DRDO Military Parachute : भारताकडून स्वदेशी बनावटीच्या सैन्याच्या ‘पॅराशूट’ची यशस्वी चाचणी

  • ३२ सहस्र फूट उंचीवरून सैनिकांनी ‘पॅराशूट’सह मारल्या उड्या

  • ‘डी.आर्.डी.ओ.’ने विकसित केले ‘पॅराशूट’

नवी देहली – भारतीय सैनिकांनी स्वदेशी बनावटीच्या ‘मिलिट्री काँबॅट पॅराशूट सिस्टम’ची यशस्वी चाचणी घेतली. भारतीय हवाई दलाच्या ३ सैनिकांनी ३२ सहस्र फूट उंचीवरून उड्या घेतांना ‘पॅराशूट’चा वापर केला.

‘पॅराशूट’चे नियंत्रण, भूमीवर उतरणे आणि ‘नेव्हिगेशन’ क्षमता सुधारण्याच्या उद्देशाने ही चाचणी घेण्यात आली. ‘पॅराशूट’च्या यंत्रणेत ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’ ही एक स्वदेशी उपग्रह ‘नेव्हिगेशन’ प्रणाली आहे. हे ‘पॅराशूट’ ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या (डी.आर्.डी.ओ.- ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’च्या) ‘द एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, आग्रा’ आणि ‘द डिफेन्स बायोइंजिनीअरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरी, बेंगळुरू’ या प्रयोगशाळांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

स्वदेशी बनावटीच्या या ‘पॅराशूट’मुळे आयात करण्यात येणार्‍या उपकरणांच्या तुलनेत नियमित देखभाल-दुरुस्तीसाठी अल्प वेळ लागणार आहे, तसेच युद्धजन्य परिस्थितीत भारताचे अन्य देशांवरील अवलंबित्व न्यून होणार आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याविषयी ‘डी.आर्.डी.ओ.’ आणि सैन्य यांचे अभिनंदन केले आहे.