
ज्याच्या अंगी गुरुभक्ती त्याला नाही कशाची भीती ।।
१. दत्त संप्रदायाचे दैवत – श्री दत्तात्रेय !
भारतीय संस्कृतीमध्ये विविध पंथ, संप्रदाय आणि त्यांची आराध्य दैवते प्रचलित आहेत. त्यात दत्त संप्रदाय प्राचीन आहे. श्री दत्तात्रेय हे त्यांचे उपास्यदैवत आहे. श्री दत्तात्रेय ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत.
१ अ. विश्वगुरु : श्री दत्तात्रेय ‘विश्वगुरु’ म्हणून संबोधले जातात. उपनिषदकारांनी ‘श्री दत्तात्रेय हे विश्वगुरु आहेत’, असा गौरव केलेला आढळतो आणि त्याची प्रचीती युगायुगांमध्ये भक्तांना येते.
१ आ. स्मर्तृगामी : श्री दत्तात्रेय स्वेच्छाधारी आणि स्मर्तृगामी (स्मरण करताच उपस्थित असणारे) आहेत. ‘ते स्मरण करणार्या भक्तास त्वरित भेटतात किंवा दर्शन देतात’, अशा अनुभूती भक्तांना येतात.
१ इ. विहार : श्री विश्वगुरु दत्तात्रेय यांची विहार स्थळे म्हणून माहूर, पांचाळेश्वर, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी स्थाने उल्लेखली जातात.
२. दत्त संप्रदायाची वैशिष्ट्ये
२ अ. योगमार्गाला महत्त्व : श्री दत्तात्रेय हे योगी आहेत. उपनिषदांमध्ये श्री दत्तात्रेय हे गुरुतत्त्वाचा ‘आदर्श योगी’ म्हणून वर्णिले आहेत. त्यामुळे या संप्रदायात योगमार्गाला विशेष महत्त्व आहे.
२ अ १. योगमार्गासाठी सद्गुरूंची आवश्यकता आणि ‘श्री दत्तात्रेय सद्गुरूंची भेट घडवून आणतात’, अशी श्रद्धा असणे : योगमार्गाचे यथार्थ ज्ञान होण्यास सद्गुरूंची आवश्यकता असते. ‘श्री दत्तात्रेय उपासकांना सद्गुरूंची भेट घडवून आणतात’, अशी धारणा दत्त सांप्रदायिकांमध्ये दृढ आहे. सद्गुरूंच्या प्रसादाने भक्ताला आत्मबोध प्राप्त होतो आणि आत्मबोध हेच दत्तोपासनेचे साध्य मानले जाते.
२ आ. सगुण उपासना : दत्त संप्रदायामध्ये मोक्षप्राप्तीसाठी सगुणोपासना अवलंबली जाते. श्री दत्तात्रेयांनी चातुर्वर्णासाठी सगुण भक्तीचा मार्ग अनुसरला.
२ इ. संन्यासाश्रम : दत्त संप्रदायात संन्यासाश्रमाचाही पुरस्कार केला जातो.
२ ई. समाजात मिसळलेला संप्रदाय : दत्त संप्रदाय समन्वयवादी आहे. केवळ आध्यात्मिक क्षेत्रात दत्त संप्रदाय मान्यताप्राप्त झाला, असे नसून समाजातही विधायक कार्य केल्याने लोकमानसात त्याला आदराचे स्थान मिळाले.
२ उ. प्रमुख ग्रंथ : दत्त संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ म्हणून ‘श्री गुरुचरित्र’ सर्वत्र परिचित आहे.
२ ऊ. पूजा : दत्त संप्रदायात एकमुखी आणि त्रिमूर्ती स्वरूपांत दत्तात्रेयांची पूजा केली जाते.
३. अवतार संकल्पना
अ. ‘कोणत्याही देवतेने एका विशिष्ट कार्यासाठी भूलोकी जन्म घेऊन तिचे अवतारकार्य पूर्ण झाले की, स्वतःच्या निजधामास जाणे’, ही कल्पना धर्मामध्ये आढळून येते. ‘नारायणीय’ उपनिषदामध्ये अवतारादी कल्पना अधिक सुस्पष्टतेने आली आहे. भगवान शिव, विष्णु, देवीदेवता यांचे विविध अवतार आणि त्यांचे स्वरूप हिंदु वैदिक वाङ्मयामध्ये आढळते. ते माया आणि चमत्कार यांनी भरलेले आहे.
आ. ‘धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’ (अर्थ : धर्मसंस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.), असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे.
इ. ‘जें धर्मजात आघवे । युगीयुगी म्यां रक्षावे ।’ – ‘ज्ञानेश्वरी’, अध्याय ४९, ओवी ४) (अर्थ : जेवढे म्हणून धर्म आहेत, तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे, असा क्रम स्वभावतःच चालत आलेला आहे.)
ई. ब्राह्मण ग्रंथांच्या (वेदांवर आधारित ग्रंथ) रचनेत अवतार संकल्पनेचा उल्लेख आढळतो.
उ. सामाजिक भ्रष्ट स्वरूप पालटून धर्माची नीतीशी सांगड घालणे, तसेच एकेश्वरवादाशी दैवतवादाशी सांगड घालण्याच्या प्रयत्नातून अवतारवाद निर्माण झाला आहे.
ऊ. ‘निर्गुणाचे मानवीकरण करून भक्तीपंथामध्ये अवतार कल्पना रूढ झाली’, असे म्हणता येईल.
ए. ‘परमेश्वरी अंश विभूतीरूपाने प्रतीत होतो’, असा एक विचार अवतारवादाविषयी आहे.
ऐ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदासस्वामी इत्यादी संतांनी अवतारवादाचे समर्थन केलेले आहे.
४. श्री दत्तात्रेयांचे अवतार
अ. श्री दत्तात्रेयांनी वर्णाश्रमधर्माचे संवर्धन करण्यासाठी वेळोवेळी प्राचीन काळी विविध अवतार धारण केले. प.प. वासुदेवानंद सरस्वती यांनी ‘श्री दत्तात्रेय षोड्शावतार’ या ग्रंथात १६ अवतार धारण केल्याची माहिती दिली आहे. ते पुढे दिले आहेत.
आ. श्री दत्तात्रेयांचे प्राचीन काळातील १६ अवतार
• अवतार १. योगीराज : अत्रिऋषि हिमालयात तपश्चर्या करत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रत्यक्ष भगवान प्रसन्न झाले. कार्तिक पौर्णिमा, कृत्तिका नक्षत्र, बुधवार या दिवशी भगवान प्रकट झाले. त्या वेळी त्यांचे स्वरूप स्फटिकासमान होते. हा दत्तात्रेयांचा अवतार ‘योगीराज’ या नावाने संबोधला गेला.
• अवतार २. अत्रिवरद : अत्रिऋषींनी ऋक्ष पर्वतक्षेत्रातील परमतीर्थावर १०० वर्षे तप केल्यावर त्यांच्या मस्तकातून उग्र तेज बाहेर पडू लागले. त्या वेळी भयभीत होऊन ब्रह्मा, विष्णु आणि महेश तिघेही अत्रिऋषींच्या समोर उभे राहिले. या प्रसंगी अत्रिऋषींनी त्यांना ‘येथे येण्याचे कारण काय ?’ आणि ‘तुम्ही कोण आहात ?’, असे प्रश्न विचारले. यावर देव म्हणाले, ‘तू (अत्रि) ज्या एकाचे ध्यान करत आहेस, तोच आम्हा तिघांमध्येही आहे.’ असे म्हटल्यावर तिन्ही देव अकस्मात् अदृश्य झाले. त्या वेळी अत्रिऋषींपुढे तप्त सुवर्ण कांतीप्रमाणे तेजस्वी हास्यमुख आणि षड्भुजारूप प्रकट झाले. तो दिवस कार्तिक कृष्ण प्रतिपदेचा गुरुवार होता. हा अवतार ‘अत्रिवरद’ समजला जातो.
• अवतार ३. स्वयंदत्त : अत्रिवरदाने अत्रिऋषींना वर मागण्यास सांगितल्यावर त्यांनी ‘तुमच्यासारखाच पुत्र मला असावा’, असा वर मागितला. त्यावर अत्रिवरदाने बालकरूप धारण केले आणि ऋषींपुढे प्रकट झाले. ते दिगंबर रूप मदनाप्रमाणे सुंदर आणि नीलमण्याप्रमाणे तेजस्वी होते. त्याला चंद्राप्रमाणे मुख आणि ४ हात होते. हा दत्तात्रेयाचा तृतीय अवतार कार्तिक कृष्ण द्वितीयेचा शुक्रवार या दिवशी प्रकट झाला. हाच तो ‘स्वयंदत्त’ किंवा दत्तात्रेय अवतार होय.
• अवतार ४. कालाग्निशमन : दत्तात्रेयाचा हा ४ था अवतार मार्गशीर्ष पौर्णिमा, बुधवार या दिवशी प्रकट झाला. अत्रिऋषि ‘मोहमय पुत्राप्रमाणे औरसपुत्र (स्वतःच्या पत्नीपासून जन्मलेला मुलगा) असावा’, अशी मनोमन इच्छा धारण करून तपश्चर्येस बसले. त्या प्रसंगी त्यांच्या उग्र तपामुळे शरिरात कालाग्नि प्रकट झाला आणि त्यांच्या शरिराचा दाह होऊ लागला. त्याच्या शमनार्थ भगवान शीतल रूपामध्ये प्रकट झाले आणि ऋषिपत्नी अनसूयेच्या पोटी ‘कालाग्निशमन’ अवताराने जन्म घेतला.
• अवतार ५. योगीजन वल्लभ : हा ५ वा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमा, गुरुवार या दिवशी प्रकट झाला. रुद्राचा अंश दुर्वास, ब्रह्मदेवाचा अंश चंद्र आणि विष्णूचा अंश दत्त अशा ३ स्वरूपातील देव कालाग्निशमनाच्या जन्माच्या वेळी प्रकट झाले होते. त्यासह काही अन्य ऋषी, गंधर्व हे दर्शनार्थ उपस्थित राहिले होते. त्या वेळी श्री दत्तात्रेयांनी त्यांच्या बालकरूपाचा त्याग करून योगी पुरुषांना आवडणारे प्रौढ रूप धारण केले. हा दत्तात्रेयांचा प्रौढ अवतार ‘योगीजन वल्लभ’ या नावाने संबोधिला गेला.
• अवतार ६. लीलाविश्वंभर : पौष पौर्णिमा, बुधवार या दिवशी योगीजन वल्लभाने त्याची ध्यानस्थ उपदेशक स्थिती आणि अन्य स्वरूप यांचे उपस्थित शिष्यांना दर्शन घडवले. ते अकस्मात् सरोवरात गुप्तही झाले. त्यामुळे काही शिष्य निघून गेले; पण काही सरोवराच्या तटावर बसून होते. त्या वेळी दत्त सरोवरातून प्रकट झाले. हा त्यांचा ६ वा अवतार ‘लीलाविश्वंभर’ म्हणून समजला जातो.
• अवतार ७. सिद्धराज : श्री दत्तगुरु बद्रिकावनात भ्रमण करत होते. त्या वेळी त्यांना वनामध्ये काही विवस्त्र सिद्ध पुरुष, मौनी, ध्यानस्थ आणि काही काम-क्रोधी सिद्ध पुरुष दिसून आले. त्यांना सन्मार्ग दाखवावा, या हेतूने श्री दत्तात्रेयांनी कुमाररूप धारण केले आणि योग मुद्राधारण्यावस्थेत त्या सिद्धांमध्ये मिसळले. त्यातील काही सिद्ध पुरुषांनी दत्तात्रेयांना प्रश्न विचारले. दत्तात्रेयांनी प्रश्नांची उत्तरे चमत्कारिक स्वरूपात देऊन सिद्धांचे गर्वहरण केले. त्या प्रसंगी दत्तात्रेयांनी त्यांना योगाची दीक्षा दिली. हा दिवस माघ पौर्णिमा, गुरुवार होता. हाच तो ‘सिद्धराज’ ७ वा अवतार होय.
• अवतार ८. ज्ञानसागर : हा दत्तात्रेयांचा ८ वा अवतार आहे. फाल्गुन शुक्ल दशमी, रविवार या दिवशी ‘ज्ञानसागर’ हा अवतार प्रगट झाला. ‘सिद्धीला कामनेचा आश्रय नसावा’, याचे महत्त्व पटवून देतांना श्री दत्तात्रेयांनी रूपातीत, गुणातीत आणि ज्ञानयोगयुक्त होऊन त्यांचे सहजस्थितीमध्ये रूप प्रकट केले. तो अवतार ‘ज्ञानसागर’ या नावाने ओळखला जातो.
• अवतार ९. विश्वंभरा अवधूत : चैत्र पौर्णिमा या तिथीच्या दिवशी मंगळवार होता. दत्तात्रेयांनी सिद्धपुरुषांना बोध देण्यासाठी ‘विश्वंभरा अवधूत’ या नावाचा ९ वा अवतार धारण केला होता.
• अवतार १०. मायामुक्तावधूत : वैशाख शुक्ल चतुर्दशी, बुधवार या दिवशी दत्तात्रेय अब्राह्मण भिक्षुरूपाने प्रकट झाले. त्यांचे रूप तारुण्यसुलभ, कांतीमान होते. अंगावर चंदनमिश्र भस्म, हाती भिक्षापात्र, दंड आणि समवेत श्वान होता. या अवतारामध्ये दत्तात्रेय शील नामक ब्राह्मणाच्या घरी श्राद्धाप्रीत्यर्थ भोजन चालू असतांना पानावर येऊन बसले. त्यामुळे ब्राह्मण क्रोधित झाले. या समयी दत्तात्रेयांनी श्वानाच्या तोंडून वेद वदवले. तेव्हा शील नामक ब्राह्मण दत्तगुरूंना शरण आले. हे भिक्षावेधी दत्तगुरु ‘मायामुक्तावधूत’ नामक दहाव्या अवतारात प्रकट झाले. भक्तांच्या अंत:करणातील प्रेम आणि श्रद्धा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी ‘मायामुक्तावधूत’ या नावाचा १० वा अवतार घेतला.
• अवतार ११. मायायुक्तावधूत : ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी, शुक्रवार या दिवशी दत्तात्रेयांनी सावळे सुंदर रूप धारण करून ११ वा ‘मायायुक्तावधूत’ हा अवतार घेतला.
• अवतार १२. आदिगुरु : आषाढ पौर्णिमा, शनिवार या दिवशी दत्तात्रेयांनी १२ वा अवतार घेतला. त्या वेळी देव आणि दानव यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध चालू होते. त्यात देव पराभूत झाले. बृहस्पतींच्या सूचनेवरून २ देव दत्तात्रेयांच्या चरणी लीन होऊन शरण गेले. दत्तात्रेयांनी देवांना अभय देऊन युद्धास प्रवृत्त केले. जंभासुरादि दानव देवांचा पाठलाग करत दत्तात्रेयांच्या आश्रमाजवळ आले. त्यामध्ये दानवांचा विनाश झाला. त्यामुळे देवांची दत्तात्रेयांवर भक्ती जडली गेली. दत्तात्रेयांचा हा बारावा अवतार ‘आदिगुरु’ या नावाने ओळखला जातो. मदालसेचा (रितध्वज यांची पत्नी) पुत्र ‘अलर्क’ यास योग आणि तत्त्वज्ञान यांचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार धारण केला.
• अवतार १३. शिवरूप : श्रावण शुक्ल अष्टमी, सोमवार या दिवशी दत्तात्रेयांनी १३ वा अवतार धारण केला. ते काळ्या ‘आवळी’ (आवळ्या)च्या झाडाखाली संस्कारहीन वेषामध्ये स्वतःचे रूप घेऊन प्रकट झाले. तो ‘शिवरूपी’ अवतार समजला जातो.
• अवतार १४. देवदेवेश्वर : भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, शुक्रवार या दिवशी दत्तात्रेय काळ्या ‘आवळी’ (आवळ्या)च्या मुळाशी प्रकट होत १४ वा अवतार घेतला आणि त्यांनी ‘देवदेवेश्वर’ रूप प्रकट केले.
• अवतार १५. दिगंबर : दत्तात्रेयांचा १५ वा अवतार दिगंबर रूपात प्रकट झाला. तेव्हा आश्विन पौर्णिमा, बुधवार हा दिवस होता. यदु राजाला दत्तात्रेय दिगंबराच्या रूपात भेटले आणि त्यांनी यदु राजाला धार्मिक बोध केला. हा अवतार ‘दिगंबर’ नावाने संबोधला जातो.
• अवतार १६. श्यामकमल लोचन : कार्तिक शुक्ल द्वादशी, बुधवार या दिवशी दत्तात्रेयांनी इंद्रनील मण्यासारखी तेजस्वी कांती धारण करून आपल्या भक्तांपुढे १६ वे अवताररूप प्रकट केले. त्याला श्यामकमल ‘लोचनावतार’ असे म्हटले गेले.
अशा प्रकारे श्री दत्तात्रेयांनी प्राचीन काळी सद्गुरुरूपाने भूलोकी अवतार धारण करून भक्तांना दर्शन दिले. या संबंधात अनेक वैशिष्ट्यपूर्ण कथा पुराणादि धार्मिक वाङ्मयामध्ये आढळून येतात.
५. श्री दत्तात्रेयांचे अलीकडच्या काळातील अवतार
५ अ. अलीकडच्या काळामध्ये श्री दत्तात्रेयांचे काही मानवी पूर्णावतार दृष्टीपथात येतात. त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंहसरस्वती, श्री अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि माणिक प्रभु यांचा समावेश केला जातो.
५ आ. दत्तात्रेयांचे अंशात्मक अवतार : काही अंशवतारी पुरुष, उदा. परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.) टेंब्येस्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज इत्यादी या सर्वांनी दत्त संप्रदायाचे लोकोद्धार आणि धर्मरक्षणाचे कार्य अद्वैतवादाच्या स्वरूपात चालवले.
६. अवतारांच्या क्रमानुसार दान देण्याची पद्धत
श्री दत्तात्रेय सांप्रदायिक परंपरा आणि सद्गुरु यांच्यावर श्रद्धा ठेवून गुरुदेव दत्त यांच्या वेगवेगळ्या अवतारांचे जयंती उत्सव साजरे केले जातात. त्या प्रसंगी भक्तांनी खालील स्वरूपाचे प्राचीन काळातील अवतारानुक्रमाने दान करण्याची प्रथा प्रसारित केलेली आहे. प्राचीन काळातील श्री दत्तात्रेयांच्या अवताराच्या क्रमांकानुसार दान वस्तू पुढीलप्रमाणे :
१. नारळ (श्रीफळ), २. कदलीफळ (केळे), ३. इक्षु (ऊस), ४. पंचामृत, ५. मौक्तिक (मोती), ६. अंभ (पाणी); ७. ग्रंथ, पुस्तक, ८. मंदिर बांधकामासाठी धन, ९. गाय (गोधन), १०. दध्योधन (दहीभात), ११. मध, १२. सुवर्ण, १३. उदक (पाणी), १४. तांबूल (विडा), १५. वस्त्र आणि १६. रौप्य (चांदी).
७. दत्तात्रेयांचे शिष्य
पुराणातील यदु, आयु, अलर्भ, सहस्रार्जुन आणि परशुराम हे दत्तात्रेयांचे शिष्यगण क्षत्रिय होते. त्यांनी दत्तकृपेच्या बळावर वर्णाश्रमधर्माची प्रतिष्ठा संवर्धित केली.
(साभार : त्रैमासिक ‘अक्कलकोट स्वामीदर्शन’, जानेवारी ते मार्च २००५)
(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi
बकर्यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !
कोथरूड (पुणे) येथे ‘दत्तयागा’च्या प्रथम दिवशी विविध राज्यांतील वेदज्ञ ब्राह्मण सहभागी !
मंत्रोच्चाराच्या घोषात कोथरूडमध्ये ३ दिवसांच्या भव्य ‘नऊ कुंडीय दत्तयागा’ला आजपासून उत्साहात प्रारंभ !
पुणे येथे ‘अमळनेरकर महाराज सेवा संघा’च्या वतीने ‘श्री दत्त यागा’चे आयोजन