महाराष्ट्रातील येत्या निवडणुकीसाठी ९६ लाख बोगस (खोटे) मतदारांचा समावेश !

राज ठाकरे यांचा गंभीर आरोप !

मुंबई – महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी ९६ लाख खोटे मतदार सूचीत भरण्यात आले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. १९ ऑक्टोबर या दिवशी गोरेगाव येथील नेस्को सभागृहात मनसेच्या मेळाव्यातील भाषणामध्ये त्यांनी हा गंभीर आरोप केला.

या वेळी राज ठाकरे म्हणाले, ‘‘मतदारसूचीतील गोंधळ आताचा नाही. मागील अनेक वर्षांपासून मतदारसूची गोंधळ आहे. वर्ष २०१७ मध्ये चुकीच्या मतदारसूचीच्या विरोधात आवाज उठवला होता. प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गावातील मतदारसूचीत खोटे मतदार भरलेले आहेत. असे असेल तर निवडणुकीत मतदान कशासाठी करायचे ? अशा प्रकारच्या निवडणुका होत असतील, तर तो महाराष्ट्राच्या लोकांचा अपमान आहे. निवडणुकीपूर्वीच निकाल ठरला असेल, तर ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे ? मतदार सूचीद्वारे मतदानाची टक्केवारी निश्चित करून ठेवण्यात येत असेल, तर निवडणुकीला काय अर्थ आहे. आम्ही निवडणूक आयोगाला मतदारसूचीत सुधारणा सांगितली, तर सत्ताधारी का चिडतात ? निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर सत्ताधारी देतात. मागील विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता कशी आणली गेली, हे महाराष्ट्रातील सर्व लोकांना ठाऊक आहे. मतदानासाठी बाहेरून मतदार आणले गेले. मुंबईचा विकास जर मराठी माणसाच्या थडग्यावरून केला जात असेल, तर तो सहन करणार नाही. निवडणूक आयोगाने प्रथम मतदारसूचीत सुधारणा करावी, मग निवडणूक घोषित करावी.’’

या वेळी मनसेचे ठाणे येथील नेते अविनाश जाधव यांनी जो मनसेचा कार्यकर्ता सर्वाधिक बोगस मतदारांचा शोध घेईल त्याचा सार्वजनिकरित्या सत्कार केला जाईल, अशी घोषणा केली. बोगस मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आला, तर तो पुन्हा त्याच्या पायाने घरी जाणार नाही, अशी चेतावणीही या वेळी अविनाश जाधव यांनी दिली.