जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये ‘खान ॲकॅडमी’चे गणित आणि विज्ञान विषयांचे धडे !

देवेंद्र फडणवीस

मुंबई – जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात ‘जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम’ राबवला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील ६२ सहस्रांहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘खान ॲकॅडमी’ या आंतरराष्ट्रीय शिकवणीद्वारे विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान यांविषयी शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राज्यशासनाने ‘खान ॲकॅडमी’समवेत सामंजस्य करार केला आहे.

भौगोलिक स्थिती आणि विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी यांचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे गणित आणि विज्ञान या भविष्योन्मुख विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा पाया बळकट होऊ शकेल. यामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

प्रख्यात वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाचा लाभ ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होईल. इयत्ता ६ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. यामध्ये शैक्षणिक साहित्य मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. यातील व्हिडिओ वापरून शिक्षक वर्गामधील अध्यापन अधिक समृद्ध करू शकतील, तसेच विद्यार्थ्यांना व्हिडिओ-आधारित धडे आणि सराव प्रश्नांच्या माध्यमातून शाळेत आणि घरच्या घरी संकल्पनात्मक आकलन दृढ करण्याची संधी मिळेल. राज्य शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती राज्याच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.