Jaffar Express Attack : बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसैनिकांनी पुन्हा केले ‘जाफर एक्सप्रेस’ला लक्ष्य : रेल्वे रुळ उद्ध्वस्त !

क्वेटा (बलुचिस्तान) – येथील बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसैनिकांनी पुन्हा एकदा ‘जाफर एक्सप्रेस’ या रेल्वेगाडीला लक्ष्य केले. नसीराबाद जिल्ह्यात रेल्वे रुळांवर लावलेल्या स्फोटकांमुळे मोठा स्फोट झाला. तेथे क्वेटाहून पेशावरसाठी येणारी रेल्वेगाडी पोचायच्या आधीच हा स्फोट झाल्याने जीवितहानी झाली नाही. तथापि यामुळे क्वेटाचा पाकिस्तानातील अन्य भागापासून रेल्वेचा संपर्क तुटला.

१. पोलीस आणि रेल्वे पोलीस यांच्या माहितीनुसार अज्ञात आक्रमणकर्त्यांनी शहीद अब्दुल अजीज बुल्लो परिसरात रेल्वे रुळावर हा स्फोट घडवून आणला. तथापि बलूच राष्ट्रवादी नेते मीर यार बलूच यांनी ‘बलूच रिपब्लिकन गार्ड्स’ने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारल्याचे सांगितले आहे.

२. ४ दिवस आधीच येथून रेल्वेसेवा चालू करण्यात आली होती.

३. याआधी ११ मार्च २०२५ या दिवशी ‘बलूचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या स्वातंत्र्यसैनिकांनी जवळपास ४४० प्रवासी घेऊन जाणार्‍या रेल्वे गाडीवर आक्रमण केले होते. त्यानंतरही जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये तिला लक्ष्य केले गेले. यात अनेक प्रवासी घायाळ झाले होते.