श्री महाकाली स्तोत्र ऐकतांना देवीच्या सांगण्यावरून साधिकेने महाकाली आणि भगवान शिव यांचे चित्र रेखाटतांना तिच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया अन् आलेल्या अनुभूती

कु. रजनीगंधा कुर्‍हे

१. महाकाली स्तोत्र ऐकतांना कालीमातेची आठवण होऊन तिचे रूप डोळ्यांसमोर येणे आणि तिने तिचे चित्र साकारण्याचा विचार साधिकेच्या मनात घालणे 

‘४.६.२०२५ या दिवशी सकाळी मी महाकाली स्तोत्र ऐकत होते. त्या वेळी मला कालीमातेची आठवण आली आणि ‘ती साक्षात् माझ्या समोर उभी आहे’, असे मला जाणवले. मी तिला आळवत असतांना तिचे रूप माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागले. त्या वेळी देवीनेच माझ्या मनात तिचे चित्र साकार करण्याचा विचार दिला. तो विचार माझ्या मनात आल्यावर मी देवीचे सूक्ष्म रूप निरखून पाहिले.

कु. रजनीगंधा कुर्‍हे यांनी रेखाटलेले महाकालीदेवीचे चित्र

२. महाकालीदेवीने भगवान शिवाच्या हृदयावर (छातीवर) पाय ठेवल्याचे दृश्य दिसल्यावर ‘असे चित्र कसे काढायचे ?’, असा विचार मनात येणे आणि शिवाने त्या दृश्याचा भावार्थ सांगणे  

मला दिसलेल्या दृश्यात देवीचे उजवे चरण भगवान शिवाच्या हृदयावर (छातीवर) होते. तेव्हा आपोआपच माझ्या मनात विचार आला, ‘मी हे चित्र कसे काढू शकते ? कारण भगवान शिवाच्या हृदयावर (छातीवर) पाऊल काढणे मला शक्य नाही !’ त्या क्षणी भगवान शिवाने मला या दृश्याविषयी पुढील गोष्ट सांगितली. ‘महाकालीदेवीचे उजवे चरण भगवान शिवाच्या हृदयावर (छातीवर) असणे, म्हणजे महाकालीचा शिवावर केवळ अधिकारच नाही, तर ‘शिव आणि शक्ती एकमेकांस पूरक आहेत’, याचे द्योतक आहे. याचा अर्थ शक्तीला केवळ शिवरूपी शांतीच नियंत्रित करू शकते. शिवरूपी समाधीमध्ये निष्क्रीय स्थितीला शक्तीच प्रवाहित आणि ऊर्जावान करू शकते. महाकालीचे चरण शिवाच्या हृदयाला (छातीला) लागणे, म्हणजेच दोन विरुद्ध ऊर्जांचा संयोग होणे होय. त्यातच जेव्हा महाकालीने उग्ररूप धारण केल्यावर ती अनियंत्रित होते, तेव्हा तिला नियंत्रित करण्यासाठी भगवान शिव तिच्या चरणांशी येतात. जेव्हा तिला ती स्वतः भगवान शिवाची अर्धांगिनी असल्याचे भान होते, तेव्हा तिच्या मुखातून आपोआपच तिची जिव्हा बाहेर येते. त्यानंतर महाकालीला ती पार्वतीस्वरूपात असल्याची जाणीव होऊन तिला शिवाचे ध्यान होते. अशा प्रकारे शिव हेच महाकालीला नियंत्रित करू शकतात. या दोन शक्ती परस्परविरोधी असतांनाही परस्परपूरक आहेत. जेव्हा या दोन्ही शक्तींचा संयोग होतो, तेव्हा ब्रह्मांडातील आसुरी शक्तींचा विनाश होण्यास आरंभ होतो.’ हा या दृश्यामागील भावार्थ देवाने मला सांगितला.

३. साधिकेला हे चित्र दिसण्यामागील कार्यकारणभाव देवीने सांगणे 

माझ्या मनात ‘मला हे चित्र आता का दिसले असावे ?’, हा विचार आला. तेव्हा देवीने सांगितले, ‘आता तिसरे महायुद्ध चालू होणार आहे. त्यामुळे ६ व्या आणि ७ व्या पातळांतील मोठ्या अनिष्ट शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत झाल्या आहेत. त्यांचा निःपात करण्यासाठी आता महाकाली जागृत होऊन अनिष्ट शक्तींचा नाश करायला निघाली आहे.’

४. ही महाकाली नियंत्रित स्वरूपात पातळातील मोठ्या अनिष्ट शक्तींचा संहार करणार असल्याने हे चित्र काढतांना माझ्या मनात श्री महाकालीदेवीविषयी प्रेम, करुणा आणि संपूर्ण शरणागतीचा भाव जागृत होत होता. 

५. चित्र काढत असतांना जाणवलेली सूत्रे 

अ. मी संपूर्ण चित्र महाकाली स्तोत्र ऐकत काढले आहे. चित्र काढत असतांना ‘देवी माझ्यासमोर उभी आहे’, असे मला जाणवत होते.

आ. देवीच्या हातात असलेले राक्षसाचे डोके (मुंडके) आणि गळ्यातील मुंडमाला काढतांना मला त्रास जाणवला.

इ. चित्राचा आरंभ महाकालीदेवीचे डोळे, नाक आणि चेहरा काढून झाला. त्यानंतर भगवान शिवाचे डोळे, नाक, ओठ आणि संपूर्ण चेहरा काढला गेला. त्यानंतर हळूहळू उर्वरित चित्र साकारले गेले.

ई. महाकाली ही सर्व षड्रिपूंचा नाश करणारी असल्याने तिचे अलंकार काढत असतांना माझ्या मनात वैराग्य भाव जागृत झाला होता. ‘तिच्या अंगावर असलेले अलंकार तेजाचे प्रतीक आहेत’, असे मला जाणवले.

उ. माझे संपूर्ण चित्र काढून झाल्यावर माझ्या मनात ‘देवीच्या मुखाभोवती प्रभावळ काढायला हवी का ?’, असा विचार आला. त्या वेळी देवीनेच मला ती काढण्यास सांगितले. त्यानंतर माझ्याकडून तिच्या मुखाभोवती प्रभावळ काढली गेली. ‘प्रभावळ काढल्यावर देवीच्या चित्राला पूर्णता आली आणि चित्रामधील तेजतत्त्व अधिक वाढले’, असे मला जाणवले.

ऊ. चित्र काढत असतांना ‘देवीचे रूप मारक असून अस्त्रांना लागलेले राक्षसांचे रक्त अधिक प्रमाणात मारक आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला देवीच्या दशमहाविद्यांचे आणि त्यांच्या रूपांचे स्मरण झाले.

ए. देवीचे डोळे काढतांना ‘ते कशा प्रकारे काढायचे ?’, असा मला प्रश्न पडला. तेव्हा देवाने विचार दिला, ‘विस्मयकारक भाव चेहेर्‍यावर आणून आणि जीभ बाहेर काढून डोळे कसे दिसतात ?’ ते आरशात पहा.’ त्यानुसार माझ्याकडून डोळे काढले गेले.

(केवळ हे सूत्र टंकलेखन करतांना मला पुष्कळ चैतन्य मिळत होते. त्या वेळी मला सलग ७ – ८ मिनिटे जांभया येत होत्या. यामागे काय कारण असेल ? – देवीच्या डोळ्यांतून प्रक्षेपित होत असलेल्या मारक शक्तीमुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले.)

ऐ. हे चित्र मी साधारण दुपारी ४.३० च्या वाजता काढायला घेतले होते. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मला सकाळी श्री महाकालीदेवीचे चित्र काढावेसे का वाटले ?’ त्याचे कारण म्हणजे आज ‘महेश नवमी’ आहे. ‘महेश नवमी’ या दिवशी महादेवाच्या समवेत देवी पार्वतीचीसुद्धा पूजा करतात. (४.६.२०२५ या दिवशी रात्री ११.५५ पर्यंत ‘महेश नवमी’ होती.)

ओ. मी चित्र काढत असतांना माझ्या मनात त्या दिवशीच्या तिथी संदर्भात विचार नव्हता. रात्री जेवायला जाण्यापूर्वी माझ्याकडून बर्‍यापैकी चित्र काढून झाले होते. तेव्हा मला वाटले की, आता उर्वरित चित्र उद्या काढूया. तेव्हा गुरुदेवांनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘कितीही विलंब झाला, तरी चित्र आजच काढायचे आणि धारिकासुद्धा आजच पूर्ण करून द्यायची.’ तेव्हा मला वाटले, ‘एक तर चित्र किंवा धारिका, एकच काही तरी पूर्ण करूया.’ त्यानंतर ‘हा विचार का आला असावा ?’, असा मी पुन्हा विचार केल्यावर गुरुदेवांनी मला सूक्ष्मातून सांगितले, ‘आजच्या तिथीचे महत्त्व वेगळे आहे. त्यामुळे ते आज पूर्ण केल्यास बरे होईल.’ त्यानंतर मी पंचांगामध्ये बघितले. तेव्हा ‘आजचा दिवस उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत शुभ आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर सलग दोन दिवस अशुभ दिवस होते. यावरूनच ‘देव जे सुचवतो, ते आपण ऐकत गेलो, तर आपल्याकडून योग्य ती कृती होत जाते’, हेसुद्धा मला शिकायला मिळाले.

औ. धारिका पूर्ण झाल्यावर मी संगणक बंद करायला गेले. त्या वेळी देवाने मनात विचार दिला, ‘ते चित्र हातात घेऊन प्रयोग करायला हवा.’ ‘तो प्रयोग मी का करत होते ?’ हे मला कळत नव्हते आणि ठाऊकही नव्हते. प्रयोग करत असतांना ते चित्र हातात घेऊन मी डोळे मिटले. तेव्हा मला त्यात पुष्कळ प्रमाणात मारक तत्त्व जाणवले. त्यातून अधिक प्रमाणात आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतांना मला जाणवले. हे सूत्रसुद्धा मला देवाने धारिकेत घेण्यास सांगितले.

‘हे चित्र अवघड असूनही ते अल्प वेळेत माझ्याकडून पूर्ण झाले. त्याची धारिकासुद्धा गुरुदेवांनीच पूर्ण करून घेतली’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक