Shankhnad Mahotsav Delhi : सनातन धर्माच्या रक्षणासाठी मानसिक, बौद्धिक अन् आध्यात्मिक पातळीवर शौर्यजागरण करण्याची वेळ ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था  

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव २०२५

सत्र : सनातन भारताचा शंखनाद

सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक

भारत मंडपम्, देहली : आज शहरी नक्षलवाद, फुटीरतावादी, तसेच भारतविरोधी घटक देशाला अस्थिर करण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. ‘वोकिझम’ला (जभगरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणार्‍या विकृतीला) चालना, विकृत मनोरंजन, धर्मनिरपेक्षतावादाच्या नावाखाली सज्जनांचे दमन, भाषावाद, ‘जेन झी’ला (वर्ष १९९६ ते वर्ष २०१० या कालावधीत जन्मलेल्या पिढीला) फसवे उत्तेजन’, अशा माध्यमांतून आज गो-गंगा-गायत्री, वेद-पुराणे-ज्ञानभांडार, मंदिरे-संस्कृती-संस्कार आदी सनातन आस्था केंद्रांना लक्ष्य केले जात आहे.‘टेरिफ वॉर’ (व्यापार युद्ध) सारख्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताला दडपण्याचा प्रयत्न होत आहे. अशा परिस्थितीत शूर भारतीय सैनिक रणांगणात शौर्य गाजवून भारताच्या सीमा सुरक्षित ठेवतील; पण एक संस्कृतीनिष्ठ नागरिक म्हणून आपण मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक पातळीवरही शौर्यजागरण करण्याची वेळ आली आहे, असे जाज्वल्य विचार सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या व्यासपिठावरून बोलतांना व्यक्त केले.

श्री. वर्तक म्हणाले,

‘‘भारतियांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि शत्रूंचे मनोबल खच्ची करण्यासाठी मानसिक शौर्य आवश्यक आहे, तसेच भारत ही तपोभूमी असल्याने आध्यात्मिक शौर्य जागरणासाठी आपल्याला साधनेचे बळही वाढवावे लागेल. ‘संस्कृतीविहिन भारत स्वतःला अधिक काळ सुरक्षित ठेवू शकणार नाही’, हे लक्षात घेऊन या सनातन राष्ट्राच्या धगधगत्या यज्ञकुंडात समिधारूपाने समर्पित होण्याची आज आवश्यकता आहे.’’