श्रीक्षेत्र सज्जनगड येथे पारंपरिक कपड्यातच मिळणार प्रवेश !

सातारा, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – श्रीक्षेत्र सज्जनगड येथे राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांची समाधी आहे, तसेच समाधी मंदिरावर श्रीरामाचे मंदिर आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुष यांना तोकडे कपडे घालून प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक परंपरेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ‘श्री रामदास स्वामी संस्थान’चे अध्यक्ष तथा अधिकारी स्वामी पू. भूषण स्वामी यांनी कळवले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र सज्जनगड समर्थ संप्रदायाचे मुख्यालयही आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी लाखो भाविक आणि समर्थभक्त दर्शनासाठी येतात. अलीकडील काळात गडाच्या पावित्र्याला, सात्त्विक वातावरणाला बाधा येईल, अशा वेशभूषेत छायाचित्रे काढून त्याच्या चित्रफिती बनवल्याच्या तक्रारी संस्थानकडे वारंवार येत होत्या. याची गांभीर्याने नोंद घेत ‘श्री रामदास स्वामी संस्थान’ने महिला आणि पुरुष यांच्या तुकड्या पोशाखाविषयी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘स्टायलिश’ कपडे म्हणजे काय ? याची व्याख्याही संस्थानच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली आहे. त्यात महिला, मुलींनी श्रीक्षेत्र सज्जनगड येथे येतांना तोकडे कपडे (शॉर्ट पॅंट, शॉर्ट ड्रेस, स्लीव्हलेस (बिनबाहीचे)), पुरुषांनी तोकड्या पँट घालून येऊ नयेत. हे कपडे ‘स्टायलिश’ कपड्यांमध्ये गणले जाणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांना गडावर प्रवेश नाकारला जाणार आहे.