योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची साधकाने अनुभवलेली प्रीती !

१०.११.२०२५ या दिवशी मला पहाटे स्वप्नात प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे दर्शन झाले. तेव्हा मला त्यांच्या सान्निध्यातील प्रसंग आठवले.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

१. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची अनुभवलेली प्रीती !

श्री. स्वप्नील भोसले

१ अ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी साधकाच्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद देणे आणि लक्ष्मीप्रसाद देणे : ‘वर्ष २०११ मध्ये मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करत होतो. त्या वेळी एकदा योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे देवद आश्रमात शुभागमन झाले होते. त्या वेळी त्यांनी आश्रमातील सर्व साधकांना लक्ष्मीप्रसाद म्हणून काही पैसे पाकिटात घालून दिले होते. या कार्यक्रमाच्या संदर्भातील एका सेवेनिमित्त मी आश्रमाच्या बाहेर सतत ये-जा करत होतो. त्या वेळी योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी साधकांना सांगितले, ‘‘कुणी साधक लक्ष्मीप्रसाद घ्यायला आले नाहीत. जे साधक आले नाहीत, त्यांना माझ्याकडे पाठवा. मी त्यांना लक्ष्मीप्रसाद देतो.’’

मी सायंकाळी सेवा पूर्ण करून आश्रमात आलो. तेव्हा साधकांनी मला विचारले, ‘‘योगतज्ञ दादाजी विचारत आहेत, ‘‘कुणी साधक लक्ष्मीप्रसाद घेण्याचे राहिले आहेत का ? तू दिवसभर कुठे होतास ?’’ मला साधकांनी त्वरित योगतज्ञ दादाजींकडे जायला सांगितले. ‘मी आश्रमात नाही’, हे योगतज्ञ दादाजींनी ओळखून मला बोलावून घेतले. मी योगतज्ञ दादाजींच्या खोलीत जाऊन त्यांना नमस्कार केला. तेव्हा महान संतांच्या सर्वज्ञतेची मला अनुभूती आली. योगतज्ञ प.पू. दादाजींनी माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला आशीर्वाद दिला. मला त्यांचे अलौकिक दर्शन झाल्यामुळे मी भावविभोर झालो. ‘त्यांनी मला बोलावून घेऊन आशीर्वाद आणि लक्ष्मीप्रसाद दिला’, त्याबद्दल मला त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ती आठवण मी हृदयात कायमस्वरूपी जपून ठेवली आहे. योगतज्ञ दादाजींसारख्या महान संतांचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेला लक्ष्मीप्रसादाचा अमूल्य ठेवा मी जपून ठेवला आहे.

१ आ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी साधकांसाठी देवद आश्रमाच्या जवळ असलेल्या गाढी नदीत जलानुष्ठान करणे आणि आश्रमात यज्ञ करणे : योगतज्ञ दादाजींनी देवद आश्रमाच्या जवळ असलेल्या गाढी नदीत जलानुष्ठान केले होते. त्या वेळी मला त्यांचे जवळून दर्शन झाले होते. ‘जलात राहून अशी तपश्चर्या करणे किती कठीण आहे !’, हे मी तेव्हा पाहिले होते. त्यानंतर प.पू. दादाजींनी देवद आश्रमात एक यज्ञ केला होता. ‘वयस्कर संत आपल्यासाठी किती करतात !’, हे जाणून मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.

२. दत्तावतारी संत योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या कृपाशीर्वादामुळे साधकाला विविध दत्तक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेता येणे

मला दत्तावतारी संत योगतज्ञ दादाजींचे जवळून दर्शन लाभले. त्यामुळे मी दत्तात्रेयांची पवित्र तीर्थक्षेत्रे नृसिंहवाडी, औदुंबर, माणगाव, कुरवपूर आणि गिरनार यांठिकाणी जाऊन दर्शन घेऊ शकलो. त्याबद्दल मी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याच कृपाशीर्वादाने मला दत्तावतारी संत योगतज्ञ दादाजींचे दर्शन लाभले’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. स्वप्नील भोसले, ढवळी, फोंडा, गोवा. (१४.११.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक