Morocco’s Gen Z Protests Escalate : आता मोरोक्को देशातही ‘जेन-झी’कडून हिंसाचार !

देशात बेरोजगारी असतांना विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अब्जावधी डॉलर खर्च करण्याला विरोध !

(जेन-झी म्हणजे वर्ष १९९६ ते २०१० या कालावधीत जन्मलेली पिढी)

रबाट (मोरक्को) – उत्तर आफ्रिकी देश मोरोक्कोत आरोग्य आणि शिक्षण यांच्या सुधारणांच्या मागण्यांमुळे चालू असलेल्या ‘जेन-झी’ चळवळीला हिंसक वळण लाभले. राजधानी रबाटमध्ये आंदोलकांनी एक बँक जाळली, तर माराकेश शहरातील एका पोलीस ठाण्याला आग लावली. या हिंसाचारात ४० पोलीस वाहने आणि २० खासगी गाड्या पेटवण्यात आल्या, तर २६० हून अधिक पोलीस अधिकारी अन् २० आंदोलक घायाळ झाले. आंदोलक तरुण ‘टिकटॉक’ आणि ‘डिस्कॉर्ड’ यांसारख्या सामाजिक माध्यमांद्वारे एकत्र आले. अगादिर शहरात पोलिसांच्या गोळीबारात ३ तरुणांचा मृत्यू झाला, तर ३५४ लोक घायाळ झाले. १ सहस्राहून अधिक जणांना अटक करण्यात आली. सरकारच्या मते, आंदोलकांपैकी ७० टक्के आंदोलक अल्पवयीन आहेत.

आंदोलनामागील कारणे !

१. मोरोक्कोत बेरोजगारीचे प्रमाण १२.८ टक्के आहे. त्यातही तरुणांमधील बेरोजगारी ३५.८ टक्के आहे. १९ टक्के पदवीधर बेरोजगार आहेत.

२. देशात प्रत्येक १ सहस्र ४३० लोकांमागे एक डॉक्टर आहे. जागतिक सरासरीपेक्षा हे प्रमाण अडीच पट अल्प आहे. देशात सार्वजनिक रुग्णालयांचीही कमतरता आहे.

३. तथापि मोरोक्कोचे सरकार वर्ष २०३० मध्ये होणार्‍या ‘विश्वचषक फुटबॉल स्पर्धा’, तसेच ‘आफ्रिका कप ऑफ नेशन्स’ यांसाठी १० अब्ज डॉलर्स (अनुमाने ८.८ लाख कोटी रुपये) खर्च करणार आहे. यास या तरुणांचा तीव्र विरोध आहे.