आज ‘रथसप्तमी’ आहे. त्या निमित्ताने…
२४ महाकाय रथचक्रे, दगडात कोरलेली; पण अशा कौशल्याने की, वाटावे लाकडातून कोरलेली ही खरीखुरी रथचक्रे आहेत. या चाकांना जोडणारा आख (दोन्ही चाकांना जोडणारा जाड लोखंडी दांडा) आणि त्यावर बसवलेली कानखीळही (जेव्हा रथाचे चाक तुटते, तेव्हा गळून पडणार्या भागाला ‘कानखीळ’ म्हणत असत.) तशीच, अगदी खर्या रथाच्या चाकांसारखी ! तो २४ चाकांचा महाकाय रथ बघतांना आपण स्थळकाळाचे भान हरपून जातो. वाटते, आता कोणत्याही क्षणी सारथी चाबूक उगारेल आणि रथाला जुंपलेले ७ विराट अश्व क्षणात विजेच्या वेगाने दौडू लागतील. त्या घोड्यांची नावे तरी कशी सुंदर आणि अर्थपूर्ण; ‘गायत्री’, ‘वृहति’, ‘उष्णिक’, ‘जगती’, ‘त्रिष्टुप’, ‘अनुष्टुप’ आणि ‘पंक्ति’ ही संस्कृत काव्यछंदांची नावे. त्या ७ घोड्यांचे लगाम हाती धरलेला सारथी तो ‘अरुण’ आणि त्या अलौकिक रथाचा स्वामी, म्हणजे साक्षात् सूर्यदेव !
सहस्ररश्मी भगवान सूर्यदेव त्याच्या ७ अश्वांच्या रथात बसून उदयास्ताच्या दिवसभराच्या प्रवासाला निघाले आहेत, या पौराणिक कथेला दिलेले सुरेख मूर्तस्वरूप, म्हणजे ओडिशामधील कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्यमंदिर ! हे मंदिर मी जेव्हा प्रथम बघितले, तेव्हा मी कितीतरी वेळ अक्षरशः अवाक् होऊन उभी होते. कोणार्कच्या सूर्यमंदिराची कितीही छायाचित्रे बघितलेली असले, तरी जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ती विराट रथचक्रे आणि त्यावर विसावलेला तो महाकाय रथरूपी सभामंडप पहाता, तेव्हा कितीही अरसिक असला, तरी तुमच्या अंगावर रोमांच उभे राहिल्याखेरीज रहात नाहीत. कोणार्कचे हे मंदिर, म्हणजे ‘दगडात रचलेली एक पवित्र सूर्यऋचा’ आहे.
– सौ. शेफाली वैद्य, प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ व्याख्यात्या आणि लेखिका, पुणे.

१. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या स्थळमाहात्म्याविषयीची कथा
कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या स्थळमाहात्म्याविषयी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. श्रीकृष्णपुत्र सांब कुष्ठरोगाने ग्रस्त झाला होता. श्रीकृष्णाने त्याला सूर्यदेवाची उपासना करायला सांगितली. कुष्ठरोगातून मुक्त होण्यासाठी सांबाने ओडिशा राज्यात येऊन चंद्रभागा नदीच्या तीरावर सूर्योपासना केली. सांबाला नदीपात्रात सूर्यमूर्ती सापडली आणि त्याने चंद्रभागा नदी समुद्राला मिळते, त्या पवित्र ठिकाणी प्रथम सूर्यमंदिर उभारले, अशी येथील भाविकांची धारणा आहे. आज चंद्रभागा नदी सुकून गेली आहे. समुद्रही मंदिरापासून ३ कि.मी. मागे गेलेला आहे. आज कोणार्कमध्ये जे मंदिर उभे आहे, ती वास्तू १३ व्या शतकात बांधली गेली आहे. गंगवंशीय राजा पहिला नरसिंहदेव आणि त्याची पत्नी सीतादेवी यांनी हे सूर्यमंदिर उभारले.
२. राजा नरसिंह देव याने मामलुक राजवटीवर निर्णायक विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणजे कोणार्कचे भव्य सूर्यमंदिर !

पहिला नरसिंहदेव हा अत्यंत शूर आणि कर्तबगार राजा होता. त्याने पार पूर्व बंगालपर्यंत मुसंडी मारून मामलुक सुलतान तुघरील तुघन खान याचा पराभव केला आणि इतर अनेक शत्रूंवर विजय मिळवून कलिंगाचे राज्य संघटित केले. या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने कोणार्कचे सूर्यमंदिर बांधायला घेतले आणि आपला कीर्तीस्तंभ तिथे उभा केला. तो अरुणस्तंभ सध्या जवळच्याच जगन्नाथ पुरी येथे श्री जगन्नाथ मंदिरासमोर आहे. यवनांवर निर्णायक विजय मिळवला; म्हणून राजा नरसिंह देवाने ‘यवनवाणीबल्लव’ आणि ‘अमीरमानमर्दन’ अशा २ उपाधी धारण केल्या. थेट शत्रूच्या प्रदेशात सैन्यासह मुसंडी मारून कटासीनच्या किल्ल्यात झालेल्या युद्धात राजा नरसिंह देवाने इस्लामी मामलुक राजवटीवर निर्णायक विजय मिळवला. त्या विजयाचे प्रतीक, म्हणजे कोणार्कचे हे भव्य सूर्यमंदिर ! एका हिंदु राजाने आपल्यापेक्षा कितीतरी बलाढ्य अशा इस्लामी राज्यावर आक्रमण करून शत्रूच्या प्रदेशात घुसून मिळवलेल्या या दैदीप्यमान विजयाची गोष्ट दुर्दैवाने आपल्या इतिहासाच्या पुस्तकात नाही आणि कधीही आपल्याला कुणीही सांगितलेली नाही. आपण घोकल्या त्या केवळ मोगल वंशावळ्या !
‘कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या निर्मितीसाठी १२ सहस्र स्थापत्य आणि शिल्पी १२ वर्षे काम करत होते अन् या मंदिराच्या उभारणीसाठी राजा नरसिंहदेव यांनी त्यांचे १२ वर्षांचे उत्पन्न व्यय केले’, असे अकबरकालीन इतिहास ग्रंथ ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये नमूद केलेले आहे.
३. कोणार्कच्या मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगड आणि मंदिराची बांधणी
कोणार्कच्या सूर्यमंदिरासाठी ‘वालुकाश्म’ आणि ‘क्लोराईट शिस्ट’ अशा २ प्रकारचा दगड वापरला आहे. मला ओडिशामधील एका शिल्पकाराने त्या दगडांची ‘फूल खाडिया’ आणि ‘मुग्नी’ अशी स्थानिक नावे सांगितली होती. ‘वालुकाश्म’ हा दगड खडबडीत; पण टणक, तर ‘क्लोराईट शिस्ट’ खाणीतून काढल्यावर मऊ असतो; पण पुढे ऊन, वारा, पाऊस यांमुळे टणक होत जातो. नवीन दगड मऊ असल्यामुळे स्थापत्य आणि शिल्पकार यांना अतिशय बारीक अन् नाजूक कोरीव काम करणे सोपे होते. कोणार्कची रथचक्रे बघतांना त्यावरचे शिल्पांकन अगदी दागिन्यांच्या तोडीचे वाटते, ते या दगडामुळे ! कोणार्कच्या मंदिराच्या बांधणीत वास्तूकला आणि शिल्पकला यांचा इतका सुंदर संगम झालेला आहे की, वास्तूचे सौष्ठव आणि प्रमाणबद्धता बघणार्याला अधिक भुरळ घालते की, मंदिरावरचे कोरीव काम हे सांगता येत नाही.
४. मंदिराचा सभामंडप आणि मंदिराची स्थापत्यशैली
सध्या अस्तित्वात असलेल्या सूर्यरथाच्या स्वरूपातील सभामंडप, ज्याला कलिंग स्थापत्याच्या भाषेत ‘जगमोहन’ हे नाव आहे. त्याचीच उंची जवळजवळ ४० मीटर आहे. त्याच्या पाठीमागे असलेले गर्भगृह आणि मुख्य शिखर यांनी मिळून बनलेल्या रेखा पहाता देवळाची उंची त्याच्या जवळजवळ दुप्पट असली पाहिजे, असे पुरातत्व शास्त्रज्ञांचे मत आहे. जगमोहनाच्या पुढे त्याच्या अर्ध्या उंचीचा नटमंडप आहे. चढत्या भाजणीने वाढत जाणारी मंदिराच्या विविध भागांची उंची भाविकांची दृष्टी आपसूकच रेखा मंदिराच्या कळसाकडे नेते. ही उर्ध्वगामी दृष्टीरेषा हे नागर मंदिरांच्या स्थापत्यशैलीचे विशेष वैशिष्ट्य आहे.
५. मंदिराच्या वास्तूचे ३ मुख्य भाग
कलिंग स्थापत्यशैली हा नागर शैलीचाच एक उपप्रकार मानला जातो. कलिंग स्थापत्याप्रमाणे मंदिराच्या वास्तूचे ३ भाग असतात.
अ. गर्भगृह म्हणजे ‘रेखा देऊळ’, ज्याचे शिखर उंच आणि निमुळते असते अन् वर गोलाकार आमलक असतो.
आ. रेखा देवळाच्या पुढे असतो, तो मुख्य सभामंडप, ज्याला त्याच्या ‘पिरॅमिड’सारख्या शिखरामुळे ‘पिढा देऊळ’ असे नाव आहे. यालाच ‘भद्र देऊळ’ किंवा ‘जगमोहन’ असेही म्हणतात. रेखा देऊळ उंच आणि निमुळते असते, तर पिढा देऊळ बुटके आणि पसरट असते. दोन्ही वास्तूंची उंची आणि आकार यांमध्ये एक सुंदर समन्वय असतो, ज्यामुळे दर्शनाला आलेल्या भाविकांना भव्यतेची, दिव्यतेची अनुभूती येते.
इ. जगमोहनाच्याही पुढे ‘नटमंडप’ किंवा ‘नृत्यमंडप’ असतो, जो आकाराने सगळ्यात लहान असतो.
या तिन्ही वास्तूंची प्रमाणबद्धता कोणार्कमध्ये इतकी सुरेख जमून आलेली आहे की, आज भग्नावस्थेतही मंदिर पाहून आपण पूर्णपणे भारावून जातो आणि मनात विचार येतोच की, पूर्णावस्थेतील रेखा देऊळ, त्यातील सूर्यनारायणाची मूर्ती, त्याला जोडून असणारे त्याच्या रथाच्या स्वरूपातील भव्य भद्र देऊळ अन् त्या पुढील नृत्यमंडप या सर्व वास्तू त्यांच्या वैभवाच्या परमशिखरावर असतांना किती देखण्या दिसत असतील !
६. कोणार्कच्या सूर्यमंदिराचे वैशिष्ट्य
कोणार्कच्या सूर्यमंदिराचे वैशिष्ट्य, म्हणजे येथील भद्र देऊळ किंवा जगमोहन. कोणार्कच्या रथचक्रांची छायाचित्रे आपण सर्वांनीच पाहिली असतील; पण एकेकट्या रथचक्राचे छायाचित्र बघणे आणि प्रत्यक्ष अतीभव्य आकाराच्या रथाप्रमाणे रचलेले ते संपूर्ण वास्तूस्थापत्य अनुभवणे, यात पुष्कळ मोठी तफावत आहे. ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’, असे म्हणतात खरे; पण कोणार्कचा हा भव्य सूर्यरथ प्रत्यक्षात इतका भव्य आहे की, कुठलीही प्रतिमा त्यापुढे फिकीच वाटेल. मुळात दगडाचे विशाल सूर्यमंदिर रथाच्या आकारात कल्पून ते प्रत्यक्षात आणणे, ही कल्पनाच किती उदात्त आहे !
७. सूर्यमंदिराच्या भग्नावशेषांची झालेली दुःस्थिती
असे म्हणतात की, राजा नरसिंहदेवाच्या काळात जेव्हा सूर्य मंदिर बनवले, तेव्हा त्यावर २० टन वजनाचा प्रचंड लोहचुंबक होता; पण जवळच समुद्र असल्यामुळे खलाशांच्या सागरी मार्गक्रमणात होकायंत्राला अडथळा होऊ लागल्याने तो चुंबकच काढला. त्या वेळी मंदिराला झालेली इजा आणि पुढे १६ व्या शतकात काला पहाड नावाच्या क्रूरकर्मा इस्लामी सरदाराने ओडिशा स्वारीत या मंदिराचा केलेला विध्वंस यांमुळे मंदिराचा बराच भाग कोसळला होता. मंदिर भग्न झाल्यावर लोकांनी तिथे जाणे बंद केले आणि कोणार्कचे मंदिर हळूहळू वाळूने भरू लागले. रेतीत अर्धवट गाडले गेलेले हे मंदिर नंतर वर्ष १८९३ मध्ये ब्रिटीश पुरातत्व शास्त्रज्ञांनी उकरून काढले. पुढे भारतीय पुरातत्व विभागाने या प्राचीन वास्तूवरील वाळूचे प्रचंड आवरण दूर करण्याचे काम वर्ष १९०१ पासून हाती घेतले. आज जे मंदिर आपल्याला दिसते, ते भग्नावस्थेत आहेत. मंदिराचा गाभारा उद्ध्वस्त झालेला आहे. बाहेरच्या देवकोष्ठातील काही सूर्यमूर्ती वस्तूसंग्रहालयात गेलेल्या, तर काही गायब झालेल्या आहेत. मुख्य गाभार्यातील सूर्यमूर्ती कुठे आहे ? ते कुणालाच माहिती नाही. जगमोहनाची परिस्थिती नाजूक आहे, तसेच इतर लहान-मोठे भाग उद्ध्वस्त झालेले आहेत. ब्रिटिशांनी आत वाळू भरून वास्तू पूर्णपणे ‘सील’ केली आणि बाहेर टेकूसाठी लोखंडी पिंजरा उभारलेला आहे. एकूण वास्तूच्या सौंदर्याशी तो पिंजरा अत्यंत विसंगत आणि कुरूप दिसतो.
८. मंदिराच्या संवर्धना चे उपाय करणे महत्त्वाचे !
ब्रिटीश काळात वर्ष १९०३ मध्ये मंदिराच्या गर्भगृहात भरलेली वाळू स्थैर्यासाठी वापरली गेली होती. ती वाळू अनुमाने १२२ वर्षांनंतर आता भारतीय पुरातत्व विभागाने टप्प्याटप्प्याने काढण्याची प्रक्रिया चालू केली आहे. ‘कोअर ड्रिलिंग’ सारख्या नियंत्रित पद्धतींचा वापर करून मंदिराच्या संरचनेला हानी न पोचवता आतील भागाची पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेमुळेमंदिराचा मूळ पाया, भिंती आणि आतील दगडी बांधकाम यांची सद्यःस्थिती पाहून त्यावर आवश्यक संवर्धन उपाय करता येणार आहे. जर काम व्यवस्थित झाले, तर आपल्याला या मंदिराच्या भव्य जगमोहन, म्हणजे सभामंडपात कधीतरी भविष्यात प्रवेश मिळू शकतो ! शिल्पकला आणि स्थापत्य या दोन्ही गोष्टींनी नटलेले कोणार्कचे सूर्यसू मं र्य दिर पहातांना एकाच वेळी अभिमान आणि विषाद अशा परस्परविरोधी भावना दाटून येतात. प्रत्येक भारतियाने पाहिलेच पाहिजे, असे हे मंदिर आहे.
– सौ. शेफाली वैद्य, प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ व्याख्यात्या आणि लेखिका, पुणे.
सूर्यरथाच्या चक्रावर, तसेच मंदिरावर दर्शवलेली वैशिष्ट्ये म्हणजे शिल्पकार आणि स्थापत्य यांचे एकमेवाद्वितीय कौशल्य !

एका उंच, प्रशस्त जगतीवर म्हणजे जोत्यावर, हा विराट मंदिररूपी रथ उभा आहे. जगतीच्या चारही भिंतींवर मिळून १२ चक्रांच्या जोड्या कोरलेल्या आहेत, ज्या वर्षाच्या १२ मासांचे प्रतीक आहेत. १२ फूट व्यासाच्या प्रत्येक चक्राला ८ बारीक आणि ८ जाड आर्या कोरलेल्या आहेत. या ८-८ आर्या, म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे प्रत्येकी ८ प्रहर आहेत. सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले ७ अश्व, म्हणजे सप्ताहाच्या ७ दिवसांचे प्रतीक आहे. बरे शिल्पकाराचे आणि स्थापत्याचे कौशल्य केवळ इथेच संपत नाही, मंदिराच्या काही चक्रे, म्हणजे वेळ दाखवणारी सौरघड्याळे आहेत. सूर्याचे किरण आर्यांच्या मध्यावर पडून त्याची सावली वेळेनुसार प्रत्येक आरीवर येते. प्रत्येक आरीवर बारीक पट्टी आहे, त्यावर वेळेनुसार त्या काळची आदर्श दिनचर्या कशी होती ? ते दाखवले आहे, म्हणजे दुपारपर्यंत कामे, मग थोडी वामकुक्षी, त्यानंतर मनोरंजन, सायंकाळची कामे आणि रात्री झोप इत्यादीचे बारकाईने शिल्पांकन केले आहे. हे सर्व समजून घ्यायचे असेल, तर आपल्याला कोणार्कमध्ये चांगला प्रशिक्षित ‘गाईड’ (पर्यटक मार्गदर्शक) घेणे आवश्यक आहे; कारण या मंदिरात शिल्पांची इतकी लयलूट आहे आणि त्यामागचा कार्यकारणभाव इतका गहन आहे की, ‘गाईड’ नसला, तर ९० टक्के बारकावे आपल्याला उमजणारच नाहीत.
– सौ. शेफाली वैद्य
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !