श्री गणपतिविषयी अनन्यसाधारण माहिती !

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुक्ल चतुर्थी ! तेव्हापासून श्री गणपति आणि चतुर्थी यांचा संबंध जोडला गेला. माघ शुक्ल चतुर्थी ही ‘गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य, म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते.

१. श्री गणेश जयंतीला गणेशतत्त्वाचा लाभ होण्यासाठी करावयाची उपासना

या दिवशी श्री गणपतीचा भावपूर्ण नामजप ३ ते ९ माळा करावा. त्याचप्रमाणे श्री गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास श्री गणपतीची शक्ती आणि चैतन्य यांचा अधिक लाभ होतो. ‘गणपति अथर्वशीर्ष’ म्हटल्यासही लाभ होतो.

२. शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात ?

श्री गणपति हा दिशांचा अधिपति आहे. गणेशपूजन केल्यामुळे दिशा मोकळ्या करतो. त्यामुळे ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती पूजास्थानी येऊ शकते. श्री गणपति (नाद) भाषेचे देवांच्या (प्रकाश) भाषेत रूपांतर करतो. त्यामुळे मनुष्याच्या प्रार्थना देवांना कळतात. श्री गणपति विघ्नहर्ता आहे.

३. श्री गणपतीचे वाहन

‘वृ-वह’, म्हणजे वहाणे यापासून ‘वाहन’ हा शब्द बनला आहे. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या वेळी पालटते. उंदीर हे श्री गणपतीचे नित्याचे वाहन; पण त्याची इतरही वाहने आहेत. उदाहरणार्थ हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्वराचे वाहन मोर आहे.

४. विद्यार्थ्यांसाठी उपासना

अ. अथर्वशीर्षाचे पठण : मुलांनो, आपल्या वाणीत चैतन्य असले की, आपल्या बोलण्यात गोडवा येतो.अथर्वशीर्षाच्या पठणाने स्वतःचे उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीत गोडवा येतो. यासाठी प्रतिदिन अथर्वशीर्षाचे पठण करा.

आ. अधिकाधिक प्रार्थना : आपण ज्या भाषेत बोलतो, तिला नादभाषा म्हणतात. इतर देवतांपेक्षा गणपतीला आपली भाषा अधिक कळते; म्हणून अधिकाधिक प्रार्थना करून त्याची कृपा संपादन करावी.

इ. मानसपूजा : मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा. मानसपूजेमुळे मनाला उत्साह मिळतो. याला कोणतेच बंधन नसते. आपल्याला या पूजेद्वारे देवतेच्या आवडीची वस्त्रे आणि आवडीची वस्तू देता येते. आपण मनाने सतत श्री गणपतीच्या सहवासात राहून आनंदी राहू शकतो.’

(साभार : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’ आणि विविध संकेतस्थळे)