प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !

डावीकडून सौ. श्वेता गुप्ता, कु. अभिराम, श्री. राघव शेट्टी, श्री. शंतनू गुप्ता, चि. नक्षत्रा आणि (उजवीकडे) आश्रमाची माहिती देतांना श्री. गिरीजय प्रभुदेसाई

रामनाथी (गोवा) – सुप्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. शंतनू गुप्ता यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत पत्नी सौ. श्वेता, मुलगा अभिराम आणि मुलगी नक्षत्रा, तसेच गोव्यातील उद्योगपती श्री. राघव शेट्टी हेही उपस्थित होते. सनातनचे साधक श्री. गिरीजय प्रभुदेसाई यांनी सर्वांना आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्याविषयी विस्ताराने माहिती दिली. या वेळी सर्वांनी अत्यंत जिज्ञासेने धर्म आणि अध्यात्म प्रसाराचे कार्य जाणून घेतले.

सात्विकता हे प्रमाण मानून जीवन जगणे, हा विषय त्यांना पुष्कळ भावला. आश्रमातील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा यांविषयी त्यांना अप्रूप वाटले. या वेळी सौ. श्वेता यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी साधक राबवत असलेली प्रक्रिया आणि फलकावर चुका लिहिणे, हा भाग आता घरी चालू करण्याची इच्छा व्यक्त केली. श्री. गुप्ता म्हणाले की, गोव्यासारख्या ठिकाणी एवढा चांगला सात्विक आश्रम असणे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. ध्यानमंदिरात पुष्कळ सात्विकता आहे. येथे आत-आत, म्हणजे शून्यात जात असल्याची अनुभूती येते.

श्री. शंतनू गुप्ता यांचा परिचय

श्री. शंतनू गुप्ता हे मूळचे उत्तराखंड राज्यातील हृषीकेशचे आहेत. सध्या ते उत्तरप्रदेशातील नोएडा येथे रहातात. ते प्रसिद्ध लेखक, तसेच राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर २ पुस्तके लिहिली आहेत. यांपैकी ‘द माँक हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित ‘अजेय : दी अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ नावाचा चित्रपट २ महिन्यांपूर्वी जगभर प्रदर्शित झाला.

चित्रपटाच्या प्रचारासाठी त्यांनी भारतातील सर्व राज्ये, तसेच अमेरिका, युरोप येथेही दौरे केले. चित्रपटाच्या प्रचारासाठी ते गोव्यात आले होते. या दौर्‍याच्या निमित्ताने त्यांनी सनातन आश्रमाला भेट दिली. त्यांचे संपूर्ण कुटुंब अत्यंत आध्यात्मिक वृत्तीचे आहे, तसेच ते एका संप्रदायानुसार साधनाही करतात.