‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात मुंबईत जनक्षोभ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मैदानात !

वसई येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर महाविद्यालया’तील विद्यार्थ्यांचा हात उंचावून ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’ला पाठिंबा

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात मोहीम उघडली असतांना दुसरीकडे अमली पदार्थ सेवन आणि तस्करी यांची पार्श्वभूमी असलेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला मात्र पायघड्या घातल्या जात आहेत. याविषयी मुंबईमध्ये जनक्षोभ वाढत आहे. ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात ‘नशाविरोधी संघर्ष अभियान’ मैदानात उतरले असून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक महाविद्यालयांनी अमली पदार्थविरोधी मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. मुंबईमध्ये १९, २० आणि २१ डिसेंबर या कालावधीत ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या अंतर्गत याविषयी विविध महाविद्यालये आणि समाज येथे जनजागृती केली जात आहे. स्कॅनरद्वारे स्वत:ची प्रतिक्रिया नोंदवणे, सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करणे, महाविद्यालयांमध्ये माहिती देणे, हस्तपत्रकांचे वितरण, सामाजिक माध्यमांवरून प्रबोधन करणे आदी माध्यमांतून ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध करण्यात येणार आहे.

‘सनबर्न फेस्टिव्हल’ रहित करावा, ही युवक-युवतींची मागणी ! – प्रा. शुभदा चव्हाण, नवा समाज मंडळ पदवी महाविद्यालय, विलेपार्ले (पूर्व)

यापूर्वी गोव्यामध्ये ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आले आहेत. यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन झाल्याचे आढळून आले. गोव्यात झालेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये अमली पदार्थांमुळे काही तरुणांना स्वत:चे प्राणही गमवावे लागले. या कार्यक्रमासाठी अमली पदार्थ पुरवणार्‍या अनेकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हेही नोंदवले आहेत. या कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘केटामाईन’ या ‘रेप ड्रग्ज’च्या (रेप ड्रग्ज -पेयाद्वारे नकळत युवतींना अमली पदार्थ देऊन त्यांचे लैंगिक शोषण करण्यासाठी या अमली पदार्थाचा उपयोग केला जातो, यावर बंदी आहे.) अनेक बाटल्याही आढळल्या आहेत. हे सर्व धोके लक्षात घेऊन मुंबईतील ‘सनबर्न फेस्टिव्हल’ रहित करावा, अशी युवक-युवतींची मागणी आहे.

‘नवा समाज मंडळ पदवी महाविद्यालया’त ‘सनबर्न फेस्टिव्हल’ विरोधात भूमिका मांडताना श्री. बळवंत पाठक

स्वाक्षरी मोहिमेत शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग !

वसई येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर महाविद्यालय’, विलेपार्ले (पूर्व) येथील ‘नवा समाज मंडळ पदवी महाविद्यालय’ यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांमुळे होणार्‍या हानीविषयी जनजागृती करण्यात आली. या महाविद्यालयांमध्ये ‘सनबर्न फेस्टिव्हल’ रहित करण्यात यावा’, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. शेकडो विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून या अभियानाला पाठिंबा दिला. या वेळी जनजागृतीसाठी हस्तपत्रकांचेही वितरण करण्यात आले. या पत्रकामागील ‘क्यू.आर्. कोड’ ‘स्कॅन’ करून महाविद्यालयीन युवक-युवतींनी या अभियानाला सक्रीय पाठिंबा दिला.

‘नवा समाज मंडळ पदवी महाविद्यालया’त प्रबोधन करतांना ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या सौ. धनश्री केळशीकर

अनेक महाविद्यालयांमध्ये जनजागृती !

‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या अंतर्गत मुंबईत आतापर्यंत ३४ महाविद्यालये आणि खासगी शिकवणीवर्ग यांमध्ये (क्लासेस) जनजागृती करण्यात आली आहे. मुंबईच्या जिल्हाधिकारी श्रीमती आचल सूद गोयल, मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था सहआयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी, मुंबई दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त श्री. अभिमन्यू देशमुख यांना आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, अमली पदार्थविरोधी पथकाचे आयुक्त आदींना निवेदन देण्यात आले आहे.