Shaksgam Valley Dispute : (म्हणे) ‘जम्मू-काश्मीरमधील शक्सगाम खोरे आमचे !’ – चीनचा दावा

चीन बांधत आहे पाकिस्तानपर्यंतचा रस्ता !

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग (उजवीकडे)

बीजिंग (चीन) – भारताच्या जम्मू-काश्मीरमधील शक्सगाम खोर्‍याचा परिसर चीनचा असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. या खोर्‍यातून चीन पाकपर्यंत जाण्यासाठी ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग’ बांधत आहे. पाकिस्तानने वर्ष १९४८ मध्ये शक्सगाम खोर्‍यावर अवैध नियंत्रण मिळवले होते आणि वर्ष १९६३ मध्ये हा परिसर चीनला सोपवला होता.

(म्हणे) ‘स्वतःच्या परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करणे हा चीनचा अधिकार !’

चीनच्या सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’नुसार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, ज्या परिसराविषयी प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत, तो चीनचाच भाग आहे. आपल्या परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करणे हा चीनचा अधिकार आहे आणि यावर कोणताही प्रश्‍न उपस्थित केला जाऊ शकत नाही. चीन आणि पाकिस्तान यांनी १९६० च्या दशकात सीमा करार केला होता अन् दोन्ही देशांमध्ये सीमा निश्‍चित करण्यात आली होती. हा निर्णय दोन सार्वभौम देशांनी त्यांच्या अधिकारांनुसार घेतला होता.

महामार्गाचा काश्मीरच्या प्रश्‍नावरील चीनच्या भूमिकेचा कोणताही संबंध नाही !

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाविषयी माओ निंग म्हणाल्या की, हा एक आर्थिक सहकार्य प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश स्थानिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देणे अन् लोकांचे जीवनमान सुधारणे आहे. चीन-पाक सीमा करार आणि महामार्ग यांचा काश्मीरच्या सूत्रावर चीनच्या भूमिकेशी कोणताही संबंध नाही अन् या प्रकरणात चीनची भूमिका पूर्वीसारखीच आहे. काश्मीर हा इतिहासाशी संबंधित एक गुंतागुंतीचा प्रश्‍न आहे, जो भारत आणि पाकिस्तान यांनी थेट आपापसात चर्चा करून शांततापूर्ण मार्गाने सोडवला पाहिजे. चीन संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा आणि आंतरराष्ट्रीय करारांचा आदर करतो.

आम्ही चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग प्रकल्पाला मान्यता देत नाही ! – भारत

परराष्ट्र मंत्रालयाच्या ९ जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले होते की, शक्सगाम खोरे भारताचा भाग आहे. आम्ही वर्ष १९६३ मध्ये झालेल्या तथाकथित चीन-पाकिस्तान सीमा कराराला कधीही मान्यता दिली नाही. आम्ही तो करार अवैध मानतो; कारण तो भारताच्या अशा भागातून जातो, जो पाकिस्तानच्या बेकायदेशीर कह्यात आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य भाग आहेत. ही गोष्ट पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही अनेक वेळा स्पष्टपणे सांगितली गेली आहे.

संपादकीय भूमिका

  • चीनची मानसिकता पहाता उद्या संपूर्ण काश्मीरच त्याचा भाग असल्याचा दावा त्याने केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • भारताने या भागात बांधण्यात येणार्‍या रस्त्याचे बांधकाम थांबवण्यासाठी सैनिकी कारवाई करण्याचे धाडस दाखवणे आवश्यक आहे !