विधीमंडळात प्रवेशासाठी प्रवेशपत्रिकांची दीड सहस्र रुपयांत विक्री !

नागपूर विधिमंडळ

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अभ्यागतांना प्रवेश देणारी प्रवेशपत्रिका (पास) दीड सहस्र रुपयांत विकली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी १२ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केला. या प्रकारांमुळे आतंकवादीही विधानभवनात सहज शिरू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश तालिका सभापती कृपाल तुमाने यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी काही आमदारांच्या तक्रारीनंतर अभ्यागतांसाठी प्रतिदिनच्या प्रवेशपत्रिका देण्यावर बंदी घालण्यात आली होती, तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही हिवाळी अधिवेशन चालू होताच सर्व सदस्यांना प्रवेशपत्रिकाविना कुणालाही विधानभवन परिसरात आणू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते; मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच २ दिवसांत २३ आमदारांनी विनापास लोकांना आत नेल्याचे उघड झाले होते.

हिवाळी अधिवेशनाच्या ५ व्या दिवशी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी थेट विधान परिषदेत हे सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले, ‘‘माझ्या कार्यकर्त्यांकडे आमदारांचे पत्र असूनही त्यांना प्रवेशपत्रिका मिळाली नाही. ते दिवसभर बाहेर उभे होते; पण बाहेर दीड सहस्र रुपये देऊन प्रवेशपत्रिका मिळत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा पद्धतीने विधीमंडळाची सुरक्षा धोक्यात आली आहे. कुणी पैसे घेऊन प्रवेशपत्रिका लागू केली, याची चौकशी व्हावी’’, अशी त्यांनी मागणी केली.

संपादकीय भूमिका :

विधीमंडळात प्रवेशासाठी प्रवेशपत्रिकांची विक्री होत असेल, तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार कधीतरी थांबेल का ?