय हित’ आहे.पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना प्रत्यक्ष भेटीत ‘आजचे युग हे युद्धाचे नाही’, असे ठामपणे सांगितले. हे विधान इतके प्रभावी ठरले की, नंतरच्या अनेक जागतिक घोषणापत्रांमध्ये याचा वापर करण्यात आला. भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या प्रमुखांशी सतत संवाद ठेवला. हे महाभारतातील श्रीकृष्णाच्या भूमिकेसारखे आहे, जसे तो शांतता प्रस्थापित करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील होता !
– श्री. यज्ञेश सावंत
१. मुत्सद्देगिरी आणि दूत यांचे महत्त्व
रामायण आणि महाभारत यांमधील ‘दूत’ पाठवण्याची परंपरा आजच्या मुत्सद्देगिरीचा पाया मानली जाते. रामायणात हनुमान आणि अंगद यांनी रावणाकडे शिष्टाई केली. युद्ध टाळण्यासाठी केलेला तो शेवटचा प्रयत्न होता. महाभारतात शांतीदूत म्हणून श्रीकृष्णाने पांडवांची बाजू मांडली. भारत आजही युद्धापेक्षा संवाद आणि मुत्सद्देगिरी यांना प्राधान्य देतो, हे वरील उदाहरणांशी साधर्म्य साधणारे आहे.
२. ‘साम, दाम, दंड, भेद’ आणि वास्तववाद

महाभारतातील श्रीकृष्णाची नीती आजच्या ‘वास्तववादी परराष्ट्र धोरणा’चा भाग आहे. प्रत्येक देशाला स्वतःच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करावे लागते. भारताचे सध्याचे धोरण हे केवळ आदर्शवादावर आधारित नसून महाभारतातील मुत्सद्देगिरीप्रमाणे लवचिक आणि परिणामकारक आहे. याला अनेकदा ‘कृष्णाची मुत्सद्देगिरी’, असेही संबोधले जाते.
३. समुद्रमंथन आणि सहकार्य
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्यांच्या ‘The India Way’ (द इंडिया वे) या पुस्तकात महाभारताचे अनेक दाखले दिले आहेत. ज्याप्रमाणे देवांनी असुरांशी मिळून अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले, त्याचप्रमाणे भारत आज जगातील विविध विचारसरणींच्या देशांसह (उदा. अमेरिका आणि रशिया या दोन्हींशी मैत्री) स्वतःच्या हितासाठी सहकार्य करत आहे. आज जग अनेक संकटांतून (‘कोविड’ महामारी, युद्धे, आर्थिक मंदी) जात आहे. अशा वेळी ज्याप्रमाणे मंथनातून विष आणि अमृत दोन्ही बाहेर आले, तसे भारताला जगातील विष (धोके) पचवून अमृत (संधी) शोधायचे आहे.
४. शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध
रामायणात लंकेवर विजय मिळवल्यानंतर प्रभु श्रीरामाने ती स्वतःच्या राज्यात विलीन केली नाही, तर तिथे बिभीषणाचे राज्य स्थापन केले. भारत आजही आपल्या शेजारी राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो आणि ‘नेबरहुड फर्स्ट’ (शेजारधर्म) धोरणाद्वारे त्यांना साहाय्य करतो, त्यांची भूमी कह्यात घेण्याचा उद्देश ठेवत नाही.

५. ‘ऑपरेशन गंगा’ आणि ‘ऑपरेशन अजय’ (हनुमान नीती)
रामायणात ज्याप्रमाणे हनुमानाने संकटात सापडलेल्या सीतेचा शोध घेऊन तिला आधार दिला आणि लंकेतून माहिती मिळवली, तशाच प्रकारे भारताने युद्धजन्य परिस्थितीत आपल्या नागरिकांना वाचवले. युक्रेनमधील युद्धभूमीतून सहस्रो भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढणे (‘ऑपरेशन गंगा’) आणि सुदान किंवा इस्रायल येथील संकटातून भारतियांना वाचवणे (‘ऑपरेशन अजय’), ही भारताची ‘कल्याणकारी मुत्सद्देगिरी’ आहे.
६. ‘व्हॅक्सिन (लस) मैत्री’ आणि ‘सॉफ्ट पॉवर’ (देशाची सांस्कृतिक अन् आध्यात्मिक संस्कृती)
प्रभु श्रीरामाने ज्याप्रमाणे वानरसेना आणि इतर मित्रपक्ष यांना समवेत घेऊन कार्य केले, त्याचप्रमाणे भारताने कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या देशात आवश्यकता असतांनाही जगातील १०० हून अधिक देशांना लस पुरवली. ही भारताची ‘विश्वमित्र’ म्हणून ओळख निर्माण करणारी भूमिका होती, जी रामायणातील परोपकाराच्या मूल्यांशी मिळतीजुळती आहे.
७. ‘जी २०’ शिखर परिषद आणि ‘एकता’

(‘जी २०’ म्हणजे १९ देश आणि युरोपीयन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर यांची संघटना.)
भारताने वर्ष २०२३ मध्ये ‘जी २०’चे यजमानपद भूषवतांना ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण जग एक कुटुंब आहे.) हा मंत्र दिला. महाभारतात युधिष्ठिराने ज्याप्रमाणे राजसूय यज्ञात सर्वांना एकत्र आणले होते, तसेच भारताने विकसित आणि विकसनशील देशांमधील दरी न्यून करण्याचे काम केले. ‘आफ्रिकन युनियन’ला ‘जी २०’चे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवून देणे, ही भारताची मोठी मुत्सद्दी खेळी होती.
वर्ष २०२३ ची ‘जी २० परिषद’ ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक सुवर्णक्षण ठरली. भारताने केवळ आर्थिक विषयांवर चर्चा न करता ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’, हा मंत्र दिला. हे रामायणातील सर्वसमावेशक मूल्यांचे प्रतीक आहे.
अ. नवी देहली घोषणापत्र : रशिया आणि चीन यांच्या विरोधानंतरही भारताने सर्व देशांना सामायिक मसुद्यावर सहमती दर्शवण्यास पहिल्याच दिवशी भाग पाडले. ही भारताची मुत्सद्देगिरी आणि ‘कौशल्यपूर्ण शिष्टाई’ यांची मोठी पावती होती. (२.१.२०२६)

‘नेबरहुड फर्स्ट’ (शेजारधर्म) धोरण
भारताच्या परराष्ट्र धोरणाचा सर्वांत महत्त्वाचा भाग, म्हणजे ‘नेबरहुड फर्स्ट’ (शेजारधर्म – शेजारच्यांच्या साहाय्याला धावून जाणे) धोरण आहे. ज्याप्रमाणे प्रभु श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवूनही ती स्वतःच्या राज्यात सामील केली नाही, तर तेथील लोकांच्या हितासाठी बिभीषणाला राज्य सोपवले, तसेच भारताचे धोरण आहे.
अ. श्रीलंका जेव्हा आर्थिक संकटात होती, तेव्हा भारताने ४ अब्ज डॉलर्सचे (अनुमाने ३२ सहस्र कोटी रुपये) साहाय्य केले. हे साहाय्य कोणत्याही अटींविना होते, जेणेकरून तेथे स्थैर्य रहावे.
आ. नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याशी केवळ व्यापारी संबंध न ठेवता भारत ‘सांस्कृतिक आणि भावनिक’ संबंध जपण्यावर भर देतो.
इ. भारत स्वतःला ‘बिग ब्रदर’ (हुकूम गाजवणारा मोठा भाऊ) न मानता एक ‘उत्तरदायी शेजारी’ मानतो, जो संकटाच्या वेळी सर्वांत आधी धावून जातो (उदा. कोरोना महामारीच्या काळात शेजारी देशांना दिलेली लस).
– श्री. यज्ञेश सावंत
८. चीनशी सीमेवरील संघर्ष (शक्ती आणि संयम)
चीनसमवेतच्या लडाख सीमावादात भारताने महाभारतातील ‘दंड’नीतीचा वापर केला. एका बाजूला चर्चेची दारे उघडी ठेवली (मुत्सद्देगिरी), तर दुसर्या बाजूला सीमेवर सैन्याची मोठी जमवाजमव करून आणि पायाभूत सुविधा वाढवून चीनला चोख प्रत्युत्तर दिले. ही ‘बळासह शांतता’ राखण्याची रणनीती आहे. चीन असो वा पाकिस्तान, भारताने स्वतःची भूमिका मांडतांना अंगदासारखा पाय रोवला आहे (ठाम भूमिका घेतली आहे). ‘जोपर्यंत आतंकवाद थांबत नाही, तोपर्यंत चर्चा नाही’, हे पाकिस्तानला दिलेले उत्तर, म्हणजे भारताची पालटलेली रणनीती आहे.

९. चीनसमवेतच्या गुंतागुंतीच्या संबंधांवर महाभारतातील प्रभावी रणनीती
चीनविषयी बोलतांना डॉ. एस्. जयशंकर नेहमीच महाभारतातील नीतीचा संदर्भ देतात. त्यांच्या मते चीनसमवेतचे संबंध सध्या ‘असामान्य’ आहेत. चीनने लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला, तेव्हा भारताने तातडीने सैन्य तैनात केले. हे महाभारतातील ‘शक्तीने शक्तीचा प्रतिकार करणे’ या धोरणासारखे आहे. भारत आता केवळ शांततेच्या गप्पा मारत नाही, तर स्वतःची सामरिक शक्तीही दाखवून देतो. चीनवरील अवलंबित्व न्यून करण्यासाठी भारताने अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली आणि स्वदेशी उत्पादनांवर भर दिला. ‘शत्रूच्या आर्थिक नाड्या आवळणे’, ही महाभारतातील एक प्रभावी रणनीती आहे.
भारत आता कुणाच्याही दबावाखाली निर्णय घेत नाही. महाभारताप्रमाणेच धोरण ठरवतांना देशाचे हित कशात आहे ? याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. केवळ स्वतःचा विचार न करता जगाच्या कल्याणाचा विचार करण्यावर भर आहे, हे यातून दाखवून दिले.
१०. जागतिक राजकारणात भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण चाली !
अ. जेव्हा अमेरिकेने पाकशी जवळीक करतांना पाकचे युद्धखोर सैन्यप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले, त्यांचा सन्मान केला. पाकला पुन्हा एकदा आर्थिक साहाय्य घोषित केले, तेव्हा भारताने अफगाणिस्तानातील तालिबानला जवळ केले. त्यांच्या परराष्ट्रमंत्र्याला भारत भेटीसाठी बोलावले. भारतात त्यांना सन्मानाची वागणूक दिली. त्यांना अनेक रुग्णवाहिका भेट दिल्या. पाक आणि तालिबान सध्या एकमेकांचे शत्रू झाले आहेत, त्यांमुळे ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, या न्यायाने भारताने तालिबानला साहाय्य केले. वास्तविक भारताने तालिबानला मान्यता दिलेली नाही.
आ. अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात कर लावला, व्यापारी निर्बंध घातले, तेव्हा भारताने चीनलाही जवळ केले. भारत-चीन यांच्यात अधिकाधिक व्यापार वाढवण्याचे सूतोवाच केले. इराणवर अणू कार्यक्रम राबवत असल्यामुळे अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर आक्रमणे करणे, निर्बंध लादणे करत असले, तरी भारत मात्र भारताला मध्य-पूर्वेत समुद्री मार्गे व्यापार करण्यासाठी अन् अन्य महत्त्व असल्यामुळे इराणमधील चाबहार बंदर विकसित करून देत आहे.
शेजार्यांसाठी भारत ‘राम’ आहे, जो साहाय्य, सन्मान करतो आणि समवेत घेऊन चालतो. शत्रूसाठी भारत ‘कृष्ण’ आहे, जो शांततेसाठी प्रयत्न करतो; पण वेळ पडल्यास समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता ठेवतो. या धोरणांमुळे जागतिक राजकारणात भारताची प्रतिमा एक ‘सक्षम’ आणि ‘स्वतंत्र’ राष्ट्र म्हणून निर्माण झाली आहे.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल (२.१.२०२६)
महाभारतातील व्यक्तीरेखांप्रमाणे केलेली मुत्सद्देगिरी !

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्यांच्या ‘The India Way (द इंडिया वे)’ आणि ‘Why Bharat Matters (व्हाय भारत मॅटर्स)’ या पुस्तकांमध्ये महाभारतातील व्यक्तीरेखा आणि प्रसंग यांचा अभ्यास करून आधुनिक मुत्सद्देगिरीचे अत्यंत प्रभावी विश्लेषण केले आहे.
भगवान श्रीकृष्ण
जगातील सर्वांत मोठे मुत्सद्दी श्रीकृष्ण होते. त्यांनी कोणत्याही शस्त्राविना केवळ रणनीतीच्या जोरावर युद्धाचा निकाल पालटला. पांडवांकडे सैन्य न्यून असूनही त्यांनी ‘शक्तीपेक्षा युक्ती’चा वापर केला.
१ अ. भारताचे धोरण : भारत आज जगाला हेच दाखवून देतो की, आम्ही केवळ शक्तीवर अवलंबून नसून योग्य वेळी योग्य रणनीती वापरण्यावर भर देतो.
बहुविध समन्वय आणि महाभारत
आजच्या काळात भारत एकाच गटात (उदा. केवळ अमेरिका किंवा केवळ रशिया) सामील न होता सर्वांशी संबंध ठेवतो. डॉ. जयशंकर याचे वर्णन महाभारतातील ‘युती’ करण्याच्या कौशल्याशी करतात. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी दोन्ही बाजूंनी आपापल्या मित्रराष्ट्रांची जमवाजमव केली होती.
डॉ. जयशंकर म्हणतात की, ज्याप्रमाणे अर्जुनाने श्रीकृष्णाला निवडले आणि दुर्योधनाने नारायणी सेनेला, तसाच विचार भारताला करावा लागतो, म्हणजेच संख्येपेक्षा गुणवत्तेला आणि धोरणात्मक भागीदारीला महत्त्व देणे.
‘कर्ण’ आणि ‘शल्य’ यांची मानसिकता
अ. कर्ण : अत्यंत पराक्रमी असूनही चुकीच्या बाजूने लढल्यामुळे त्याचा अंत झाला. हे चुकीच्या जागतिक युती निवडल्याने होणार्या हानीचे प्रतीक आहे.
आ. शल्य : युद्धाच्या वेळी पांडवांच्या बाजूने होता; परंतु कौरवांचे सारथ्य करून तो कर्णाचे मनोधैर्य खच्ची करत होता. डॉ. जयशंकर यांच्या मते देशाच्या आत बसून देशाच्या धोरणांवर विनाकारण टीका करणार्यांवर ही ‘शल्य नीती’ लागू करावी.
‘हनुमान’ आणि माहिती गोळा करणे
‘रामायणा’चा संदर्भ देतांना डॉ. जयशंकर म्हणतात, ‘हनुमान हे केवळ ‘भक्त’ नव्हते, तर ते एक उत्तम रणनीतीकार आणि गुप्तहेर होते. शत्रूच्या गोटात (लंकेत) जाऊन तेथील माहिती काढणे, तेथील शक्तीचे अनुमान घेणे आणि परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे, हे एका आधुनिक मुत्सद्याचे काम आहे.’
– श्री. यज्ञेश सावंत
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !