स्वस्त दरातील विजेसाठी ‘स्मार्ट टी.ओ.डी.’ वीजमीटर

महावितरणकडून नवीन मीटर विनामूल्य बसवण्यात येणार

स्मार्ट टी.ओ.डी.’ वीजमीटर

(टी.ओ.डी. – टाईम ऑफ डे) 

कुडाळ – महाराष्ट्र विद्युत् नियामक आयोगाने पुढील ५ वर्षांसाठी निश्‍चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसा वापरण्यात येणार्‍या विजेच्या दरात प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया एवढी सवलत घोषित केली आहे. ही सवलत मिळण्यास १ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. याचा लाभ मिळण्यासाठी  घरगुती ग्राहकांना ‘स्मार्ट टी.ओ.डी. (टाईम ऑफ डे) मीटर बसवणे आवश्यक असून हे मीटर महावितरणकडून विनामूल्य बसवले जात आहेत. या मीटरमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील १ लाख ८३ सहस्र ७३७ वीजग्राहकांना जुलै आणि ऑगस्ट या २ मासांत एकूण १९ लाख ६६ सहस्र रुपयांची सवलत मिळाली आहे, असे महावितरण आस्थापनाने कळवले आहे.

नव्या मीटरमधून स्वयंचलितपणे वीजवापराची मासिक नोंद होत असल्याने अचूक देयके मिळतात आणि घरातील विजेचा वापर प्रत्येक अर्धा घंट्याने संबंधित ग्राहकांना भ्रमणभाषवर पहाता येतो. त्यामुळे वीज वापरावरदेखील ग्राहकांचे थेट नियंत्रण रहाते. नवीन मीटरमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक लाभ होत आहे. ‘टाईम ऑफ डे’  प्रणालीनुसार वीजवापराच्या कालावधीनुसार वीजदर आकारणी केली जाते. औद्योगिक ग्राहकानंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीजदरासाठी टी.ओ.डी.प्रमाणे आकारणी चालू झाली आहे, असे महावितरण आस्थापनाने कळवले आहे. असे असले, तरी महावितरणकडून बसवण्यात येणार्‍या नवीन वीजमीटरमुळे वीजदेयकात भरमसाठ वाढ होत असल्याचा आरोप वीजग्राहकांकडून केला जात असून अनेक ठिकाणी याला विरोध केला जात आहे. (या आरोपांवर महावितरण योग्य ते स्पष्टीकरण देईल का ? – संपादक)