‘एका हातात माळ आणि दुसर्‍या हातात भाला’, हा मंत्र सांगणारे गुरु गोविंदसिंह !

गुरु गोविंदसिंह

१. मोगलांकडून गुरु गोविंदसिंह यांच्या २ पुत्रांची हत्या, तसेच आई आणि पत्नी यांचा मृत्यू !

गुरु गोविंदसिंह, त्यांचे मोठे पुत्र अजित सिंह आणि झुंजार सिंह यांच्यासह चमकौर किल्ल्यात रहाणार्‍या मोगलांविरुद्ध रणनीती आखण्यात अन् कार्यवाहीत आणण्यात व्यस्त होते. तेथे पोचण्यापूर्वी त्यांची आई, २ पुत्र झोरावर सिंह आणि फतेह सिंह पुरात त्यांच्यापासून वेगळे झाले होते. युद्धात व्यस्त असलेले गुरु गोविंदसिंह त्यांना शोधण्याऐवजी एक सुरक्षित जागा शोधून त्यांच्या विखुरलेल्या सैन्याचे संघटन करण्यास निघाले. मग एके दिवशी मुखवाल आणि आनंदगड येथील काही दूतांनी त्यांच्यासाठी संदेश आणला. दूत म्हणाले, ‘गुरुजी, तुम्हाला सोडून गेलेले शीख गावात पोचले, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना फटकारले. ते तुमची क्षमा मागण्यासाठी येथे आले आहेत.’ गुरु आनंदाने म्हणाले, ‘ही फार चांगली बातमी आहे. सर्वांनी त्यांचे अपसमज बाजूला ठेवून धर्मयुद्धात एकत्र आले पाहिजे. जर तुम्हाला आमची आई आणि दोन्ही मुले यांच्याविषयी काही बातमी असेल, तर कृपया आम्हाला सांगा.’

संदेशवाहकांनी दोन्ही राजपुत्रांच्या हुतात्मा होण्याची बातमी आणली होती; पण गुरुजींना धक्का बसेल, या भीतीने ते त्यांना लगेच सांगू शकले नाहीत. त्यांनी प्रश्न टाळला आणि म्हणाले, ‘मोगल सैन्य लवकरच चमकोरला आक्रमण करण्यासाठी निघणार आहे.’ ही बातमी आव्हान म्हणून घेत गुरुजी म्हणाले, ‘तुम्ही माझी मुले आणि आई यांची बातमी आणू शकत नाहीत; कारण ते शत्रूसमोर शरण गेले आहेत किंवा त्यांच्या धर्मापासून दूर गेले आहेत.’ संदेशवाहकांना लगेच रडू कोसळले. ते दबलेल्या आवाजात म्हणाले, ‘गुरुजी, असे म्हणू नका. दोन्ही राजपुत्रांनी धर्माच्या नावाने स्वतःचे बलीदान दिले. सरहिंदच्या नवाबाच्या धमक्या आणि प्रलोभने यांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. आमच्या डोळ्यांसमोर त्यांना किल्ल्याच्या भिंतीत जिवंत गाडण्यात आले. ही बातमी ऐकताच आईने छतावरून उडी मारून प्राणत्याग केला.’

पिता म्हणून नाही, तर धर्माचे रक्षक आणि संस्कृतीचे रक्षणकर्ता म्हणून गुरु गोविंदसिंह हे वृत्त ऐकून म्हणाले, ‘धन्य हो, माझ्या मुलांनो ! तुम्ही आज धर्माची प्रतिष्ठा वाढवली आहे.’ ‘तुम्ही दाखवून दिले आहे की, अन्य धर्मीय होण्यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे बलीदान देण्यास प्राधान्य द्याल.’ तिघांच्या मृत्यूची बातमी ऐकूनही द्विगुणीत उत्साहाने मोगलांशी लढण्याची प्रतिज्ञा करणारे गुरु गोविंदसिंह यांचा जन्म अशा क्षणी झाला, जेव्हा परकीय आक्रमक वारंवार आक्रमण करत होते आणि अंतर्गत फूट अन् द्वेष यांमुळे कुठेही संघटित विरोध करण्याचा मार्ग सापडत नव्हता.

गुरु गोविंदसिंह यांच्या दोन्ही मुलांना किल्ल्याच्या भिंतींमध्ये जिवंत गाडण्यात आले, तसेच त्यांच्या दुःखाने आई आणि पत्नी यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक बातमी ऐकूनही गुरु गोविंदसिंह विचलित झाले नाहीत. ते त्यांच्या रडणार्‍या सहकार्‍यांना धीर देत म्हणाले, ‘बंधूंनो, तुम्ही असे वृत्त ऐकून रडत आहात, जी गोष्ट ऐकून परमानंद झाला पाहिजे. मुलांनी त्यांचे प्राण दिले; पण त्यांचा धर्म पालटला नाही ! ही आनंदाची गोष्ट आहे. भीती आणि लोभ यांमुळे त्यांनी त्यांचा धर्म सोडला असता, तर ती वाईट गोष्ट झाली असती. जर तुम्ही जीवनाचे सार पहाण्याऐवजी नश्वर शरिरांचा शोक करत असाल, तर ते योग्य नाही.’

गुरु गोविंदसिंह पुढे म्हणाले, ‘हे रहस्य समजून घ्या. भूमीवर दोन रेषा काढा.’ सहकार्‍यांनी रेषा काढल्या. त्यांनी पुन्हा म्हटले, ‘आता त्यांना पुसून टाका.’ सहकार्‍यांनी रेषा पुसल्या. गुरु गोविंदसिंह यांनी विचारले, ‘या रेषा काढतांना तुम्हाला काही आनंद झाला का ?’ सहकारी म्हणाले, ‘नाही !’ ‘या पुसतांना तुम्हाला काही वेदना झाल्या का ?’, असे गुरु गोविंदसिंह यांनी पुन्हा विचारले. सहकारी म्हणाले, ‘नाही !’

गुरु गोविंदसिंह यांनी स्पष्ट केले, ‘मानवी शरिरे त्याच प्रकारे समजून घ्या. ती या रेषांसारखी निर्माण होत रहातात आणि पुसली जातात. जो कुणी जन्माला येतो, एक दिवस त्याचा मृत्यूही होतो. ते २ कुमारही या रेषांप्रमाणे अस्तित्वात आले आणि पुसले गेले. त्यांनी धर्मासाठी त्यांचे प्राण अर्पण केले आहेत; म्हणून त्यांचा मृत्यू हा आनंदाचा विषय आहे, दुःखाचा नाही.’ गुरूंचे सार वचन ऐकून सर्वांना ज्ञान झाले आणि आनंदित होऊन त्यांनी ‘सत् श्री अकाल’, असा जयघोष केला.


अंधश्रद्धाविरोधी गुरु गोविंदसिंह !


शीख पंथाचे १० वे गुरु गुरु गोविंदसिंह हे केवळ एक महान योद्धे नव्हते, तर ते एक अत्यंत बुद्धीमान आणि धर्मपरायण होते. त्यांची धर्माप्रती असलेली निष्ठा प्रगल्भ होती. ते धर्मासाठी जगले आणि धर्मासाठीच हुतात्मा झाले. धर्मावर त्यांची अढळ श्रद्धा असूनही ते थोडेही अंधश्रद्धाळू नव्हते. ते नेहमीच शिखांचे संघटन आणि शक्ती वाढवण्याच्या काळजीत असत. त्यांच्या या काळजीचा एका पंडिताने लाभ घेण्याचे ठरवले. तो गुरु गोविंदसिंह यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘जर तुम्हाला शिखांची शक्ती वाढवायची असेल, तर देवी दुर्गेचा यज्ञ करा. त्या यज्ञाच्या अग्नीतून देवी प्रकट होईल आणि शिखांना शक्तीचा आशीर्वाद देईल.’ गुरु गोविंदसिंह यज्ञ करण्यास सहमत झाले. पंडितांनी यज्ञ चालू केला. काही दिवसांच्या यज्ञानंतरही देवी प्रकट झाली नाही, तेव्हा त्यांनी पुजार्‍याला सांगितले, ‘महाराज, देवी अद्याप प्रकट झालेली नाही.’ पुजार्‍याने उत्तर दिले, ‘देवी अजूनही प्रसन्न झालेली नाही. प्रसन्न होण्यासाठी तिला बलीदान हवे आहे. जर तुम्ही कुणा पुरुषाचा बळी दिला, तर ती प्रसन्न होऊन दर्शन देईल. त्या बलीदान देणार्‍याला स्वर्ग मिळेल.’
देवतेला प्रसन्न करण्यासाठी मानवी बलीदानाची सूचना ऐकून गुरु गोविंदसिंह यांना पुजार्‍याची धूर्तता समजली. त्यांनी पुजार्‍याला धरले आणि म्हणाले, ‘आपल्याला बलीदानासाठी याहून चांगला पुरुष कुठे मिळेल ? देवी तुमच्या बलीदानाने प्रसन्न होईल आणि तुम्हीही स्वर्ग प्राप्त कराल. अशा प्रकारे आपल्या दोघांचेही काम होईल.’ गुरु गोविंदसिंह यांचे वर्तन पाहून पुजारी घाबरला. गुरु गोविंदसिंह यांनी बलीदान दुसर्‍या दिवसासाठी पुढे ढकलले आणि पुजार्‍याला एका खोलीत ठेवले. घाबरलेला पुजारी गुरु गोविंदसिंह यांच्या पाया पडला आणि गयावया करू लागला, ‘मला कल्पना नव्हती की, बलीदानाचा विषय माझ्यावर उलटेल. गुरुजी, कृपया मला जाऊ द्या. मी तुमची क्षमा मागतो.’ गुरु गोविंदसिंह म्हणाले, ‘तुम्ही आता का घाबरत आहात ? बलीदान स्वर्गात घेऊन जाईल. बलीदानाची चर्चा केवळ तेव्हाच चांगली वाटते, जेव्हा ती इतरांसाठी असते ! आपल्या डोक्यावर आल्यावर सत्य उघड पडले ना !’ पुजारी म्हणाला, ‘महाराज, कृपया मला क्षमा करा ! मी पुन्हा कधीही असे बोलणार नाही.’ गुरु गोविंदसिंह यांनी त्याला सोडले आणि समजावले, ‘समाजात अशी अंधश्रद्धा पसरवणे योग्य नाही. देवी तिच्या नावाने कुणाचा जीव घेतल्याने आनंदित होत नाही. तिच्या नावाने केलेल्या चांगल्या कर्मांनी ती प्रसन्न होते.’ नंतर गुरु गोविंदसिंह यांनी त्याला प्रवासाची रक्कम देऊन परत पाठवून दिले.
– डॉ. नितीन सहारिया

२. धर्मासाठी लढतांना गुरु गोविंदसिंह यांच्या अन्य २ पुत्रांचे बलीदान

डॉ. नितीन सहारिया

तरुण राजपुत्रांच्या बलीदानाची बातमी थोडी झाली नव्हती की, पुढील बलीदानाचा क्षण आला. मोगलांनी मोठ्या सैन्यासह चमकौर किल्ल्यावर आक्रमण केले आणि सर्व बाजूंनी वेढा घातला. साधनसंपत्ती आणि साहित्य यांची न्यूनता असूनही गुरु गोविंदसिंह लढत राहिले; परंतु शेवटी सर्व रसद अन् सैनिक यांच्या नावाने ‘नाही’चा उच्चार होऊ लागला, तेव्हा युद्धभूमीत लढून स्वतःचे बलीदान देण्याचा निश्चय करण्यात आला.

गुरु गोविंदसिंह अंगावर शस्त्रे चढवून निघाले, तेव्हा त्यांचे ज्येष्ठ पुत्र अजित सिंह हात जोडून म्हणाले, ‘पिताजी, तुम्ही नाही, तर तुमच्या आधी मी युद्धाला जाईन.’ गुरु गोविंदसिंह यांचा उत्साह द्विगुणित झाला. ते म्हणाले, ‘अजित, तू अजूनही लहान आहेस. शत्रूची शक्ती पुष्कळ आहे. अशा वेळी मैदानात उतरणे, म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे. तू किल्ल्यात राहून मला जाऊ दिले, तर बरे होईल.’ अजित दुःखी होऊन म्हणाला, ‘तुम्ही आम्हाला धर्मासाठी बलीदान देण्यापासून थांबवू इच्छिता.’ गुरु गोविंदसिंह यांनी त्या शूर मुलाच्या भावना समजून घेतल्या आणि त्याला स्वतःच्या हातांनी सशस्त्र करून युद्धाला पाठवले. अजित सिंह शेकडो शत्रूंना मारून हुतात्मा झाला, तेव्हा गुरु गोविंदसिंह उद्गारले, ‘धन्य अजित सिंह ! धर्मासाठी स्वतःचे बलीदान देऊन तू अमर झाला आहेस.’ दुसर्‍यांदा त्यांचा दुसरा मुलगा झुंजार सिंह याने युद्धात जाण्याची अनुमती मागितली. गुरु गोविंदसिंह यांनी त्याला शस्त्रसज्ज केले. सहकारी सैनिक म्हणाले, ‘गुरुजी, हे तुम्ही काय करत आहात ? तुम्ही आधीच ३ पुत्रांचे बलीदान दिले आहे. आता तुम्ही या एकमेव उरलेल्या पुत्राचेही बलीदान द्याल का ? तुम्ही कुटुंबाचा प्रकाश विझवाल का ?’ गुरु गोविंदसिंह म्हणाले, ‘हे दुःखद आहे की, त्याच्या बलीदानानंतर मला मुलगा रहाणार नाही. बंधूंनो, कुटुंबाचा प्रकाश पुत्रांच्या शरिरांनी नाही, तर त्यांच्या चांगल्या कर्मांनी प्रकाशित होतो, जे हे सर्व जण करतच आहेत’, असे म्हणत त्यांनी त्यांच्या चौथ्या मुलालाही युद्धात पाठवले आणि त्याचे बलीदान स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले; परंतु त्यांनी उसासा टाकला नाही.

अशा प्रकारे त्यांचे २ तरुण पुत्र अजित सिंह आणि झुंजार सिंह हेही युद्धांत कामी आले. आपल्या १ सहस्र ५०० शिष्यांसह धैर्याने कूच करत त्यांनी ४० सहस्र बलवान मोगल सैन्याचा पराभव केला. गुरु गोविंदसिंह म्हणाले होते, ‘चिड़िया से मैं बाज लडावा, सवा लाख से एक लडावा । तब जाके गुरु गोविंदसिंह नाम कहावा ।’ (पक्षांशी मी गरुडाला लढवीन, सव्वा लाख सैन्याशी माझा एक सैनिक लढेल, तरच मला गुरु गोविंदसिंह म्हटले जाईल.)

३. धर्मरक्षणाला ईश्वरभक्तीची जोड

गुरु गोविंदसिंह यांनी भक्तीपूर्ण शीख धर्माला एक नवीन दिशा दिली. त्यांनी अन्याय आणि अनैतिकता यांच्या प्रतिकाराला आस्तिकता किंवा ईश्वरभक्तीचा पर्याय आहे, हे सांगितले. अशा प्रकारे त्यांनी ‘एका हातात माळ आणि दुसर्‍या हातात भाला’ देऊन मोठ्या संख्येने धर्मप्रेमींना धर्मयुद्धाच्या व्यासपिठावर आणून उभे केले. युद्धकलेशी अपरिचित असलेले त्यांचे सैन्य जेव्हा युद्धात उतरले, तेव्हा त्यांची प्रचंड भावना पहाण्यासारखी होती. त्यांनी कोमल हृदयाच्या लोकांकडे सेवा कर्तव्ये सोपवली, तर धाडसी आणि शूर योद्ध्यांना तलवार दिली. त्यांचे धर्मयुद्ध कोणतीही विचारसरणी किंवा संप्रदाय यांच्या विरुद्ध नव्हते, तर दडपशाही आणि बलपूर्वक धर्मांतर यांच्या विरोधात होते.

हा संघर्ष करत असतांना त्यांनी कधीही त्यांच्या उपासनेच्या क्रमामध्ये दुर्लक्ष केले नाही. त्यांनी सतत धार्मिक साहित्य निर्माण केले, त्यांच्या अनुयायांमध्ये भक्ती निर्माण केली आणि त्यांच्या सैन्यात शौर्य निर्माण केले. ते केवळ ४२ वर्षे जगले आणि एका मुसलमान शिष्याने विश्वासघात केल्यानंतर नांदेडमध्ये हुतात्मा झाले. या अल्पावधीत गुरु गोविंदसिंह यांनी जो पुरुषार्थ आणि पराक्रम गाजवला, त्याचीच परिणती आज या धार्मिकदृष्ट्या सहिष्णु भारताच्या रूपात दिसून येते. आवश्यकतेनुसार महापुरुषांना पुनर्जन्म घ्यावा लागला आहे. आज परत ‘माला आणि भाला’ या मंत्राचे जीवनात पालन करणार्‍यांची वेळ आली आहे. संस्कृतीचे रक्षण किंवा राष्ट्राची सुरक्षा असो, अन्यायाचा सामना करणारे भावनाशील आणि प्रखर शूरवीर हे नेहमीच उपयुक्त ठरले आहेत. आज जेव्हा श्रद्धेवरील संकट वाढत आहे आणि मानवी मूल्यांचा र्‍हास होत आहे, तेव्हा गुरु गोविंदसिंह यांच्या सैन्याच्या परंपरेतच समाजाचे रक्षण करण्यासाठी ज्यांचा स्वाभिमान जागृत असेल, अशा धाडसी लोकांनी भारताचे रक्षण करण्यासाठी संघटित झाले पाहिजे.

– डॉ. नितीन सहारिया, महाकौशल, मध्यप्रदेश.