Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !

इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेचे मत !

तेहरान (इराण) – जर इराणला भविष्यात त्याच्या विरोधकांशी सन्मानाने आणि प्रभावी चर्चा करायची असेल, तर त्याच्याकडे भक्कम धोरणात्मक क्षमता अन् आण्विक प्रतिकारशक्ती (अणूबाँब) असणे आवश्यक आहे. इराणकडे अशी क्षमता असल्यासच तो  स्थायी शांतता आणि सुरक्षा मिळवू शकतो. यामुळे विरोधी देश सैन्य कारवाई करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतील, असे मत इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘फार्स न्यूज’मध्ये ‘अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही’ या लेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

ही वृत्तसंस्था ‘इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’च्या जवळची माध्यम संस्था मानली जाते. काही आठवड्यांपूर्वीच इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या प्राथमिक करारात इराणने अण्वस्त्रे विकसित न करण्याचे आश्वासान दिले होते. तरीही आता इराणच्या वृत्तसंस्थेने या आश्वासनाला बगल देणारे मत मांडले आहे. हा लेख इराणी सरकारचे अधिकृत धोरण मानले जात नसले, तरी देशांतर्गत यावरून आण्विक प्रतिकार क्षमतेविषयी जोरदार चर्चा चालू असल्याचे उघड होते.

चीनचे उदाहरण देऊन युक्तीवाद !

या लेखात १९७० च्या दशकातील चीन-अमेरिका संबंधांचा संदर्भ देण्यात आला आहे. यात दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेने चीनलाही एकेकाळी अणूबाँबद्वारे आक्रमण करण्याची धमकी दिली होती; परंतु जेव्हा चीनने अण्वस्त्रे विकसित केली, तेव्हाच दोन्ही देशांमध्ये गंभीर चर्चा चालू होऊ शकली. धोरणात्मक शक्ती मिळवल्यानंतरच चीन अमेरिकेशी समातनेच्या पातळीवर चर्चा करू शकला. त्यामुळे इराणलाही याच मार्गावर चालण्याची आवश्यकता आहे. आण्विक प्रतिकार क्षमतेचा उद्देश युद्ध आरंभणे, हा नसून अमेरिका आणि इस्रायल यांसारख्या अण्वस्त्रसज्ज देशांसमवेत शक्ती संतुलन प्रस्थापित करणे, हा आहे. याद्वारे संभाव्य संघर्ष मर्यादित ठेवता येऊ शकतो आणि मोठे युद्ध होण्याची शक्यता अल्प होऊ शकते.