श्री महालक्ष्मीदेवी आणि श्रीक्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांना प्रारंभ !

कोल्हापूर, १७ डिसेंबर – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी आणि श्रीक्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. श्री महालक्ष्मीदेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ३४ कोटी ७८ लाख रुपयांची कामे मंदिर परिसरात केली जाणार आहेत. जोतिबा देवस्थान परिसरात मंदिर संवर्धनाशी संबंधित ३३ कोटी ९० लाख रुपयांची कामे केली जाणार आहेत. ही कामे राज्य पुरातत्व विभागाकडून केली जाणार असून विभागाने निविदा मागवून या कामांना प्रारंभ केला आहे.

पहिल्या टप्प्यात मंदिरांचे तुटलेले भाग नव्याने करणे, मंदिर परिसरातील उडालेले रंग परत देणे, फरशांचा थर काढून मूळ उंचीवर परत दगडी फरशी घालणे, भुयारी गटारीची दुरुस्ती, श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरातील ६४ योगिनी पूर्ववत् करणे यांसह अन्य कामांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील आचारसंहिता संपताच या संदर्भातील भव्य कार्यक्रम घेण्यात येणार आहे.