
तुळजापूर – श्री तुळजाभवानीदेवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास २८ डिसेंबरला घटस्थापनेने भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता मुख्य यजमान श्री. उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली. या निमित्ताने ७ दिवस चालणार्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचा अधिकृत प्रारंभ झाला.

या प्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, उपाध्ये सुनीत (बंडू) पाठक, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमराराजे कदम, अनंत कोंडो, लेखाधिकारी संतोष भेंकी, साहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि भक्तीभावाने मंदिर परिसर मंगलमय झाला.
यापूर्वी गेल्या आठ दिवसांपासून चालू असलेली देवीची मंचकी निद्रा आज पहाटे पौष शुक्ल अष्टमीच्या शुभमुहूर्तावर पूर्ण होऊन श्री तुळजाभवानीदेवीची सिंहासनावर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री तुळजाभवानीदेवीचे प्रत्येक वर्षी आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र आणि पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र असे दोन प्रमुख उत्सव साजरे केले जातात. शाकंभरी नवरात्र उत्सवाला तुळजापुरात ‘धाकटा दसरा’ म्हणूनही ओळखले जाते.

या नवरात्र काळात २९ डिसेंबर या दिवशी रथ अलंकार महापूजा, ३० डिसेंबर या दिवशी मुरली अलंकार महापूजा, ३१ डिसेंबर या दिवशी शेषशायी अलंकार महापूजा आणि सकाळी ७ वाजता जलयात्रा, १ जानेवारी या दिवशी भवानी तलवार अलंकार महापूजा, तर २ जानेवारी या दिवशी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. प्रत्येक रात्री देवीचा छबीना (मिरवणूक) निघणार असून तुळजापूरनगरी भक्ती, श्रद्धा आणि उत्सव यांच्या वातावरणाने भारावून गेली आहे. ७ दिवस चालणार्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता ३ जानेवारी या दिवशी शाकंभरी पौर्णिमेला दुपारी १२ वाजता पूर्णाहुती आणि घटोत्थापना यांनी होणार आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !