अंनिसने भगवी वेशभूषा वापरून शेवगाव येथील शाळेत ‘चमत्कार’ दाखवल्याने हिंदु जनजागृती समितीची कारवाईची मागणी !

निवेदन स्वीकारतांना (डावीकडून) आनंद भंडारी आणि निवेदन देतांना अरुण (बापू) ठाणगे, चैतन्य शेकडे, रामेश्वर भुकन, सुनील शिंदे, अविनाश साबरे, संतोष उपाध्ये

अहिल्यानगर – एरंडगाव तालुक्यातील शेवगाव येथील एकनाथ माध्यमिक विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याने सादर केलेल्या एका कार्यक्रमात भगव्या वेशभूषेत कथित ‘चमत्कार’ दाखवण्याच्या कृतीवर हिंदु जनजागृती समितीने कडक आक्षेप घेतला आहे. या संदर्भात समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती संध्या गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

या कार्यक्रमात अंनिसचे कार्यकर्ते भगवे कपडे परिधान करून विद्यार्थ्यांना चमत्कार दाखवत होते. भगवे वस्त्र हे हिंदु धर्मियांचे आस्थेचे प्रतीक असून या संदर्भात समस्त हिंदूंच्या मनामध्ये १ पवित्र भाव असतो. ‘शाळेने अशा प्रकारच्या कार्यक्रमाची लेखी अनुमती दिली होती का ?’ असा प्रश्न या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. रामेश्वर भुकन यांनी उपस्थित केला आहे.

निवेदनात समितीच्या वतीने केलेल्या मागण्या

१. कार्यक्रमात भगवे कपडे अर्थात् हिंदु साधू-संतांची वेशभूषा परिधान करणार्‍या व्यक्तीची उपस्थिती आणि भूमिका याविषयी अन्वेषण करण्यात यावे.

२. भविष्यात या प्रकाराची पुनरावृत्ती इतरत्र होऊ नये म्हणून संबंधित शिक्षक/समन्वयक यांना सूचना देण्यात याव्यात.

३. या प्रकरणाची लेखी माहिती आणि कारवाई यांचा अहवाल पालकांना उपलब्ध करून द्यावा.

‘संबंधित प्रकाराची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी या वेळी दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन, जिल्हा हिंदु संघटक श्री. अरुण (बापू) ठाणगे, चैतन्य शेकडे, श्री. अविनाश साबरे आदी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका :

  • अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, हाच अंनिसचा नेहमीचा डाव आहे. अंनिस अन्य धर्मियांच्या धार्मिक प्रतीकांचा, वेशभूषेचा किंवा पाद्री अथवा मौलवी यांचा वापर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे चमत्कार दाखवण्यासाठी करण्याचे धाडस का करत नाही ?
  • अंनिसच्या कार्यकर्त्यांनी चमत्कार दाखवण्यासाठी भगवी वस्त्र घातलेली व्यक्ती दाखवणे म्हणजे ‘भगवी वस्त्रे घातलेल्या व्यक्ती लोकांना फसवतात’, असा होतो. हिंदु सहिष्णु असल्यानेच अंनिसवाले असे उद्योग करतात !