संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांना सर्वतोपरी साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली पूरग्रस्त भागाची पहाणी

पूरग्रस्त भागांची पहाणी करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर, २४ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यात अतीवृष्टी आणि पूर यांमुळे पिके, जनावरे, घरे, व्यावसायिक यांची हानी झाली. पूरग्रस्तांनी धीर धरावा, राज्यशासन त्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी साहाय्य केले जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव, तसेच दारफळ सीना या गावांना भेटी देऊन पूरग्रस्त भागांची पहाणी केली. ते म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीचे साहाय्य म्हणून २ सहस्र कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. यापुढेही पूरग्रस्तांना साहाय्य देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही.’’

दारफळ गावात पुरामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीने पात्र पालटले आणि गावाचा मोठा भाग पाण्यात गेला, तसेच घरात पाणी शिरले. ‘शासन शेती, घरे, अन्नधान्य आदींसाठी साहाय्य करणार असून रस्ते, शाळा, शेतरस्ते, वीजव्यवस्था आदी सुविधांसाठीही साहाय्य करील. व्यावसायिकांनाही स्वतंत्र साहाय्य करण्यात येईल’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पहाणी !

कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पहाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करावे, त्यांना अन्न, पाणी, वीज आणि औषधे यांची सुविधा पुरवावी, तसेच ज्यांचे धान्य भिजले आहे, त्यांना धान्य उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धाराशिव जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पहाणी ! 

धाराशिव – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा तालुक्यातील करंजा गावातील शिंदेवस्ती आणि करळेवस्ती यांना भेटी देऊन अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीची पहाणी केली. नागरिकांशी संवाद साधून झालेल्या हानीची माहिती घेतली. या वेळी करंजा गावाजवळील शिंदे वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे वस्तीतील लोकांनी केली असता ‘पुनर्वसन नक्कीच करण्यात येईल’, असे आश्वासन शिंदे यांनी या वेळी दिले.

पूरग्रस्त भागांची पहाणी करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस