‘ऑफ्टरनून वॉईस’च्या संपादिका डॉ. वैदेही ताम्हण यांच्या ‘वीर सावरकरस् व्हिजन फॉर अ रेजिलियंट हिंदु राष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन !

मुंबई, २९ सप्टेंबर (वार्ता.) : ‘ऑफ्टरनून व्हॉईस’ या वृत्तमाध्यमाच्या संपादिका डॉ. वैदेही ताम्हण यांच्या हिंदु राष्ट्राविषयी धगधगते आणि ज्वलंत विचार मांडणार्‍या ‘वीर सावरकरस् व्हिजन फॉर अ रेजिलियंट हिंदु राष्ट्र’ (वीर सावरकरांची समर्थ हिंदु राष्ट्राची संकल्पना) या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या ३ भाषांतून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

डावीकडून मकरंद देशपांडे, रणजित सावरकर, शरद पोंक्षे, डॉ. वैदेही ताम्हण, उदय माहूरकर आणि आमदार डॉ. मनीषा कायंदे

२९ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर, शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे, अभिनेते श्री. मकरंद देशपांडे या मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या सोहळ्याला उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. तिरथसिंग रावत हे उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार !

पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तरुणांना आकर्षित करतील ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर विज्ञाननिष्ठ होते. आजच्या मुलांपर्यंत सावरकर पोचले, तर ते त्यांना आवडतील. सावरकर द्रष्टे तर होतेच; परंतु अर्थनीती, कामगार कल्याण, विदेशनीती अशा विविध गोष्टींचे ज्ञाते होते. डॉ. वैदेही यांनी पुस्तकात छोट्या-छोट्या प्रकरणांद्वारे मांडलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार तरुणांना निश्चितच आकर्षित करतील.

राष्ट्रापुढील समस्यांवरील उत्तरे वीर सावरकर यांच्या साहित्यातून मिळतील ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते  

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या विषयावर लिखाण केले नाही, असे नाही. ज्या वेळी त्यांनी जीवन संपवण्याचे ठरवले, तेव्हा त्यांच्या स्वीय साहाय्यकाने विचारले की, देशासमोर एवढे प्रश्न असतांना तुमच्या देहाची आवश्यकता आहे. तेव्हा सावरकर म्हणाले, ‘‘त्यासाठी हा देह कशासाठी हवा. त्यासाठी मी कित्येक पाने साहित्य लिहिले आहे. ते वाचले की त्यातून या प्रश्नांची उत्तरे मिळतील.’’

राष्ट्रावरील प्रेम कृतीतून दिसायला हवे ! – मकरंद देशपांडे, अभिनेते आणि दिग्दर्शक 

वीर सावरकर हे एक विचार आहेत. वीर सावरकर यांचे साहित्य हे ज्वलंत आहे. ते महाकवी होते. स्वतःवर प्रत्येक जण प्रेम करतो; परंतु राष्ट्रावरील प्रेम हे मोठे असते. हे प्रेम बोलून सिद्ध होत नाही, तर कृतीतून दिसते. डॉ. वैदेही ताम्हण यांच्या पुस्तकातून राष्ट्राविषयीचे प्रेम दिसून येते.

गमावलेले पुन्हा मिळवण्याची आशा दिसत आहे ! – आमदार डॉ. मनीषा कायंदे, शिवसेना 

मागील काही वर्षांपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा विषय विवादास्पद करून ठेवण्यात आला. त्यामुळे येणार्‍या पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांवरील लिखाण करणे आणि त्याचे वाचन करणे आवश्यक आहे.

‘जे आपण गमावले ते पुन्हा आपण मिळवू’, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे.

‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेची देशाला आवश्यकता, पुस्तक प्रकाशनाची हीच योग्य वेळ ! – उदय माहूरकर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त 

डॉ. वैदेही ताम्हण यांचे हे पुस्तक योग्य वेळी प्रकाशित झाले आहे. ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना सर्वसमावेशक आहे. सावरकर यांचे हिंदु राष्ट्रािवषयीचे विचार हे अत्यंत स्पष्ट, प्रगल्भ आणि भविष्यातील घटनांचे मागोवा घेणारे होते. त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष, हे भारताची मोठी हानी करणारे ठरले.

पाकिस्तानची निर्मिती, चीनचे आक्रमण, तसेच भारताने अणूशक्तीशाली होणे आदी अनेक सूत्रांविषयी त्यांनी आधीच कल्पना दिली होती. सावरकर हे राष्ट्र सुरक्षेचे पितामह आहेत. सावरकर यांना आपण जाणले आणि त्यांच्या विचारांवर चाललो, तर भारत निश्चित पुढे जाईल.