श्रीपाद नाईक यांनी भारतमातेसाठी सर्वस्व समर्पित केले ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस

जुने गोवे, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी भारतमातेसाठी सर्वस्व समर्पित केले, असे गौरवाद्गार श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी काढले. केंद्रीय वीज आणि नवीन नवकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा ४ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या सांपेद्र, जुने गोवे येथील निवासस्थानी अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘मातृभूमी सेवा प्रतिष्ठान गोवा’ यांच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री दिगंबर कामत, मंत्री रमेश तवडकर, मंत्री  रवि नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, पू. रामजी महाराज, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. गोविंद काळे आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या जीवनावर आधारित डॉ. गोविंद काळे यांनी संपादित केलेल्या ‘समर्पण’ या १४४ पानी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि पुढे म्हणाले, ‘‘गोमंतभूमी ही निसर्गरम्य आणि मंदिरांची भूमी आहे. गोमंतकियांनी ४५० वर्षे पोर्तुगिजांचे अत्याचार सोसून हिंदु धर्म, संस्कृती आणि मंदिरे यांचे रक्षण केले. गोव्यात श्रीपाद नाईक यांनी गरिबीतून वर येऊन राष्ट्रीय चळवळ उभारली आणि गोव्यात खडतर परिश्रम घेऊन भगवा झेंडा स्थिर केला. भारतमातेने विश्‍वाला अतुलनीय असे विचारवैभव, संस्कृती आणि प्रेम देऊन संपूर्ण जगाचे कल्याण चिंतिले आहे. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराममंदिरात प्रभु श्रीराम विराजमान झाले, तर काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘हिंदू आता मार खाणार नाही’, असे उद्गार संसदेत एकदा काढले होते आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ने अटलजींचे वाक्य आता खरे करून दाखवले आहे. भारत आता इतरांच्या मतांवर चालणारा देश राहिलेला नाही, तर स्वत:च्या पायावर ठामपणे उभा राहिलेला देश झाला आहे. हा आरंभ आहे आणि पुढे पुष्कळ आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व संप्रदाय, भाषा, प्रदेश यांच्यामध्ये संघभाव निर्माण झाला पाहिजे. राममंदिराची उभारणी झाली, तर आता रामराज्य स्थापन करायचे आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून कार्य करायचे आहे.’’

याप्रसंगी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या हस्ते समाजात उत्कृष्ट कार्य केलेले वेदचुडामणी घनपाठी योगेश्‍वर बोरकर, गोवा सरकारचे कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर आणि प्रसिद्ध कराटेपटू भुवनेश्‍वरी जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कराटेपटू भुवनेश्‍वरी जाधव यांच्या अनुपस्थितीत त्यांचा भाऊ मिहीर यांनी हा सत्कार स्वीकारला.

अटलजींपासून मोदीजी यांच्या कार्यकाळापर्यंत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी देशसेवा केली ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डॉ. प्रमोद सावंत

याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कार्याचा गौरव करतानां म्हणाले, ‘‘केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक सहाव्यांदा उत्तर गोव्याचे खासदारपद भूषवत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून विद्यमान पंतप्रधान नरेंदी मोदी यांच्या कार्यकाळापर्यंत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी देशसेवा केली आहे. काणकोणपासून पेडणेपर्यंत त्यांनी अनेक साधनसुविधा प्रकल्प उभारले आहेत. आयुषमंत्री असतांना त्यांच्यामुळेच धारगळ येथील आयुर्वेद रुग्णालय उभे राहिले आहे. या ठिकाणी प्रतिदिन १ सहस्र रुग्णांची तपासणी केली जाते.’’

वाढदिनाच्या निमित्ताने आयोजित विविध आरोग्य शिबिरांना चांगला प्रतिसाद

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिनाच्या निमित्ताने सांपेद्र, जुने गोवे येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ आणि ‘पोषण माह’ अभियान यांच्या अंतर्गत विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विनामूल्य नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रिया, चष्म्यांचे वाटप, विनामूल्य आयुर्वेद सल्ला अन् औषधांचे वितरण; आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथी आणि युनानी या उपचारांविषयी विनामूल्य सल्ला अन् औषध वितरण; आरोग्य संचालनालयाच्या वतीने विनामूल्य वैद्यकीय शिबिर, ६० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर (चाकांची खुर्ची), वॉकिंग स्टिक (चालतांना वापरायची काठी), कुबड्या आदी साहित्याचे वाटप, त्याचप्रमाणे वनऔषधी आणि इतर रोपटी यांचे वाटप करण्यात आले. विविध आरोग्य शिबिरांना लोकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या.