भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेल्या साक्षीदाराचे ‘साम्यवादी ‘देवाला मानत नाहीत का ?’ यावर अभ्यास नसल्याचे उत्तर !

कॉ. पानसरे हत्या प्रकरण

कॉ. गोविंद पानसरे

कोल्हापूर, २४ सप्टेंबर (वार्ता.) – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांनी एकेकाळी काम केले असे शशिकांत पाटील यांची कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयात उलटतपासणी झाली. या उलटतपासणीत त्यांना ‘साम्यवादी देवाला मानत नाहीत का ?’ असे विचारल्यावर त्यांनी ‘माझा अभ्यास नाही’, असे उत्तर दिले. ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकात नेमके काय मांडले आहे ? त्याची सविस्तर माहिती मला नाही, असेही पाटील यांनी सांगितले. अनेक प्रश्नांची उत्तरे पाटील यांनी ‘मला माहीत नाही’, ‘मला आठवत नाही’, अशीच दिली. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. २४ सप्टेंबरला अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी शशिकांत पाटील यांची उलटतपासणी घेतली.

या प्रसंगी बचाव पक्षाच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्त्या प्रीती पाटील, तर सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. याची पुढील सुनावणी ८ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे.

या वेळी शशिकांत पाटील यांनी त्यांच्या उलट तपासणीत ते सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सोडून अन्य कुठल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेस ओळखत नाही, ‘श्रमिक प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित ‘हू किल्ड करकरे’ या कार्यक्रमाचा निधी कुणी खर्च केला हे आठवत नाही, ‘हू किल्ड करकरे’ हे पुस्तक मी विकत घेतले; मात्र मी ते संपूर्ण वाचले नाही’, अशी उत्तरे दिली.